पुण्यातील बांधकाम व्यवसाय केवळ शहरापुरता मर्यादित न राहता पीएमआरडीए व उपनगरांमध्येही गतीने विस्तारला आहे. वाढती लोकसंख्या, शिक्षण व नोकरीच्या संधी आणि पायाभूत सुविधा यांमुळे पुणे हे एक उत्तम रिअल इस्टेट मार्केट म्हणून नावारूपाला येत आहे. हे शहर केवळ राहण्याच्या दृष्टीने नाही, तर गुंतवणुकीच्या दृष्टीनेही आज देशातील प्रमुख निवडक शहरांपैकी एक ठरते आहे.
पुणे मागील काही वर्षांत केवळ एक शिक्षण व औद्योगिक केंद्रच म्हणून ख्याती मिळवलेले शहर नाही, तर व्यवसाय, वैद्यकीय सुविधा असणारे केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. या व अशा सात- आठहून अधिक ग्रोथ इंजिन्सच्या जोरावर संपूर्ण जगभरात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून गृहनिर्माण क्षेत्रातदेखील झपाटय़ाने प्रगती झाली आणि होते आहे. मुंबई, बेंगळुरू, दिल्लीसारख्या इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्र अधिक परवडणारे आणि वेगाने विकसित होणारे ठरलेले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहराची वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण आणि पायाभूत सुविधांमध्ये होणारी सातत्यपूर्ण वाढ व गुंतवणूक.
घरांच्या व्यवहारात लक्षणीय वाढ
दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे जुलै २०२५ मध्ये सीआरई मॅट्रिक्स व पुणे मेट्रो क्रेडाई यांनी केलेल्या अभ्यास व सर्वेक्षणातून सादर करण्यात आलेल्या संयुक्त अहवालात, २०२५च्या पहिल्या सहामाहीत पुण्याने ३३ हजार कोटी रुपये किंमतीच्या ४३ हजार ६०० सदनिकांच्या विक्रीसह भारतीय गृहनिर्माण क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले आहे. पुण्यातील घरांची सरासरी किंमत ७५ लाखांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे ते सलग पाचव्या वर्षी भारतातील सर्वाधिक विक्री होणारे आणि सर्वात परवडणारे महानगर होण्याचा मान पुणे महानगराला मिळाला आहे. दरम्यान मागील दोन वर्षांत ही घरांची किंमत वाढलेली असली तरी पुणे महानगर क्षेत्रात आजही लक्षणीय प्रमाणात वन बीएचके, टू बीएचकेच्या सदनिकांची उपलब्धता आहे. जी काही प्रमाणात आवाक्यातही आहे. पण करोनाच्या आपदेनंतर अनेक घरखरेदीदार मोठय़ा आकाराच्या घरांच्या खरेदीला प्राधान्य देताना दिसतात.
तर आणखी एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, २०१९ च्या करोना काळ व त्यानंतरच्या व्यवसायाच्या तुलनेत २०२४ पर्यंत पुण्यातील रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये सुमारे ९०% वाढ झाली आहे. ही वाढ हे स्पष्टपणे दर्शवते की, नवीन प्रकल्पांची संख्या वाढत असून, विविध भागांत फ्लॅट्स, दुकाने, ऑफिस स्पेसेस मोठय़ा प्रमाणावर विकली जात आहेत. तसेच ग्राहकांचा पुणे शहराच्या घरबांधणी आणि व्यावसायिक प्रकल्पांवरील विश्वास वाढतोच आहे.
परवडणाऱ्या किमती आणि दर्जेदार बांधकाम
पुण्याची एक मोठी खासियत म्हणजे ते इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत परवडणारे आहे. मुंबईतील एका छोटय़ा फ्लॅटच्या किमतीत पुण्यात त्या तुलनेत अधिक मोठा, सुविधायुक्त सदनिक सहजपणे उपलब्ध होते. त्यामुळे पुणे हे केवळ स्थानिक नव्हे तर स्थलांतरित होणाऱ्या व सामान्य घरखरेदीदारांसाठी व गुंतवणूकदारांनाही इथले गृहनिर्माण क्षेत्र आकर्षित करताना दिसते आहे.
पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक
शहरातील विविध उपनगर व भागात मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, उड्डाणपूलांचे जाळे, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुधारणा, उद्याने आणि हरित क्षेत्रांची वाढ या सर्व गोष्टींनी पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्राला चालना दिली आहे. आयटी पार्क, शॉपिंग मॉल्स आणि मिश्र-वापराचे प्रकल्प शहराच्या उपनगरांमध्ये गतीने विकसित होताना दिसत आहेत. त्यामुळे त्या भागात राहण्यासाठी तसेच व्यवसाय उभारण्यासाठी चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.
सोसायटी पुनर्विकासाला गती
पुणे शहरात अनेक जुन्या सोसायटय़ांचे पुनर्विकासाचे प्रकल्प वेगाने सुरू झाले आहेत. या प्रकल्पांमधून नव्या, अधिक प्रशस्त आणि आरामदायी सदनिक उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सदनिकांना शहरात राहणाऱ्या उच्च व उच्च-मध्यमवर्गीय घर खरेदीदारांकडून मोठी मागणी आहे. परिणामी पुनर्विकास क्षेत्र हे पुण्यातील बांधकाम व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग बनते आहे. शहरातील कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रोड, मॉडेल कॉलनी, सहकार नगर, बाणेर, औंध, कल्याणी नगर या प्रमुख उपनगर व भागात पुनर्विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिक संख्येने असलेले दिसतात. यासोबत शहराच्या इतर भागांतदेखील खासगी बंगले वा इमारतींचा पुनर्विकासाला गती येत असल्याचे दिसते.
पीएमआरडीए अंतर्गत भागांचा विकास
बृहद पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधीकरण (PMRDA) अंतर्गत येणारे बावधन, बाणेर- बालेवाडी, हिंजवडी, वाकड, मामूर्डी, पिंपरी चिंचवड, पिंपळे सौदागर, मोशी, चहरेली चाकण, तळेगाव ही उपनगरे गृहनिर्माण क्षेत्रासाठी नवी लोकप्रिय केंद्रे बनत आहेत. विशेषत: चाकण हे एमआयडीसी, वाहन उद्योग आणि आता आयटी पार्कमुळे व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. मिश्र-वापराचे प्रकल्प आणि आधुनिक टाऊनशिप्स यामुळे चाकणमध्ये राहण्यासाठी आणि कामासाठी दोन्ही प्रकारच्या संधी वाढत आहेत. इथे म्हाडा सारख्या शासकीय यंत्रणेतून उभारण्यात आलेले आवाक्यातील प्रकल्पदेखील आहेत.
विकसनशील उपनगरे..
पुण्याचा पश्चिम द्रुतगती महामार्ग हा विकासाचा व लोकप्रिय उपगनरांचा महामार्ग ठरतो आहे. वाकड, बावधन, रावेत, किवळे, मामूर्डी हे भाग नव्या निवासी व व्यावसायिक प्रकल्प मोठय़ा संख्येने उभा राहत आहेत. या ठिकाणी रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स, आयटी ऑफिसेस आणि शॉपिंग कॉम्पलेक्स तयार झाले आहेत. होतही आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हे भाग आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि चाकण एमआयडीसी हे भाग विशेषत: कमर्शिअल रिअल इस्टेटसाठी उदयोन्मुख ठिकाणे म्हणून ओळखले जात आहेत. इथले भाडे आणि विक्रीचे दर परवडणारे असूनही मागणी सतत वाढते आहे.
पुण्यातील बांधकाम व्यवसाय केवळ शहरापुरता मर्यादित न राहता पीएमआरडीए व उपनगरांमध्येही गतीने विस्तारला आहे. वाढती लोकसंख्या, शिक्षण व नोकरीच्या संधी आणि पायाभूत सुविधा यांमुळे पुणे हे एक उत्तम रिअल इस्टेट मार्केट म्हणून नावारूपाला येत आहे. हे शहर केवळ राहण्याच्या दृष्टीने नाही, तर गुंतवणुकीच्या दृष्टीनेही आज देशातील प्रमुख निवडक शहरांपैकी एक ठरते आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बांधकाम व्यवसायाचा भविष्यातील प्रवास अधिक भक्कम आणि वेगवान असणार, हे निश्चित.
(लेखक पुणे स्थित रिअल इस्टेट क्षेत्राचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)