वसई पोलिसांचा ४८ तासांचा थरारक पाठलाग यशस्वी

वसईतील एका डॉक्टरचे घर लुटणाऱ्या नेपाळी सुरक्षारक्षकांना पोलिसांनी ४८ तासांचा थरारक पाठलाग करून गुजरातमधून अटक केली आहे.

डॉक्टरांचे घर लुटणाऱ्या नेपाळी टोळीला गुजरातमधून अटक

वसई : वसईतील एका डॉक्टरचे घर लुटणाऱ्या नेपाळी सुरक्षारक्षकांना पोलिसांनी ४८ तासांचा थरारक पाठलाग करून गुजरातमधून अटक केली आहे. डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या नेपाळी सुरक्षारक्षकानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने लाखोंची चोरी केली होती. नेपाळमध्ये पळून जाण्यापूर्वीच त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

वसई पश्चिमेच्या बाभोळा येथे राहणारे डॉ. दीपक राऊत (७१) यांच्या घरी सुरेंद्र बोगाटी हा नेपाळी सुरक्षारक्षक मागील वर्षभरापासून काम करत होता. रुग्णालयाच्या वरच राऊत यांचे दुमजली निवासस्थान आहे. २९ नोव्हेंबरला डॉ. राऊत कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते. त्यावेळी बोगाटी याने आपल्या अन्य दोन साथीदारांना बोलावून घेतले आणि घरातील कपाट तोडून रोख रक्कम, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी मिळून १५ लाखांचा ऐवज लुटला होता. डॉ. राऊत घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरक्षारक्षक बोगाटी फरार असल्याने त्याच्यावर संशय होता. मात्र डॉ. राऊत यांच्याकडे त्याचा फोटो आणि मोबाइलशिवाय काहीच माहिती नव्हती.

 वसई पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा जलद तपास करण्यासाठी ४ विशेष पथके तयार केली होती. आरोपी बोगाटी याचे काही नातेवाईक पनवेल येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. मात्र तेथून बोगाटी आणि त्याचे दोन साथादीर सुरत येथे गेल्याचे समजले. या काळात आरोपींनी आपले मोबाइल बंद करून दुसरे सिम कार्ड घेतले होते. पोलीस तात्काळ सुरतला रवाना झाले. त्या ठिकाणी ते थांबले होते तो परिसर शोधून काढला. मात्र दोन तासांपूर्वीच आरोपी नेपाळला जाणाऱ्या बसमध्ये बसल्याची माहिती मिळाली. आरोपींनी भारताची सीमा ओलांडून नेपाळच्या हद्दीत प्रवेश केला असता तर ते कधीच हाती लागले नसते. त्यामुळे त्यांना रोखणे गरजेचे होते. पोलिसांनी लगेच खासगी वाहन केले आणि बसचा पाठलाग सुरू केला. परंतु आरोपी असलेली बस २५० किलोमीटर लांब होती. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्या खासगी बसच्या चालकाला विश्वासात घेतले. बसचालकाने पोलीस येईपर्यंत बसचा वेग कमी केला आणि विविध कारणे सांगून बस थांबवून ठेवली होती. शेवटी बस गोध्रा येथे असताना पोलिसांनी गाठले आणि बोगाटी तसेच त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.

परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हृषिकेश पवळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक राम सुरवसे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

या नेपाळी टोळीला पकडणे खूप आव्हानात्मक काम होते. मात्र आमच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक विश्लेषणासह केलेल्या नियोजनबद्ध तपासामुळे या टोळीला पकडण्यात यश आले.

संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ झोन २

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Robbery chase police successful ysh

ताज्या बातम्या