वसई:- धावत्या लोकलमधून खाडीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकताच नायगाव भाईंदर खाडीवर धावत्या लोकल मधून निर्माल्याचा नारळ फेकल्याने एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेनंतर लोकलमधून निर्माल्य फेकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या खाडीत धावत्या लोकल मधून निर्माल्य टाकून देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. नायगाव भाईंदर खाडी पूल, वैतरणा विरार खाडी पूल या दरम्यान अनेक प्रवासी निर्माल्याने भरलेल्या पिशव्या धावत्या लोकलमधून भिरकावत असतात. अनेकदा हे निर्माल्य खाडीत न जाता खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर उडते.

काही वेळा निर्माल्याच्या पिशवीत जुन्या मुर्त्या, नारळ याचाही समावेश असल्याने त्याचा जोराचा फटका नागरिकांना बसून जखमी होऊ लागले आहेत. शनिवारी नायगाव खाडी पुलावरून लोकल जात असताना एका प्रवाशाने निर्माल्याचा नारळ खाडीत टाकण्यासाठी फेकला होता. मात्र तोच नारळ पुलाच्या बाजूने पायी चालत असलेल्या ३० वर्षीय तरुणाच्या डोक्यात लागला यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल मधून फेकल्या जाणाऱ्या निर्माल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ही भरधाव वेगाने जाते. त्यातच अशा प्रकारे निर्माल्य व इतर वस्तू लोकलमधून खाडीत फेकतात त्यामुळे त्याचा जोराचा फटका काहीवेळा रेल्वे पुलावरून पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो.  यापूर्वी सुद्धा आमच्या गावातील अनेकांना निर्माल्य लागून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत असे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले आहे.

वैतरणा खाडी पुलावरून निर्माल्य टाकण्याचे प्रमाण अधिक आहेत आमच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक यात जखमी झाले आहेत असे डहाणू वैतरणा सेवा भावी संस्थेचे हितेश सावे यांनी सांगितले आहे. लोकल मधून निर्माल्य फेकणाऱ्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी आणावी व जे निर्माल्य फेकताना दिसून येतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वसई रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेऊन निर्माल्य फेकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे. जे निर्माल्य टाकताना आढळून येतील त्यांची तक्रार पोलिसांकडे करण्याचे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.

पर्यावरणाला ही धोका

खाडीत प्लास्टिक पिशव्यांमध्ये निर्माल्य भरून टाकले जाते. त्यामुळे खाडी पात्रात असलेल्या जलचर जीवांना ही याचा धोका निर्माण होऊ लागला आहे. काही केवळ निर्माल्याच नाही तर केरकचरा ही पाण्यात टाकून दिला जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. त्यावर नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस असे प्रकार वाढीस लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे.

जनजागृती मोहीम राबवा

खाडीत टाकल्या जाणाऱ्या निर्माल्य व अन्य कचरा रोखण्यासाठी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांना खाडीच्या प्रदूषणासंबंधी आणि निर्माल्य फेकण्याच्या दुष्परिणामांविषयी समाजमाध्यमातून माहिती द्यावी याशिवाय जे खाडीमध्ये निर्माल्य फेकण्याच्या घटनांची त्वरित तक्रार नोंदवून त्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकल्याने घडलेल्या घटना

  • २७ सप्टेंबर २०२५ रोजी नायगाव खाडी पुलावर धावत्या लोकल मधून फेकलेला नारळ डोक्यात लागून संजय भोईर (३०) तरुणाचा मृत्यू.
  • पाणजू येथील शकुंतला वामन पाटील या महिलेच्या डोक्यात ही निर्माल्याचा नारळ लागून तिचा मृत्यू झाला होता असे गावकऱ्यांनी सांगितले.
  • एप्रिल २०१९ मध्ये वैतरणा खाडी पुलावरून जाताना रोहिणी पाटील या महिलेला निर्माल्याचा नारळ डोक्यात लागून गंभीर जखमी झाली होती.

खाडीपलिकडून म्हणजे वसई विरार पालघर मधून येणारे प्रवासी भाईंदर खाडीत निर्माल्य टाकत असतात. आम्ही भाईंदर मध्ये राहतो. आमचे निर्माल्य कचराकुंडीत टाकतो. पालिका त्यापासून खत तयार करते. असे निर्माल्य टाकणे धोकादायक आहे. खाडीतून स्थानिक बोटीतून जात असतात. त्यांनाही धोका आहे. असे निर्माल्य टाकण्यावर बंदी आणायला हवी – डॉ वीरश्री भोईर, भाईंदर