वसई : महापालिकेकडून गणेशोत्सवापूर्वी वसई विरार शहर खड्डेमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती, दिवाळी सुरू झाली तरीही हा दावा पूर्ण न झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नायगाव पश्चिम विभागातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये दिवाळीचे दिवे लावून पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.

वसई विरार शहरात पडलेला पाऊस, जलवाहिन्या अंथरण्यासाठी केलेले खोदकाम आणि निकृष्ट दर्जाची खड्डेदुरुस्ती यामुळे शहरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्रज्य निर्माण झाले होते. नागरिकांची होणारी गैरसोय आणि वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांकडून गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन देण्यात आले होते.

पण, आधी गणेशोत्सव नंतर नवरात्री आणि आता दिवाळीचा सण आला तरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यामुळे सणासुदीच्या काळातही नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, नायगावमधील रस्त्यांचीही देखभाल दुरुस्तीअभावी मोठी दुर्दशा झाली आहे. मोठमोठाले खड्डे, खड्ड्यांमध्ये साचलेली धूळ यामुळे वाहनचालकांना खड्डे आणि धूळ अशा दुहेरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

खड्डेदुरुस्तीचे आश्वासन देऊनही महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्त न केल्यामुळे नायगाव पश्चिम विभागातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये दिवे लावून बविआ कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि बांधकाम विभागाचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत तीव्र निषेध व्यक्त केला.

तसेच, प्रभाग समिती आय चे अभियंते मनोज पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असता, त्यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या रस्ते ठेकेदारांची देयके थकल्यामुळे सर्व ठेकेदार संपावर गेले आहेत आणि त्यामुळे रस्तेदुरुस्तीला विलंब होत असल्याचे सांगितले असल्याची माहिती आशिष वर्तक यांनी सांगितले.

तर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक काळात महानगरपालिकेने घरपट्टी वसुलीवर जोर देऊन अंदाजे ७५ टक्के वसुली केल्याची चर्चा असतानाही, ठेकेदारांचे पैसे थांबवून रस्त्यांची दुर्दशा करण्याचा प्रशासनाचा नेमका काय हेतू असू शकतो, असा संतप्त सवालही बविआ कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.