25 February 2021

News Flash

‘गोपनीयता हक्का’चे आद्य भाष्यकार

आज गोपनीयतेला ‘मानवी अधिकार’ समजण्याच्या या दुसऱ्या व्याख्येला अधिक मान्यता मिळाली आहे

(संग्रहित छायाचित्र)

अमृतांशु नेरुरकर

गोपनीयता हा ‘मानवी अधिकार’ आहे, या मतास आता व्यापक मान्यता मिळू लागली असली, तरी हे मत सुसूत्रपणे मांडण्याचे आणि एकंदरीतच या संकल्पनेची पायाभरणी करण्याचे श्रेय १९ व्या शतकातील दोन विधिज्ञांना जाते..

गोपनीयता (प्रायव्हसी) म्हणजे काय? गेल्या काही लेखांत आपण आपल्या माहितीच्या गोपनीयतेला व खासगीपणाच्या जपणुकीला व्यक्तीचा ‘अधिकार’ किंवा ‘हक्क’ अशा अर्थाने संबोधले. तसे पाहिले तर ही व्याख्या अर्धवट आहे, कारण इथे आपण नक्की कोणत्या हक्काबद्दल बोलत आहोत? गोपनीयता हा मालमत्तेचा हक्क आहे का? काही तज्ज्ञांनी असे सूचित केलेय.

त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीची वैयक्तिक माहिती ही तिची खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे या मालमत्तेला सुरक्षित व गोपनीय ठेवण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवा. या पद्धतीने जर गोपनीयतेची व्याख्या करायला गेले तर तिची तुलना एका नोटा भरलेल्या बॅगेशी करू शकतो. तिला एक निश्चित मूल्य आहे, जे मोजले जाऊ शकते. कोणत्याही स्थावरजंगम मालमत्तेप्रमाणे तिची खरेदी-विक्री होऊ शकते. गोपनीयतेचा या दृष्टिकोनातून विचार करणारे तिला एक मूर्त स्वरूप देऊ इच्छितात.

गोपनीयतेचा एक अमूर्त संकल्पना म्हणून विचार करणारे मात्र तिला वरील दृष्टिकोनातून पाहात नाहीत. त्यांच्या मताप्रमाणे, गोपनीयता हा प्रत्येक व्यक्तीला जन्मजात मिळालेला मानवी अधिकार आहे. ही मंडळी खासगीपणाच्या अधिकाराची थेट अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मानवी मूल्यांमध्ये गणना करतात. या मांडणीनुसार, गोपनीयतेला भलेही थेट पैशांत मोजता येत नसेल, पण तिच्या तडजोडीची वा उल्लंघनाची जबर किंमत आर्थिक, मानसिक, सामाजिक अशा विविध स्तरांवर व्यक्तीला द्यावी लागते.

आज गोपनीयतेला ‘मानवी अधिकार’ समजण्याच्या या दुसऱ्या व्याख्येला अधिक मान्यता मिळाली आहे. ही विचारधारा सुसूत्रपणे मांडण्याचे, त्याचा विस्तृत तात्त्विक ऊहापोह करण्याचे आणि एकंदरीतच या संकल्पनेची पायाभरणी करण्याचे श्रेय नि:संशयपणे अमेरिकेच्या जगद्विख्यात हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतलेल्या दोन विधिज्ञांना जाते. सॅम्युएल वॉरन व लुइस ब्रॅण्डाइस हे ते दोन महानुभाव!

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध चालू होता. अमेरिकेत या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात उलथापालथ होत होती. मुद्रण तंत्रज्ञान बरेच विकसित झालेच होते, पण त्याच्याच जोडीला माहितीच्या सुलभ देवाणघेवाणीसाठी नवनवीन तंत्रज्ञान जन्म घेत होते. अलेक्झांडर ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावून संपर्कक्रांती घडवली. तारसेवेच्या (टेलिग्राम) उदयानंतर माहितीचे वहन दीर्घ अंतरावर जलदगतीने करणे सहजशक्य झाले. त्याच सुमारास कोडॅकने बाजारात आणलेल्या सुटसुटीत व सहजगत्या हाताळता येईल अशा पोर्टेबल कॅमेऱ्याने छायाचित्रणाच्या तंत्रावरची तज्ज्ञांची मक्तेदारी मोडीत काढली. हे क्षेत्र जनसामान्यांना खुले झाल्याने १९ व्या शतकाच्या अंतापर्यंत छायाचित्रणाला एक छंद म्हणून जोपासणाऱ्यांची संख्या कैक पटींनी वाढली.

या तांत्रिक प्रगतीचे फलित म्हणून की काय, पण याच काळात वृत्तपत्रांचा व्यवसाय जोमाने वाढत होता. वृत्तपत्र वाचणाऱ्यांमध्ये दर्दी कमी होऊन गर्दी वाढल्याने वृत्तपत्रांमध्ये सवंग, भडक, चमचमीत असे काही तरी वाचायला मिळावे अशी अपेक्षा वाढत होती. तारसेवेमुळे देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात बातम्या पोहोचवणे आता तितकेसे कठीण राहिले नव्हते. कॅमेऱ्यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावणे व त्यातील काही महत्त्वाचे क्षण टिपणे सहज शक्य होत होते. या सर्वाचा यथायोग्य वापर करून लोकांचे (विशेषत: समाजातील प्रसिद्ध, प्रतिष्ठित, उच्चभ्रू व्यक्तींची) खासगी आयुष्य चव्हाटय़ावर आणणारी तृतीयपर्णी (पेज थ्री) सवंग पत्रकारिता (येलो जर्नालिझम) फोफावत होती.

तंत्रज्ञानामुळे व्यक्तीच्या गोपनीयतेशी होणारी तडजोड व खासगीपण जपण्यावर येणाऱ्या मर्यादांचे वॉरन आणि ब्रॅण्डाइस बारकाईने निरीक्षण करत होते. दोघेही नुकतेच कायद्याचे पदवीधर झाले होते. हार्वर्डमध्ये एकत्र शिकताना राजकीय-सामाजिक मते, आवडीनिवडी जुळल्यामुळे महाविद्यालयातच दोघांत मैत्रीचे बंध निर्माण झाले होते. शिक्षण झाल्यावर दोघांनी ‘वॉरन अ‍ॅण्ड ब्रॅण्डाइस’ याच नावाने विधिविषयक सल्ला देणारी कंपनी अमेरिकेतल्या बॉस्टन शहरात चालू केली होती, जी अल्पावधीतच यशस्वी झाली.

दिवसेंदिवस त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या फायद्यांबरोबरच खासगीपणाचे होणारे सर्रास उल्लंघन ते दोघेही अनुभवत होते. गोपनीयता हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे असे दोघांचेही ठाम मत होते. त्या वेळी अस्तित्वात असलेले अमेरिकी कायदेकानून या अधिकाराचे जराही संरक्षण करत नाहीत याची त्यांना खात्री होती. व्यक्तीच्या गोपनीयतेची गरज विशद करण्यासाठी, तंत्रज्ञानाच्या रेटय़ात गोपनीयतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि गोपनीयतेच्या अधिकाराची कायदेशीर बैठक मांडण्यासाठी वॉरन आणि ब्रॅण्डाइसनी संयुक्तपणे ‘हार्वर्ड लॉ रिव्ह्य़ू’ या हार्वर्डच्याच प्रथितयश नियतकालिकात १८९० साली ‘राइट टु प्रायव्हसी (गोपनीयतेचा अधिकार)’ या शीर्षकाचा एक दीर्घ लेख लिहिला. केवळ अमेरिकीच नाही तर जगभरातील कायदेप्रणालींवर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या साहित्यांपैकी एक म्हणून हा लेख आजही ओळखला जातो. ‘हार्वर्ड लॉ रिव्ह्य़ू’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांमधला सर्वाधिक वेळा संदर्भ दिला गेलेला लेख म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.

या लेखाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. वॉरनचे सासरे हे अमेरिकी संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. त्यांच्या घरातल्या एका खासगी समारंभाचे वृत्तांकन करण्यासाठी अनेक वार्ताहर अनधिकृतरीत्या समारंभस्थळी पोहोचले होते. त्यांच्या जाचापासून कायदेशीरपणे मुक्ती मिळवण्यासाठी असा लेख लिहिण्याची ऊर्मी वॉरनला मिळाली असावी. असेही म्हटले जाते की, वॉरनचा धाकटा भाऊ एडवर्ड हा समलिंगी होता. त्या काळात अमेरिकेत समलिंगी संबंधांना कायदेशीर सोडाच, पण सामाजिक मान्यताही नव्हती. किंबहुना अशा व्यक्तींकडे घृणास्पद नजरेने बघितले जाई व त्यांना समाजात तुच्छतेची वागणूक मिळे. स्वत:च्या समलिंगी वर्तनाला गोपनीय ठेवण्याचा अधिकार आपल्या भावाला मिळावा व त्यामुळे त्याची आणि पर्यायाने वॉरन कुटुंबीयांची सामाजिक कुचंबणा होऊ नये या प्रेरणेतून हा लेख लिहिण्याची कल्पना वॉरनला सुचली असावी.

या लेखात वॉरन आणि ब्रॅण्डाइस यांनी गोपनीयतेला व्यक्तीचा ‘एकांत जतन करण्याचा अधिकार (राइट टु बी लेट अलोन)’ असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर केवळ तिचाच अधिकार आहे आणि या खासगीपणाचे उल्लंघन करून कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्याला सार्वजनिक करणे हा दंडनीय अपराध मानायला हवा, असे ठाम प्रतिपादन त्यांनी या लेखात केले. विशेषत: त्यांचा रोख अमेरिकेत रुजत असलेल्या वृत्तपत्रांच्या तृतीयपर्णी संस्कृतीकडे होता.

या विषयाचा कायदेशीर दृष्टिकोनातून बराच ऊहापोह पुढे या लेखात करण्यात आला आहे, जो जिज्ञासूंनी जरूर वाचावा. दोन कारणांसाठी हा लेख कालातीत ठरतो. एक म्हणजे, गोपनीयता हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे हे नि:संदिग्धपणे या लेखात मांडण्यात आले आहे, जे त्यापूर्वी कधीही झाले नव्हते. एवढेच नव्हे, तर व्यक्तीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य टिकवण्यासाठी तिच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे आत्यंतिक गरजेचे आहे, असेही लेखात सुचवण्यात आलेय.

दुसरी गोष्ट (जी या लेखमालेसंदर्भात महत्त्वाची आहे) म्हणजे, गोपनीयतेची पायमल्ली करण्यामध्ये तंत्रज्ञान एक महत्त्वाचे साधन असल्याचे लेखात सोदाहरण स्पष्ट केले आहे. वॉरन आणि ब्रॅण्डाइस स्पष्टपणे म्हणतात की, तंत्रज्ञानामुळे माहितीचे संकलन व प्रसारण एका विशाल समुदायाबरोबर अत्यंत वेगाने होऊ शकते. लक्षात घ्या की, हे निरीक्षण जरी १८९० साली केले गेले असले तरीही १३० वर्षांनंतरच्या आजच्या परिस्थितीलाही तितकेच चपखलपणे लागू होते. या लेखाला कालजयी का म्हटले गेलेय हे यातून स्पष्ट होईल.

कौटुंबिक कलहांमुळे वॉरनने पुढे आत्महत्या केली; पण लुइस ब्रॅण्डाइस चांगलाच नावारूपास आला. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश म्हणून त्याची कारकीर्द पुष्कळ गाजली. माहितीची सुरक्षा व गोपनीयतेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निकाल त्याने दिले. एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील सर्वात आदरणीय सरन्यायाधीश म्हणून ब्रॅण्डाइसलाच पसंती देण्यात आली होती.

वॉरन आणि ब्रॅण्डाइसनी रचलेल्या या पायावर पुढे अनेक प्रतिभावंतांनी या संकल्पनेचा विस्तार केला, त्याचा आढावा पुढील लेखात घेऊ.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2021 12:08 am

Web Title: article on first commentator on the right to privacy abn 97
Next Stories
1 मुद्रणक्रांतीनंतरची गोपनीयता..
2 खासगीपणाच्या भिंती..
Just Now!
X