वसई- विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली.
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
हेही वाचा – मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
विरारच्या एका हॉटेल मध्ये भाजपचे नेते विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मध्ये गोंधळ घातला आहे. भाजपा-बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. तावडे यांनी या आरोपांत तथ्य नसल्याचं सांगितलं. pic.twitter.com/8G0ZmpUGW4
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) November 19, 2024
विनोद तावडे यांना घेरून अंगावर पैसे फेकले
संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. पैशांची पाकिटे पकडून त्यातील पैसे तावडे यांच्या अंगावर फेकले. तावडे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. निवडणुकीच्या मतदानाचे नियम काय असतात ते सांगत होते. मी आयुष्यात कधी पैसे वाटले नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले.