वसई:- वसई विरार शहरात ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने धारण तलावांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले आहे. यासाठी पालिकेने नालासोपारा निळेमोरे, गोगटे खारभूमी धारण तलाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा आरखडा तयार करून शासनस्तरावर मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
मागील काही वर्षापासून वसई विरार शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या अधिकच बिकट होऊ लागली आहे. २०१८ मध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी धारण तलाव विकसित होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे येथील सर्व्हे क्रमांक १७९, हिस्सा न १ /ड या जागेवर १९ हजार ८६०. ६४ चौरस मीटर इतक्या क्षेत्रात धारणतलाव करण्याचे निश्चित केले होते. मात्र पाच वर्षे उलटून गेल्यानंतर ही याबाबत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमुळे पुन्हा एकदा शहर जलमय झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरणे, वाहतूक सेवा ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. या पूरस्थितीने धारणतलावांची आवश्यता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
अखेर महापालिकेने धारण तलाव विकसित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नालासोपारा येथील निळेमोरे येथे निश्चित केलेल्या ठिकाणी धारणतलाव विकसित करण्यात येणार आहे. तसेच गोगटे मिठागराकडे १ हजार एकरहुन अधिक जागा आहे. याठिकाणी देखील धारण तलावाची निर्मिती केली जाणार आहे. पैकी निळेमोरे येथील प्रस्तावित असलेल्या धारणतलावासाठी २२२ कोटींचा आरखडा तयार केला आहे. तर गोगटे मिठागरासाठीचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. धारण तलाव विकसित झाल्यास शहरातील पूरस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होईल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
धारणतलाव क्षेत्रात पर्यटनस्थळ
तलावाच्या आरक्षित जागेत धारण तलाव आणि त्याच भागात पर्यटनस्थळ ही विकसित केले जाणार आहे. शासनाच्या नगर सुधारण योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी केवळ धारण तलाव बनविण्यासाठी पालिकेवरच आर्थिक ताण येणार होता. त्यासाठी तेथे पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास पर्यटनाला ही चालना मिळणार आहे. त्याच अनुषंगाने या योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्प त्या ठिकाणी सुरू होतील असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
असे होईल पर्यटन स्थळ
निळेमोरे येथे आरक्षित असेलल्या धारण तलावाची जागा खारटन क्षेत्र आहे. त्याठिकाणी अडीच मीटर खोल टॅंक प्रमाणे खोदकाम केले जाईल. जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साचून राहण्यास मदत होईल तर दुसरीकडे त्याच ठिकाणी पर्यटनासाठी जेट स्की, बोटिंग यासह पर्यटनकांच्या सुविधेसाठी शौचालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांनाही याठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येईल असे पालिकेने सांगितले आहे.
शहरात पूरनियंत्रणासाठी धारण तलाव आवश्यक आहेत. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्यासोबत पर्यटनक्षेत्र विकसित करण्याची योजना आखून तसा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे. – मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका