वसई: जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर वसई रेल्वे पोलीस यंत्रणा ही सतर्क झाली आहे. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रेल्वे स्थानकात गस्त वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसून आहे.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या ३१ किलोमीटरच्या हद्दीत  मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. दिवसेंदिवस या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढली आहे. विशेषतः  वैतरणा स्थानक वगळता विरार, नालासोपारा, नायगाव, वसई, भाईंदर, मीरारोड ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. दररोज या स्थानकातून लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.

नुकताच जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वसई रेल्वे पोलिसांनी सुद्धा सातही रेल्वे स्थानकात आपली गस्त वाढविली आहे.

गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात करून बॅगा तपासणी, स्थानकातील हालचालीवर लक्ष ठेवणे, तसेच रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांच्या तर्फे लाँग मार्च काढून प्रवासी वर्गात सुरक्षेची भावना निर्माण करणे, सीसीटीव्ही द्वारे हालचालीवर लक्ष ठेवणे, प्रवासी ये जा करण्याचे मार्ग, जिने याठिकाणी गस्त ठेवणे, प्रवाशांमध्ये जनजागृती करणे असे उपक्रम तातडीने राबविण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. वसई आणि विरार रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या ही थांबतात त्या ठिकाणी  जाऊन तपासणी केली जात आहे. असेही पोलिसांनी सांगितले आहे.

हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सूचना

रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेते ( कॅन्टीन चालक) रेल्वे सफाई कर्मचारी, बूट पॉलिश करणारे, हमाल यांच्याशी संपर्क करून रेल्वे स्थानकात घडणाऱ्या बाबींची माहिती जाणून घेतली जात आहे. स्थानकात एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा अन्य गोष्ट निदर्शनास आल्यास तातडीने कळवावी अशा सूचना ही रेल्वे पोलिसांनी त्यांना केल्या आहेत.

प्रवाशांना आवाहन

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.त्या प्रवाशांना सुद्धा प्रवसाच्या दरम्यान एखादी संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने त्या ठिकाणी गस्तीवर असलेले पोलीस किंवा रेल्वे कार्यालय यांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी प्रवाशांना केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार प्रत्येक रेल्वे स्थानकात गस्त वाढविली आहे. संशयास्पद गोष्टी, स्थानकातील हालचाली यावर लक्ष ठेवले जात आहे.- भगवान डांगे, वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक वसई