21 January 2021

News Flash

पुरुषार्थ (जीवनोद्देश) विश्लेषण

माणूस हा कंटाळा येऊ शकणारा आणि कंटाळा टाळू पाहणारा प्राणी आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

दर्शनांमध्ये येणाऱ्या अंतिम सत्याच्या विचारांपेक्षा, त्यांत येणारा पुरुषार्थ-विचार खरा महत्त्वाचा असतो. इथे पुरुषार्थ म्हणजे ‘नर-पराक्रम’ नव्हे.

हिंदू जीवनदृष्टीतील, ओज क्षीण करणारी वैशिष्टय़े, गेल्या वेळी आपण पाहिली. तीत सुधारणा करताना पारंपरिक पुरुषार्थ-विचाराचे नवे अर्थाकन कसे करता येईल? ते आज पाहू. मनुष्याने जीवनात कोणत्या उद्देशांचा पाठपुरावा करणे हिताचे आहे? व्हॉट आर प्रॉपर ह्यूमन पस्र्यूट्स? या प्रश्नाचा विचार म्हणजे पुरुषार्थ-विचार. आपल्याकडे या विचाराची परंपरा आहे म्हणून तेच नाव कायम ठेवले आहे. (पुरुष = जीव, अर्थ = प्रयोजन) काम , अर्थ, धर्म, मोक्ष हा क्रम अधिक योग्य आहे, कारण तो प्राण्याच्या सहजोर्मीकडून उच्चतर मानवी प्रयोजनांकडे जाणारा क्रम आहे. त्यांचे अर्थ काय आहेत? काम= इच्छापूर्ती, अर्थ= साधनसंपन्नता, धर्म= नियमपालन, मोक्ष= आत्मस्थता असे अर्थ लावणे हे मला त्यांच्या सारकल्पनांशी सुसंगत वाटते. या चारही पुरुषार्थ-कल्पनांमध्ये काही अडचणी, अनुत्तरित प्रश्न व विसंगती आढळतात. पण प्रत्येकाचे दोन घटक स्वतंत्र मानले, तर सर्वाचाच उलगडा नेमकेपणाने होतो. म्हणून आपण चार जोडय़ा , म्हणजेच आठ पुरुषार्थ निश्चित करणार आहोत.

‘काम’ हा सर्वाधिक समस्याग्रस्त पुरुषार्थ आहे. सेक्स जरी ‘काम’मध्ये मोडत असला, तरी काम म्हणजे सेक्सच, असे अजिबात नाही. डिझायर म्हणजे इच्छा या व्यापक अर्थाने ‘काम’ हा शब्द येतो. म्हणजेच तहान, भूक, सुरक्षितता, वात्सल्यादि सहजोर्मीसुद्धा (इन्स्टिंक्ट्स) ‘काम’ मध्ये येतात. इच्छा ही जर सहजवृतीच असेल तर, ‘सहेतुकपणे नेटाने पाठपुरावा करा’ असा उपदेश करण्याची गरजच का पडावी? इच्छा ही गोष्ट सर्वच यत्नांमागे असतेच. तिचा उपदेश करणे अनावश्यकही आहे.

त्याहून आश्चर्याची आणि अडचणीची ठरणारी गोष्ट अशी की ‘काम’ हा पुरुषार्थ म्हणूनही गणला गेला आहे आणि रिपू (दुर्गुण) म्हणूनही नोंदला गेला आहे. इतकेच नव्हे तर गीतेत त्याला नरकद्वार क्रमांक एक हे स्थान देण्यात आलेले आहे (१६.२१). त्यामुळे प्रजननाच्या हेतूने असेल तर (१०.२८)  आणि धर्माविरुद्ध नसेल तर (७.११) निषिद्ध नाही, अशा परवानग्या द्याव्या लागलेल्या आहेत. जर मूलत: दुरित असेल तर काम हा पुरुषार्थ कसा? म्हणूनही ‘काम’ हे नाव ठेवणे अडचणीचे आहे. मग त्याच्या जागी कोणती संकल्पना हवी?

माणूस हा कंटाळा येऊ शकणारा आणि कंटाळा टाळू पाहणारा प्राणी आहे. इतर प्राण्यांची इच्छा पूर्त होते किंवा विफल होऊन दबली जाते व नंतर विरून जाते. पण नवनवीन इच्छा स्फुराव्यात अशी त्यांना गरज नसते. मनुष्याला नेहमीच औत्सुक्य आणि स्वारस्य असणारे काहीतरी लागत असते. इंटरेस्ट इन इंटरेस्टिंगनेस! यातून समस्याही निर्माण होतात, पण कलावैभवही वाढते. रसिकता आणि रसनिर्मितीक्षमता जोपासण्याला ‘रस-पुरुषार्थ’ हे नाव देता येईल. कथा रचणे, नाटय़मयता निर्माण करणे, काव्यात्मता व कलेची निर्मिती करणे, ही माणसाची नेहमीच वैशिष्टय़े राहिलेली आहेत. युद्धस्य कथा रम्या: या न्यायाने हिंसात्मकताही वाढू शकते! फक्त रसच नव्हे तर सर्वच पुरुषार्थाच्या धडपडीत व त्यांच्या एकमेकांतील ताणांमुळे येणारे सततचे अस्वास्थ्य, कल्लोळ आणि विकारवशता या गोष्टी, चांगल्या जीवनाच्या दृष्टीने धोकेच आहेत. यासाठीच ‘रस’च्या जोडीने येणारा ‘स्वास्थ्य’ पुरुषार्थ महत्त्वाचा ठरतो.

विद्या, उद्योग, स्वास्थ्य आणि सहभाव

रस-पुरुषार्थाची साधना नुसत्या सुखभोगात अडकून पडू शकत नाही. रसनिर्मितीत भाग घेतला जायला लागतो. मला काय मिळाले? यापेक्षा मी काय काय करू शकलो/शकेन? हे मोलाचे असते. मुळात शिकणे ही अत्यंत महत्त्वाची मानवी क्रिया असते. म्हणून ‘विद्या-पुरुषार्थ’ हा स्वतंत्र पुरुषार्थ म्हणून घ्यावा लागतो. वृती, क्षमता, दृष्टी, संकल्पना, सिद्धांत वगैरे अर्जति करण्याची साधना म्हणजेच विद्या-पुरुषार्थ.

शिवाय माणूस हा कृत्रिम जग घडविणारा प्राणी आहे. उत्पादक श्रम हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. निसर्गत उपलब्ध कारण-कार्य शृंखलांमध्ये हस्तक्षेप करून, स्वतची संवेदनइंद्रिये व यत्नेंद्रिये याद्वारे त्यांत स्वतला ‘ओवून’ घेऊन, नियंत्रण मिळवणे हे त्याच्या समृद्धीमागचे रहस्य आहे. अधिकाधिक प्रगत साधने घडवत जाणे हे वैशिष्टय़ आहेच. पण त्याहून महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे श्रमविभागणी, सांघिक-प्रयत्न आणि व्यापार किंवा विनिमय. उपयोग-मूल्यातील धनमूल्ये ही, उत्पादनखर्चासाठी घालाव्या लागणाऱ्या इनपुट्स व ऋणमूल्यांपेक्षा, जास्त कशी होतील? हे पाहून वरकड-निर्मिती होते. अर्थव्यवस्थेला स्वतचे असे गतिनियम बनत जातात. आज जे अर्थशास्त्र विकसित झाले आहे, त्याच्या संदर्भात आपण ‘उद्योग-पुरुषार्थ’ स्थापित करू शकतो.

स्वास्थ्य-पुरुषार्थ स्थापित करण्याचा मार्ग आपल्याला, मोक्ष = आत्मस्थता, यातून मिळतो. आनंदमय स्वरूपात एकदाचे आणि कायमचे विलीन होणे हा आत्यंतिक (एक्स्ट्रीम) अर्थ आपण सोडून देत आहोत. दुरावा, परकेपणा येतो, मग तो स्वतशीच असेल वा इतरांशी असेल व त्यातून त्रासदायक कर्ष (स्ट्रेस) सहन करावा लागत असतो, ही समस्या कशी सोडवता येईल? यासाठीची साधना आत्मस्थतेच्या दिशेनेच असते. आत्मस्थतेला ‘सुकून’ किंवा ‘ब्लिस’ असेही म्हणता येईल.

प्रथम स्वतशी येणाऱ्या दुराव्याचा विचार करू. आपल्या वाटय़ाला येणाऱ्या भाग्याचा व आपल्यातील विसंगतींचा स्वीकार न करता येणे यातून स्वतशी दुरावा निर्माण होतो. सदानकदा एका स्वयंघोषित न्यायासनावर बसून स्वतला, इतरांना किंवा नियतीला दोषी ठरवणे ही सवय घातक आहे. ‘न्याय’ हे कार्य करताना दोष काढणे आवश्यकच आहे. पण याचा अर्थ सतत चडफडाट करत राहावे असा नाही. दुखे येतील पण मी दुखी व कडवट बनणार नाही, असेही जगता येते. निवाडारहित राहून कर्ष ओसरू देता येणे, स्वतला पुनपुन्हा शांत-प्रसन्नतेत आणणे, या साधनेला आपण स्वास्थ्य-पुरुषार्थ असे नाव देऊ शकतो. हे स्वास्थ्य मानसिक आहे. एकुणातले ‘आरोग्य’ हा प्रश्न उद्योग-पुरुषार्थात हाताळला जातो.

संपर्कशक्ती वाढली पण ‘संवादा’ची गुणवत्ता सुधारली नाही हे सद्ययुगाचे दुखणे प्रसिद्धच आहे. संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन हे जर काहींनी इतरांना प्रचालित (मॅनिप्युलेट) करण्यासाठीचे असेल, तर ते म्हणजे, एकमेकांना समजावून घेण्याचा सच्चा प्रयत्न नसेल. सगळेच कम्युनिकेशन उभय-समावेशक असणार नाही. पण जर आपण, काही प्रमाणात तरी खऱ्या पारस्पारिकतेने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने संवाद करू शकलो तर इतरांशी दुरावा या समस्येचा निदान मानसिक भाग आटोक्यात येईल. असे मत्र वाढवत राहणे याला आपण ‘सहभाव-पुरुषार्थ’ असे नाव देऊ.

स्वातंत्र्य, न्याय आणि कल्याण

धर्म म्हणजे रूढी किंवा धुरिणांनी घालून दिलेले नियम पाळणे, हा अर्थ आपण सोडून दिला पाहिजे. नीतिचिकित्सा शक्य होईल आणि नैतिक तत्त्वेही सापडतील याकडे आपण गेले पाहिजे. जेव्हा कृतीचे स्वातंत्र्य असते तेव्हाच नीतीचा प्रश्न येतो. स्वातंत्र्य लक्षात न घेता नीतिविचार अशक्यच आहे. त्याच वेळी स्वातंत्र्य म्हणजे फक्त मुभा (पर्मिसिव्हिटी) नसते, हे प्रसिद्धच आहे. नीतीनुसार स्वयंनियंत्रण करू पाहणारे कत्रे संयुक्तरीत्या स्वातंत्र्य घडवू शकतात. यात अनाक्रमण म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करणे हे नीतिसूत्र सापडते. आक्रमणाचा प्रतिकार करण्याचा हक्कही येतो. पण त्याच वेळी प्रतिशोध घेण्याचा हक्क आपण अमान्य करतो. कारण आघात-प्रत्याघातांचे दुष्टचक्र चालू होणार असते. म्हणजेच प्रतिकाराचे धर्य आणि क्षमाशीलता या दोन्ही गोष्टी लागतात. म्हणूनच ‘अिहसा’ हे व्रत स्वातंत्र्यात येते.

न्यायाची काटेकोर कल्पना म्हणजे योगदानानुसार किंवा अर्हतेनुसार फल ही होय. परंतु विधायक व विघातक योगदाने अचूक मोजता येत नाहीत, हे वास्तवही मान्य करावे लागते. दुसरे असे की योगदाने कितपत होतील? व विधायक/विघातकपैकी कोणत्या बाजूला पडतील? हे पूर्णत: कर्त्यांच्या काबूत नसते. भाग्याचा घटक फार मोठय़ा प्रमाणावर कार्यरत असतो. म्हणूनच काही प्रमाणात तरी निरपेक्ष सत्प्रवृत्ती (बेनेव्होलन्स) लागतेच. औदार्य व करुणा या सद्गुणांच्या प्रसादानेच मानवी कल्याण पुढे न्यायचे असते. नुसता काटेकोर न्याय करत बसणे शक्यही नसते आणि इष्टही नसते. म्हणूनच स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या मदतीला कल्याण (वेल्फेअर) हेही उद्दिष्ट ठेवावे लागते.

कल्याणकारितेद्वारे दुर्भाग्ये टाळण्याचा वा भरून देण्याचा प्रयत्न आपण कितीही केला तरी भाग्यभिन्नता राहणारच. ती आरोग्यपूर्णरीत्या घेण्यालाही एक व्रत लागते, ते म्हणजे अनसूया होय. असूयेपोटी हिंसा व विघातक शक्ती वाढत गेल्या तर त्या दुष्टचक्रात स्वातंत्र्य व न्याय हे शिल्लकच राहणार नाहीत.

आज आपण नव्या पुरुषार्थ-जोडय़ांचे चक्र स्थापित करून घेतले. पूर्वीचा ‘काम’= स्वास्थ्य व रस, ‘अर्थ’= विद्या व उद्योग, ‘धर्म’ = स्वातंत्र्य व न्याय, ‘मोक्ष’= कल्याण व सहभाव.

अधिक विवरण पुढील लेखांकात.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2018 1:01 am

Web Title: most important thing need to succeed in life
Next Stories
1 ऐहिक अभ्युदयाकडे दुर्लक्ष का?
2 पुढारलेल्यांची पुण्याई
3 रोबोंच्यात स्व-आकांक्षा उद्भवतील?
Just Now!
X