13 July 2020

News Flash

आता पुतण्यांच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी

यंदाची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची असली तरी राजकारणातील पुतण्यांच्या कारकीर्दीची कसोटी पाहणारी आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

| October 15, 2014 04:22 am

यंदाची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची असली तरी राजकारणातील पुतण्यांच्या कारकीर्दीची कसोटी पाहणारी आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांच्या कर्तृत्वाचा कस लागणार असून यश मिळाले तर राजकीय पत टिकणार अन्यथा जोरदार झटका बसण्याची चिन्हे असल्याने या सर्व राजकीय पुतण्यांची पुरती झोप उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीतील निकालाची विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती होण्याच्या आशेने भाजपात सध्या जोश असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेनेही आपले राजकीय अस्तित्व दावणीला लावले आहे. त्यामुळे काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच या इराद्याने सर्वच पक्ष कामाला लागल्याने यंदा कधी नव्हे इतकी निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असला तरी खरी कसोटी आहे ती पुतण्यांची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवखा पक्ष असूनही मनसेला चांगले यश मिळाले होते. यंदा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवास झाल्याने आता मनसेची ताकद कमी झाल्याची चर्चा आहे. आता विधानसभेत चांगल्या जागा मिळाल्या नाहीत तर मनसेला असलेले राजकीय वलय फिके पडण्याची भीती असल्याने विधानसभेची ही निवडणूक राज ठाकरे यांच्या भवितव्यासाठी कळीची आहे.
राज ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवारांचे पुतणे आणि मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचा कसही या निवडणुकीत लागत आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ मोठय़ाप्रमाणात घटले तर पक्षातील अजित पवारांचे वर्चस्व कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारही ईर्षेने प्रचार करत आहेत.
भाजपमधील मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या आणखी एका पुतण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजपच्या माजीमंत्री शोभाताई फडणवीस याचे देवेंद्र हे पुतणे. भाजपची सत्ता आली तर संभाव्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांचे नाव घेतले जाते. मात्र, भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही तर शिवसेनेसोबतची युती तोडल्याचे अपश्रेय त्यांच्या माथी मारले जाईल.
या प्रमुख नेत्यांबरोबरच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे परळीतून चुलत बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात रिंगणात आहेत. विजय मिळाल्यास ते जायंट किलर ठरतील. तर पराभव झाल्यास त्यांचेही राजकीय अस्तित्व पणाला लागेल. अशीच स्थिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांची आहे. तर राज ठाकरे यांचे पुतणे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र अदित्य ठाकरे यांच्याही राजकीय कारकीर्दीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. यश आल्यास तरुण नेता म्हणून उदयास येण्याची संधी मिळेल. अन्यथा आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2014 4:22 am

Web Title: political existence tests for ajit pawar raj thackeray and devendra fadnavis
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!
2 पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष मतदारांच्या ‘नोटां’वर
3 आरक्षणाचा विषय अडगळीत
Just Now!
X