सरकारच्या विरोधात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चेबांधणी करण्याच्या निमित्ताने पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील पक्षांनी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न पुन्हा चालवला आहे. भाजपला तोंड देण्यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या पुढाकाराने संयुक्त जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल, लोकदल, राष्ट्रीय जनता दल व एसजेपी यांची बैठक झाली.
संसदेत हे पक्ष एकदिलाने काम करतील, असे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. मुलायमसिंह यादव यांनी या पक्षांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतल्याबद्दल नितीशकुमार यांनी कौतुक केले. भविष्यात या पक्षांचे विलीनीकरण नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. मुलायमसिंह यादव यांनी या नेत्यांना भोजनाला आमंत्रित करून भाजपविरोधी नवी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काँग्रेस व डाव्या पक्षाच्या नेत्यांना याचे निमंत्रण नव्हते, त्याबाबत विचारले असता, जे आमच्या भूमिकेशी सहमत आहेत त्यांच्याशीच संपर्क साधल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली. मात्र कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट
केले.
भाजपवर त्यांनी टीकास्त्र सोडले. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन त्यांनी प्रचारात दिले. मात्र आता त्या मुद्दय़ावर सरकारने नेमकी विरुद्ध भूमिका घेतल्याचा आरोप नितीशकुमारांनी केला.