घर घेताना प्रकल्पाच्या आराखडय़ाची, नकाशाची नीट माहिती करून घेतली नाही, तर आपल्या घरासमोर उजेड, हवा यांना अटकाव आणणारे अवाढव्य बांधकाम दररोज उठता-बसता बघितल्याशिवाय पर्यायच उरत नाही. हे सर्व टाळण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा नीट समजून घेऊनच घर घेतले पाहिजे.
घर घ्यायचे म्हणजे नुसत्या चार भिंती बघून, असा विचार करून आता चालत नाही. घर घेताना एक वेळा नव्हे, शंभर वेळा विचार करणे गरजेचे आहे. आजच्या प्रचंड महागाईच्या काळात तर आपल्या आयुष्यात जेमतेम एकदाच करता येईल अशी गुंतवणूक अशी ‘घरखरेदी’ची व्याख्या बनली आहे. त्यासाठी प्रत्येक खरेदीकर्त्यांने त्याबाबतचा अभ्यास करूनच घरबाजारात उतरावे.
शक्यतो घर खरेदी करताना आपण आपल्या गरजेनुसार व घरात राहणाऱ्या संख्येवर वन बीएचके, २ बीएचके व त्यापेक्षा मोठे म्हणजे ३ बीएचके घर घेण्याचे ठरवतो व घराचा ‘एरिया व रेट’ तसेच कोणत्या मजल्यावर राहायचे या गोष्टींवर घर खरेदीकर्त्यांचा जोर असतो.
तसं पाहिलं तर या सर्व घर खरेदीबाबतच्या प्राथमिक बाबी आहेतच, पण त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून बघणे आवश्यक असते. त्या जर बघितल्या नाहीत तर इमारत पूर्ण झाल्यावर आपण घराचा ताबा घेण्यास जातो त्यावेळी इमारतीच्या आजूबाजूला प्रकल्पांच्या इतर गोष्टी दिसत असतात. व घर घेतलेल्या इमारतीच्या आवारात विकासकाने ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ तयार केलेले असते. त्यामध्ये अनेक गाडय़ा पार्किंग करण्यासाठी तयार केलेले एकमजली, दुमजली पोडियम, त्यावर गार्डन व त्यामध्ये उंचच उंच स्विमिंग पूल असलेले क्लब हाऊस, अशी अनेक बांधकामे तयार झाल्यावर त्या जर आपण घेतलेल्या घराच्या समोर आल्या तर घराचा सर्व ‘व्ह्यू’, ‘लूक’ बदलून जातो. घर घेताना प्रकल्पाच्या आराखडय़ाची, नकाशाची नीट माहिती करून न घेतल्याने आपल्या घरासमोर उजेड, हवा अडवणारे अवाढव्य बांधकाम दररोज सकाळ-संध्याकाळ बघितल्याशिवाय पर्यायच उरत नाही. हे सर्व टाळण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा नीट समजून घेऊनच घर घेतले पाहिजे.
प्रकल्प आराखडा, नकाशा हा विकासकाच्या आक्र्टिकेक्चरकडून तयार केला जातो. त्यामध्ये इमारतींचा समूह, त्यांची संख्या, त्यांची सारखी किंवा वेगवेगळी उंची, आजूबाजूचा मोकळा भाग, मागचे-पुढचे रस्ते, येण्या-जाण्याचा आतील भागातील मार्ग, पार्किंगची व्यवस्था, गार्डन, खेळाचे साहित्य त्यांची मांडलेली जागा, क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल, स्विमिंग पूल, पाणी व शौचालयाच्या टाक्या, पंपरूम, इमारतीचे प्रवेशद्वार व एकंदरीतच प्रकल्पाची रचना इ.चा समावेश असतो. त्यानुसार त्या गृह प्रकल्पाचे ‘मॉडेल’ बनविले जाते. त्यामध्ये त्या प्रकल्पाची रचना मांडली जाते. ते बघितल्यावर लगेचच आपल्यासमोरचे चित्र स्पष्ट होते.
समजा, आपण पाचव्या मजल्यावर घर घेतल्यास त्या उंचीवरून आपल्याला नक्की बाहेर कोणता ‘व्ह्यू’ दिसू शकेल याचा अंदाज येतो व सर्व बाजूंनी विचार करूनच घर खरेदी करण्यास मदत होते. म्हणून प्रकल्पाचा नकाशा बघूनच घर घेतल्यास आपल्या मनातील, स्वप्नातील घर मिळाल्याचा आनंद मिळाल्यावाचून राहणार नाही!
अनेकदा घर घ्यायचेच आहे म्हणून घाईतच (हे घर आपल्या हातातून निसटून जाईल या भीतीने) घरखरेदीचे काम उरकले जाते. अशावेळी हवेची दिशा, वर्दळीचा रस्ता अशा गोष्टींचा फारसा गांभीर्याने विचार केला जात नाही.  घरात प्रत्यक्ष राहायला गेल्यावर मात्र या अडचणी प्रामुख्याने जाणवू लागतात. परंतु त्यावेळी पश्चाताप करण्यावाचून आपल्या हातात काहीही नसते. म्हणूनच घर घेताना उगीच घाई न करता या लहान-सहान, पण भविष्यात त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.