वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गुरूवार पासून आत्महत्येच्या परवानगीसाठी टपालाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यास सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक नागरिकांनी टपालाद्वारे पत्र पाठविले आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक रहिवासियांना बसत आहे.
महामार्गलगत ससूनवघर, मालजीपाडा, ससूपाडा, बोबतपाडा, पठारपाडा, यासह अनेक खेडी आणि पाडे आहेत. येथे मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे. महामार्ग हा येथील नागरिकांची जीवनवाहिनी असल्याने महामार्गावरूनच दैनंदिन भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपचार, शाळा महाविद्यालये,व इतर कामांसाठी ठाणे, काशीमिरा, वसई , नायगाव यासारख्या ठिकाणी जावे लागते. मात्र सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने येथील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहे.
या वाहतूक कोंडीच्या नियोजनाच्या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार व आंदोलने करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील ग्रामस्थांनी गुरुवारी अनोखे आंदोलन केले आहे. आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या असे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टपालाद्वारे पाठविण्यात आले आहे. पत्र पाठविण्यासाठी सकाळी ससूनवघर येथील टपाल कार्यालयात ग्रामस्थ जमून पत्र जमा केली आहेत.
२०१४ पासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करीत आहोत आधी वर्सोवा पुलाचे काम, त्यानंतर परत दुरुस्ती,नवीन वर्सोवा पूलाचे काम, काँक्रिटीकरण, गायमुख घाट रस्ता दुरुस्ती अशी कामे हाती घेतली जातात मात्र त्याचे वाहतूक नियोजन नसते याचाच हा फटका आम्हा ग्रामस्थांना बसतो असे भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.
कोंडीमुळे मुलांना शाळेत ये जा करायला अडचणी येतात आम्ही मुलांना शाळेत पाठवायच की नाही असा प्रश्न येथील महिलांनी उपस्थित केला आहे.
पत्रात काय ?
आत्महत्या का करायचीय ते आम्ही पत्रात लिहिलं आहे. तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही. रस्त्याच्या स्थितीबाबत चौकशी करत नाही. आम्ही अनेक आंदोलनं केली. तेही आम्ही टाकलेलं आहे. त्यामुळे आम्ही जगून करायचं तरी काय? तुमच्यासाठी आम्ही हयातीत नाहीच आहोत तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या असे त्या पत्रात म्हटले आहे.
अपेक्षा आहे की उत्तर येईल. जर आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इथले सेवा रस्ते पूर्ण केले पाहिजेत. याशिवाय इथल्या वाहतूक शाखेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. शंभरहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत टपालात पत्र टाकली आहेत आठवडा भर टपालात पत्र टाकण्याचे काम सुरूच राहिले असेही नागरिकांनी सांगितले आहे.