अमित आचरेकर

चैत्राची चाहूल लागताच निसर्गाची चक्र कशी झपाटय़ाने बदलू लागतात. शिशिरमधील गुलाबी थंडी जाऊन आता त्याची जागा रणरणत्या सूर्याने घेतली आहे. आपण घरातून कितीही फ्रेश होऊन ऑफिसमध्ये निघालो तरी कामावर आल्यावर जो आपला घाम निघतो तो वेगळाच. संध्याकाळी ऑफिसमधून दमून भागून घरी आल्यावर घरात काही छोटेसे बदल करून तुम्ही तुमचा मूड बदलू शकता, असं मी तुम्हाल सांगितलं तर? हो हे खरं आहे. त्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील.

घरातील पडदे : उन्हाळ्यात तुम्ही घरामध्ये फिकट रंगाच्या पडद्यांचा वापर करा. या फिकट रंगाच्या पडद्यांनी सूर्याची उष्णता शोषून घेतली तरी तुमचे घर थंड राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे घराची शोभा वाढेल. जर पडदे हातमागाचे असतील तर घराच्या सौंदर्यात अजूनच भर पडेल. तुमच्याकडे असणाऱ्या सुती साडय़ांचा वापर करून तुम्ही घरच्या घरीदेखील पडदे शिवू शकता. त्या पडद्यांना वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही मण्यांची माळ किंवा आरशाच्या माळा अशा शोभेच्या गोष्टींचा वापर करून तुम्ही पडदे अजूनच आकर्षक करू शकता. जर तुम्हाला घरातअजून वेगळेपणा आणायचा असेल तर बांबू किंवा जूट  यांपासून बनवलेल्या पडद्यांचा वापरसुद्धा करू शकता.

अभ्रे : रणरणत्या उन्हातून बाहेरून फिरून आल्यावर घरामध्ये जर डोळ्याला शांत करणारे रंग बघितले की आपले मन प्रसन्न होण्यास मदत होते. त्यामुळे उशांचे अभ्रे रंगीबेरंगी असूद्यात. घरात प्रवेश केल्यावर तुमची नजर प्रथम तुमच्या बठक व्यवस्थेवर जाते. त्यामुळे तिथे योग्य रंगाच्या चादरी आणि अभ्य्रांचा वापर केल्यास दिवसभरातील सर्व थकवा निघून जाण्यास मदत होईल. त्यामुळे उशांचे अभ्रे निवडताना जास्तीतजास्त उष्ण आणि शीत रंगाचा समावेश करा. तापमान जास्त वाढल्यास उशी, रग, काप्रेट यांचा वापर शक्यतो टाळावा.

बेडलायनर : बाहेरून थकून आल्यावर आपल्या हक्काची आराम करायची जागा म्हणजे आपली बेडरूम. त्यामुळे बेडरूममधील बेडलायनर जास्त भडक रंगाचे नसावेत. पांढरा किंवा शीत रंगाचा वापर येथे जास्त करावा. उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त वाढल्यास बेडवर झोपण्यापूर्वी तुमची बेडशीट १० मिनिटे शीतकपाटात म्हणजेच फ्रिजमध्ये ठेवा आणि मग त्याचा वापर करा. जर तुमच्या घरी एसी नसेल तर तुम्ही इजिप्शिअन पद्धतीचासुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये तुमची लिननची बेडशीट थोडी ओलसर करून ती तुम्ही अंगावर घेऊ शकता. ही पद्धत इजिप्तमध्ये वापरली जाते, त्यामुळे या पद्धतीला इजिप्शिअन पद्धत असे म्हणतात.

उन्हाळ्यातही घरात थंडावा राखण्यासाठी..

उन्हाळ्यामध्ये वाढणारे तापमान आणि धुलीकण या सर्वाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेक आजार पसरू शकतात. यांना प्रतिबंध घालण्यासाठी घरातील पडदे, उशांचे अभ्रे, रोजच्या वापरातील फडकी, स्वयंपाकघरातील फडकी, बेडलायनर (बेडशीट्स), यांची योग्यती स्वच्छता राखणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी धुताना त्या साध्या पाण्यात धुण्याऐवजी गरम पाण्यामध्ये धुतल्या तर त्यातील जंतूंचा मोठय़ा प्रमणात नायनाट होतो. त्याचप्रमाणे हे कपडे धुताना कपडे धुण्याच्या पावडरऐवजी लिक्विडचा वापर केला तर त्याचा जास्त फायदा होतो. त्याचप्रमाणे बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध असणाऱ्या इसेन्शल ऑइलचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता.

घरामध्ये थंडावा आणण्यासाठी एका भांडय़ामध्ये थंड पाणी ठेवा. त्या पाण्यामध्ये सजावटीसाठी फुलांचाही वापर तुम्ही करू शकता. यामुळे पाण्याचा संबंध हवेशी येतो आणि आपले घर थंड राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दिवसा टॉवेल ओला करून खिडकीवर ठेवावा. त्यामुळे घरामध्ये थंडावा वाढतो.

वरील गोष्टींचा वापर करून तुम्ही उन्हाळ्यातही गारवा अनुभवू शकता.

(लेखक टेक्स्टाइल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ आहेत.)

amit@vaacorp.in