‘वास्तुरंग’ (२० जुलै)मधील शरद भाटे यांचा ‘जुनी घरे, जुने शब्द’ हा लेख माझ्या मनातल्या निळ्या पाखराला एक अनामिक अशी हुरहूरच नव्हे तर एक चुटपूटही लावून क्षणार्धात लहानपणीच हरवलेल्या गावी घेऊन गेला.  अष्टागरातल्या अलिबाग तालुक्यातील ‘चौल’ या गावी सुरेश भट यांनी आपल्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते.’ मातीच्या िभती असलेले आमचे साधेसुधे कुडा-मेढींचे एक जुने घर होते. नेहमीप्रमाणे आणि कोकणातल्या परंपरेप्रमाणे आजोबांच्या मृत्यूनंतर आम्ही आमच्या त्या घरालाच नव्हे, तर त्या निसर्गरम्य गावालाही कायमचे मुकलो.
शरद भाटे यांचा लेख वाचून मी पुन्हा एकदा लहान झालो आणि मन वायुवेगाने त्या भूतकाळातल्या घरात पाकोळीसारखे भिरभिरून आले आणि मला काळाच्या उदरात लुप्त झालेले त्या वेळचे काही शब्द आठवले. काही आठवणी मनात रुंजी घालून गेल्या.
प्रत्येक घरात त्या वेळी निदान एकतरी लाल ‘आलवणा’तली केसांचे ‘वपन’ केलेली आजी असायची. ती सकाळी कौलारातून झिरपणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या तिरप्या कवडशांनी उजळलेल्या आणि चुलीच्या निळसर धुराने भरलेल्या स्वयंपाक खोलीत चकचकीत ‘पितळी’ कपबशीतून (गाळणी नव्हे तर) फडक्याने पिळून पिळून गाळलेला कढत कढत (‘गरम’ शब्दाला ती मजा नाही आणि तो प्रसन्न स्पर्शही नाही) गुळाचा चहा एखादे कटू कर्तव्य एकदाचे पार पडावे तशी ‘पिऊन टाकत’ असे. दिवसभर कामाच्या रामरगाडय़ाला जुंपून घेत असे. दुपारी तिच्यासाठी परंपरेने राखून ठेवलेल्या ‘अंधाऱ्या’ खोलीत उशाला लाकडी पाट घेऊन अंग आखडून घेऊन ती बिचारी उगाच जराशी ‘डुलकी’ काढत असे, त्यानंतर पुन्हा ‘रामरगाडा’ चालू होत असे.  
घराच्या मागच्या पडवीमागे आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी एक ‘चुल्हाणे’ असे आणि त्यावर एक मोठे बुडाशी ठार काळे झालेले मोठे ‘तपेले’ असे आणि ‘कढत’ पाणी उपसण्यासाठी बाजूलाच हाताशी एक नारळाच्या एका मोठय़ा करवंटीपासून बनवलेले एक लांब दांडीचे एक ‘ओगराळे’ ठेवलेले असे. घरोघरी पाणी तापविण्यासाठी (‘लाकडे’ नव्हे) ‘फाटी’ आणि ‘पातेरा’ किंवा ‘पालापाचोळा’ जाळण्यात येत असे आणि त्याचा आसमंतात एक मस्त, खमंग, सुगंधी धूर दरवळत आणि रेंगाळत असे. काही सधन घरांत पाणी तापविण्याचा तांब्याचा ‘बंब’ असे. आंघोळी झाल्यानंतर आपल्याच बागेतली जास्वंदी, तगरी, सोनटक्का, अनंत किंवा अशाच उपलब्ध फुलांनी आजोबा किंवा मोठे काका घरच्या देवांची ‘यथासांग’ पूजा करीत असत. त्यानंतर ओंजळीत मिळणाऱ्या तीर्थाचा थंडावा, आनंद आणि समाधान ‘फ्रीज’च्या ‘चिल्ड’ पाण्याला नाही.
‘मागील दारी’ (परसदारी) गुरांचा गोठा असे. मागे विहिरीवर एक बलाचा ‘रहाट’ असे आणि सकाळच्या वेळी सगळ्या वाडय़ांमध्ये सुरू असलेल्या रहाटांचा वेगवेगळ्या पट्टीतला एक खर्जातला मधुर गंभीर ध्वनी गुंजत असे. विहिरीच्या शेजारी पाण्याची एक मोठी दगडी ‘डोण’ असे. माडा-पोफळीच्या खाली पाणी वाया जाऊ नये म्हणून मातीची ‘आळी’ केलेली असत आणि त्यांना आणि एकूणच ‘वाडी’ ला पाणी घालण्याच्या क्रियेला ‘िशपण’ म्हणत असत (त्या वेळी माणसे ‘परसा’कडे जात असत).
स्वयंपाकघरात निरनिराळ्या नावांची भांडी असत. उदा.- ठोक्याचे पातेले, तसराळे, पितळी, वेळणी, बोगणी, ओगराळे, गंज (खापरपोळ्या करण्यासाठी), मातीचे खापर, चीनी मातीचे ‘सट’, कालथे, सांडश्या वगरे.. लोणची, मुरंबे साठविण्यासाठी मोठमोठय़ा चीनी मातीच्या बरण्या असत आणि त्यांना फडक्यांचे ‘दादरे’ बांधलेले असत. मीठ, चिंचा, आमसुले ठेवण्यासाठी ‘रांजण’ असत.  गेले ते गाव, गेले ते दिवस, गेल्या त्या वास्तू आणि ते शब्दही..
– सुभाष जोशी, ठाणे

जुन्या शब्दांची स्मरणयात्रा
‘जुने घर, जुने शब्द’ हा लेख वाचून पडवी, ओटी, माजघर, देवघर, बाळंतणीची खोली, फडताळ, जाळीचं कपाट, भिंतीवरचं स्टँड, रहाट, दगडी, टमरेल हे शब्द आठवले.
– मकरंद पाटणकर

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

आजोळची आठवण झाली
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ हा लेख वाचून कोकणात आजोळी गेल्यासारखे वाटले. प्रत्यक्ष गावात न जाता कोकणात गेल्याचा पुरेपूर आनंद या लेखातून मिळाला.
– महेश मराठे

गावच्या घराची आठवण
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ हा लेख वाचून गावच्या घरातील लहानपणीच्या आमच्या घराची तीव्रतेने आठवण झाली. अशा माहितीपूर्ण लेखाबद्दल लेखकाचे आभार.
– डॉ. शुभा मोघे

मनाला भावणारा लेख
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ हा लेख मनाला खूपच भावला. आधुनिकतेच्या जमान्यातही असे जुने शब्द मातृभूमीची ओढ लावतात आणि गावच्या मातीचा सुगंध घेऊन येत असतात. या लेखाबद्दल लेखकाचा खूप आभारी आहे.
– विजय कांबळे

जीव रमवणारे शब्द
शरद भाटे यांच्या ‘जुने घर जुने शब्द’ या लेखातील जुन्या, कौलारू, बैठय़ा घरांशी संबंधित विशिष्ट शब्द खूप भावले, आवडले. त्याचबरोबर जुन्या घरांच्या स्मृती जाग्या झाल्या. नव्या पिढीला हे वर्णन वाचून खूप नवल, आश्चर्य, कुतूहल वाटले असेल. अशा घरांमध्ये माणसे एकत्र, एकदिलाने नांदत होती. अशा घरांची मजा काही औरच होती.
या घरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या घरांच्या परसातील कोपऱ्यात असलेली ‘शेणकई’ (कंपोष्टखड्डा) या खडय़ात घरातील भाज्यांची टरफले, घरासभोवतालचा पालापाचोळा तसे गाई-गुरांचे मल-मूत्र इत्यादी साठविले जाई. घरासभोवतालच्या स्वच्छतेबरोबरच शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खतांची नैसर्गिकरीत्या निर्मिती केली जाई. पर्यावरणरक्षणाबरोबरच शेतीही किफायतीशीर होई. या सर्व गोष्टींची आठवण झाली की ते घर आणि संबंधित गोष्टींशी जुळलेली नाती आठवतात, आठवणी दाटतात.. पसरलेल्या धुक्याप्रमाणे!
– कीर्तिकुमार वर्तक, वसई

माझ्याच घराचे मूर्तिमंत दर्शन
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ यांचा लेख जुन्या काळात घेऊन गेला. मी लहानपणी सुट्टीत आईच्या घरी आंजल्र्याला जात असे, ते घर अगदी या लेखातील घरासारखे आणि त्याच वस्तूंनी भरलेले होते. लहानपणीच्या त्या आठवणी माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान ठेवा आहे.  या लेखाच्या निमित्ताने माझ्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
– सुधीर जोशी

छान लेख
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ यांचा लेख वाचला आणि तो छान वाटला.
– नरेंद्र लिमये, डोंबिवली.

जुन्या शब्दांची आठवण
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ यांचा लेख वाचला आणि माझे आजोळचे कोकणातील घर (कुलाबा जिल्ह्यातील तळे) डोळ्यासमोर उभे राहिले. जुने शब्द वाचून, आठवूनही मनाला खूप आनंद होतो. लेखकाने घराचे व घरातील वस्तूंचे हुबेहूब वर्णन केले आहे.
– शरद लेले

सृजनाचा स्टुडिओ
वास्तुरंग (३ ऑगस्ट)मधील साधना बहुळकरांच्या स्टुडिओ या सदरात वसईतील शिल्पकार सचिन चौधरी यांच्यावरचा काष्ठ ‘सृजन’ हा लेख वाचला. वाघोलीसारख्या छोटय़ा गावात जन्मून आणि वाढून शिल्पकला शिकण्याचा आणि त्याच गावात स्टुडिओ उभारून व्यवसाय करण्याचा सचिन चौधरी यांचा ध्यास कौतुकास्पद आहे. त्यांच्या स्टुडिओचे सुंदर शब्दचित्र बहुळकरांनी या लेखात चितारले आहे. वसईत शिल्पकारांची जुनी परंपरा आहे. सुप्रसिद्ध  शिल्पकार दुष्यंत हटकर, काष्ठ शिल्पकार सिक्वेरा बंधू यांनी जगभरात कीर्ती संपादन केली. ही परंपरा पुढे हटकर आणि सिक्वेरांची पुढली पिढी, शेखर वेचलेकर इ. अनेकांनी सुरू ठेवली आहे. या परंपरेत सचिन चौधरी हे महत्त्वाचे नाव आहे. साधना बहुळकरांनी स्टुडिओबरोबरच चौधरी यांच्या अंतरंगाचेही दर्शन घडविले आहे. त्यांच्या या स्टुडिओला भेट देण्याची एक अनिवार इच्छा या लेखामुळे उत्पन्न झाली.
– विलास पागार, वसई, ठाणे.