वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनू लागली आहे. तासनतास वाहने एकाच जागी अडकून पडत असल्याने प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांना ही त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसात मुंबईसह आजूबाजूच्या भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कोंडीत अडकून पडले होते.ठाणे घोडबंदर घाट मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही अवजड वाहने विरार फाटा व चिंचोटी येथून महामार्गावर सोडली जातात. त्याचाच परिणाम हा वाहतुकीवर होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
या दुरुस्तीचा कामाचा परिणाम हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही झाला असून मागील तीन दिवसांपासून वर्सोवा पूल ते वसई फाटा या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा परीक्षा सुरू आहेत त्यामुळे शाळेत वेळेत पोहचता येत नाही अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.
मंगळवारी सुद्धा १० ते १२ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या. यात काही मुंबईच्या भागातून सहलीसाठी आलेल्या बसेसचा ही समावेश होता. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज हे हाल होत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत पाटील यांनी केला आहे.वाहतूक कोंडीत बस अडल्याने कामण- चिंचोटी येथील विद्यार्थ्यांना बापाणे येथून दुर्गंधी युक्त नदीच्या पाण्यातून वाट काढून घरी जावे लागले असे रजनीकांत म्हात्रे यांनी सांगितले आहे.
अधिसूचनांचे पालन नाहीच
महामार्गावर दुरुस्तीची कामे करताना वाहतूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत अधिसूचना काढल्या जातात. अवजड वाहनांना बंदी, पर्यायी व्यवस्था अशा सर्व बाबी त्यात दिल्या जातात. मात्र वाहतूक विभागाकडूनच त्यांचे पालन होत नसल्याने आज कोंडीची समस्या तीव्र होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.