वसई-विरार महापालिकेच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेल्या अहवालावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप

प्रसेनजीत इंगळे
विरार : नालासोपारा परिसरात असलेल्या पेल्हार नदीचे पात्र वसई-विरार महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेल्या अहवालातून गायब झाल्याची बाब समोर आली आहे. मुळात पेल्हार नदी ही सोपारा खाडी विसर्ग होऊन पुढे वसईच्या खाडीत जाते. असे असतानाही पालिकेच्या अहवालात ही नदी पेल्हार धरणातून सुरू होऊन वसईच्या गोलाणी नाक्यापर्यंत संपते, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नदी स्वच्छ योजनेत महाराष्ट्रातील इतर नद्यांमध्ये वसई-विरारमधील पेल्हार नदीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या नदीचे संवर्धन करण्यात आलेच नाही. यामुळे अनेक वर्षांपासून येथे मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. शेकडो अनधिकृत तबेले, कारखाने आणि औद्योगिक वसाहती कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी वर्षांनुवर्षे या नदीच्या पात्रात सोडत आहेत. यामुळे या नदीचे पात्र मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वच पाणवठे दूषित झाले आहे. शेकडो एकर शेती नापीक झाली आहे. त्याचबरोबर वनक्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी यांनी ही नदी बारमाही नदी नसल्याचे सांगत केवळ पावसाळ्यात तिचा प्रवाह असतो. इतर महिन्यांत पाणी आटले जाते. यामुळे हिचे मूळ पात्र केवळ गोलाणी नाक्यापर्यंत असल्याचे सांगितले; पण मुळात हे पात्र सोपारा खाडीपर्यंत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ पात्र कमी सांगत असल्याचा आरोप करीत पर्यावरण अभ्यासक समीर वर्तक यांनी सांगितले.

दरम्यान,  वसई-विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही, संबंधित विभागाकडून माहिती घेऊन सांगितले जाईल, असे सांगितले.

केवळ आश्वासन

अहवाल २०१९ मध्ये शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या वेळी  प्रदूषित नदीला स्वच्छ करण्यासाठी दोन वर्षांत या नदीच्या पात्रावर सांडपाणी प्रक्रिया योजना, तसेच येथील तबेले आणि  अतिक्रमण तोडण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ३ वर्षे उलटूनही काही कार्यवाही नाही. परिसरात  एकही   सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बसविलेले नाही. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या परिसरात साधारणत: १५० तबेले असून त्यात २५ ते ३० हजार जनावरे आहेत. या तबेल्यातील मलमूत्र या पाण्यात सोडले जाते. यामुळे या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अहवालात दिलेली माहिती चुकीची

महानगरपालिकेने शासनाला सादर केलेल्या अहवालात पेल्हार नदीचे पात्र कमी दाखवले आहे .या नदीला प्रदूषित करणारे  सोपारा, तुंगार , वालीव हे नाले गोलाणी नाक्याच्या किती तरी पुढे आहेत. त्यात सोपारा फाटय़ावरील नाल्यातून ०.५७ एमएलडी सांडपाणी या नदीत जात आहे, तुंगार नाल्यातून ०.२ एमएलडी सांडपाणी, तर वालीव नाल्यातून ०.१२ एमएलडी पाणी या नदीच्या पात्रात जाऊन नदी प्रदूषित केल्याचे म्हटले आहे; पण नदीच गोलाणी नाक्यापर्यंत संपत असेल तर हे नाले या नदीला कसे काय प्रदूषित करतात, असा सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.

मुळात ही बारमाही नदी नाही. वसई-विरार महानगरपालिकेला या संदर्भात वेळोवेळी सूचना सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्र  बसविण्याचे सांगितले आहे. तसेच अनेक नोटिसासुद्धा बजावल्या आहेत; पण पालिकेने अजूनही या संदर्भात कोणतेही काम केले नाही. यामुळे नदी स्वच्छतेचे काम अजूनही बाकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सुवर्णा गायकवाड, क्षेत्र अधिकारी – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे</strong>