वातावरणातील लहरीपणामुळे कोसळणारा वळवाचा पाऊस, बदलेले निसर्गचक्र, वाढते आधुनिकीकरण अशा विविध कारणांमुळे वसईच्या भागातील पारंपारिक व्यवसाय आता संकटात सापडू लागले आहे. यात विशेषतः मीठ उत्पादन, वीट भट्टी, मत्स्यव्यवसाय, भात व फ़ुलशेती असे पूर्वापार चालत आलेले व्यवसाय अडचणीत सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर  म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी विविध पारंपरिक व्यवसाय नावारूपाला आणले आहेत.  मात्र सध्याच्या बदलत्या काळाच्या ओघात हेच व्यवसाय अडचणीत सापडत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वसईच्या प्रत्येक पारंपारिक व्यवसायाने विविध स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.यात विशेषतः मीठ उत्पादनाचा ही मोठा वाटा आहे. वसईच्या भागात वनराशी मिठागर, आगरवती सलाम, नवामुख, हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक अशी वसई तालुक्यात ३० ते ३५ मिठागरे होती.या मिठागरातून पिकवलेले मीठ हे मुंबई, गुजरात, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पंढरपूर अशा ठिकाणी विक्रीसाठी जात असते.

मागील काही वर्षापासून मिठागर उत्पादकांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. खाड्यांच्या वाढत्या प्रदूषणाने पाण्यातील मिठासाठी आवश्यक असलेला खारटपणा नष्ट केला. याशिवाय मजूर कमतरता, उत्पादन खर्च,  बाजारमंदी , पूरस्थिती, वळवाचा झालेला पाऊस अशा अनेक कारणांमुळे याचा मोठा परिणाम हा व्यवसायावर होऊ लागला आहे.

यंदाही मीठ उत्पादकांना आपला व्यवसाय हंगाम पूर्ण होण्याआधीच गुंडाळावा लागला. विशेषतः मे महिन्यातील उष्णतेत निम्म्याहून अधिक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व दाखल झालेल्या पावसाने मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. सातत्याने अशा नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने हळूहळू मीठ उत्पादन ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तशीच काहीशी स्थिती मत्स्यव्यवसायाची सुद्धा झाली आहे.

वसईचा मत्स्यव्यवसाय सातत्याने वातावरणातील बदल, वादळी वारे, समुद्र मार्गातून जाणारे प्रकल्प, समुद्रातील प्रदूषण, तेल सर्वेक्षण काळात मासेमारीवर बंदी अशा विविध कारणांमुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. यंदाही समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हंगाम पूर्ण होण्या आधीच बोटी किनाऱ्यावर आणाव्या लागल्या यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आता व्यापारी वर्गाने घुसखोरी केली आहे. काही जण पर्ससीन जाळी, एलईडी दिवे यांचा वापर करून मासेमारी करतात. त्यामुळे पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमार यांच्यावर याचा परिणाम होत आहे. अनिर्बंध होत असलेल्या मासेमारीमुळे मत्स्य साठे धोक्यात आले आहेत. तर दुसरीकडे आजही किनारपट्टीवर मासळी सुकवून त्यातून रोजगार मिळविणारे बांधव मोठ्या संख्येने आहे. त्यांनाही विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

एकीकडे बेसुमार वाळू उपशाने त्यांच्या मासळी सुकविण्याच्या जागा गिळंकृत केल्यात तर दुसरी ज्या हंगामात दोन पैसे कमविण्याची वेळ असते तेव्हा वळवाचा पाऊस कोसळतो अशात हा व्यवसाय तग धरणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाने मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिला आहे. आज मत्स्यव्यवसायास शेतीचा दर्जा मिळत असताना पारंपरिक मासेमारी विविध समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. यासाठी केवळ नैसर्गिक आपत्तीवर सारे ढकलून चालणार नाही तर यातील अनेक समस्या मानवनिर्मित असून यासाठी सरकारची धोरणे, धोरणकर्त्यांमधील दूरदृष्टीचा अभाव, आधुनिकतेच्या नावाखाली विध्वंसक माध्यमातून ‘शाश्वत मासेमारी’ या संकल्पनेला नष्ट करणारा आहे.

वीटभट्टी या पारंपारिक व्यवसायाचीही काही वेगळी स्थिती नाही. मागील काही वर्षांपासून वीट उत्पादनात क्षेत्रातही अनेक समस्या उद्भवू लागल्या आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वीट तयार करण्यासाठी आवश्यक माती शिल्लक नाही. तर दुसरीकडे काँक्रिटकरणापासून तयार केलेल्या सुप्रीम ब्लॉक वीट आल्याने मातीच्या विटा घेण्याचे प्रमाण ही कमी होत आहे. त्यातच जे वीट उत्पादक विटा तयार करतात त्यांना ही अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा फटका बसत आहे. यावर्षी ही या वीट उत्पादकांना पावसाने चांगलाच फटका दिला आहे. जवळपास कोट्यावधी रुपयांच्या वीट मालाचा अक्षरशः चिखल झाला.

अशा समस्या निर्माण होत असल्याने काही पारंपारिक वीट उत्पादक आता यातून काढता पाय घेत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या नागरीकरणात येथील शेतीचे उत्पादन क्षेत्रात ही कमालीची घट होत आहे. जे फळबागायतदार, फुल उत्पादक शेतकरी शेतीला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना ही शासन स्तरावरून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  या वाढत्या आधुनिकीकरणामुळे पारंपारिक व्यवसाय मोडीत निघू लागले आहेत अशीच काहीशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. आज वसई विरार भागातील पारंपारिक व्यवसायावरच येथील संस्कृती व येथील वेगळेपण टिकून आहे. अशा पारंपारिक व्यवसाय टिकविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु तसे कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.याचाच हा परिणाम, काळानुसार बदल होणे जरी आवश्यक वाटत असले तरी त्या होणाऱ्या बदलाच्या प्रवाहात येथील पारंपारिकतेला जोपासणे आवश्यक आहे. यासाठी धोरण निश्चित करून उपाययोजना आखायला हव्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगारावर परिणाम

पारंपारिक व्यवसायामुळे हातावर पोट असलेल्या गोर गरिबांना रोजगाराची मोठी संधी होती. केवळ संधी नव्हती तर यातून एक आपलेपणा जोपासला जात होता. निमित्त जरी व्यवसायचे असले तरी प्रत्यकाच्या दैनंदिन जगण्यातील प्रश्नांची एकमेकांना जाणीव होती. मात्र व्यवसायच नष्ट होत असल्याने यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगारही रोडवला गेला. हळूहळू हा मजूर वर्ग या सर्व गोष्टीपासून दुरावला गेला. अशातच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्रशासनाकडून चालना दिली जात नाही. त्यामुळे आता हाताला मिळेल ते काम करून आपल्या उदरनिर्वाह करण्याची वेळ मजुरांवर आली आहे.