वसई : वसई लोहमार्ग पोलीस ठाणे हे वसई रेल्वे स्थानकापासून दूर असल्याने तक्रार करणाऱ्या आणि कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी लोहमार्ग पोलीस ठाणे हे रेल्वे स्थानकाजवळच उभारण्यात यावे अशी मागणी प्रवशांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत असून यासाठी रविवारी वसई रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.वसई येथे असणाऱ्या लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मीरारोड रेल्वे स्थानक ते वैतरणा रेल्वे स्थानक अशा एकूण सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांच्या दरम्यान घडणाऱ्या गुन्ह्यासंबंधी तक्रार करण्यासाठी प्रवाशांना वसईच्या लोहमार्ग पोलीस ठाणे येथे जावे लागते.

वसई लोहमार्ग पोलीस ठाणे हे वसई स्थानकापासून एक किलोमीटर दूर असल्याने इतर स्थानकांतून तक्रार करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या परिसरात पाणी साचत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वसई स्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत असल्याने स्थानकात कायम प्रवाशांची वर्दळ असते अशा वेळी एखादा गुन्हा घडल्यास प्रवाशांना तात्काळ पोलीस ठाणे गाठण्यास अडचणी येत असतात. यामुळे लोहमार्ग पोलीस ठाणे वसई रेल्वे स्थानकातच स्थलांतरित करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या असूनही रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. बोरिवलीसारख्या ठिकाणी पोलीस ठाणे थेट स्थानकाला लागून आहे, मात्र वसईत ही सुविधा नाही.या प्रश्नावर उपाय म्हणून “द व्हॉइस ऑफ वसई पीपल” या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडे यांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेत हे पोलीस ठाणे वसई रेल्वे स्थानकाजवळ स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी पांडे यांनी केली आहे. आतापर्यंत चारशेहून अधिक प्रवाशांनी स्वाक्षरी केली आहे.

लोहमार्ग पोलीस ठाणे सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने स्थानकाजवळ असावे यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेत जमा झालेल्या स्वाक्षऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे पाठवण्यात येणार आहेत.अशोक पांडे, अध्यक्ष “द व्हॉइस ऑफ वसई पीपल” सामाजिक संस्था