प्रशांत कुलकर्णी

न्यूयॉर्क शहरातल्या महापालिकेसंदर्भातली ही गोष्ट आहे. अगदी खरी. आपल्याला अविश्वसनीय वाटू शकेल अशी. पण ती शंभर टक्के खरी आहे. कारण त्या संदर्भातलं व्यंगचित्र सोबत दिलंय. ते आहे १९ ऑगस्ट १८७१ रोजीचं, म्हणजे जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचं, ‘हार्पर विकली’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेलं! ‘दी अनजंटलमनली आर्ट’ या ऐतिहासिक ग्रंथात हा किस्सा आहे.

त्याचं झालं असं की, त्या काळात न्यू यॉर्क म्हणजे अगदी गचाळ, गलिच्छ, बकाल आणि बऱ्यापैकी अशिक्षित नागरिक राहत असलेलं शहर होतं. त्यांची छोटीशी महापालिका होती. आणि अर्थातच महापालिका म्हटल्यावर ज्या गोष्टी रीतसर (!) व्हायला पाहिजेत, त्या सगळ्या तिथं होत्याच. म्हणजे बऱ्याच समित्या किंवा स्थायी समिती किंवा स्टँडिंग कमिटी आणि त्यांचं ‘कमिटेड अंडरस्टँडिंग’ हेही ओघाओघानं तिथं होतंच. लोकशाही म्हटल्यावर ते सगळं आलंच पाहिजे! पण न्यू यॉर्कच्या त्या पालिकेत हे अंडरस्टँडिंग जरा जास्तच होतं. म्हणजे त्या काळातला चक्क वीस कोटी डॉलर्सचा घपला! हे अर्थातच एका सामान्य व्यंगचित्रकाराला सहनच झालं नाही. त्यानं त्यावर एक व्यंगचित्र काढलं. ते छापलंही गेलं. काहींच्या ते फारच जिव्हारी लागलं. आणि त्यांनी लगेचच एक मीटिंगच घेतली.

त्या पालिकेचा जो मुखिया किंवा अध्यक्ष वगैरे होता, त्याचं नाव विल्यम ट्विड. तो फारच संतापला. त्यानं त्या बैठकीत सगळ्यांना तंबी दिली.. ‘‘आपल्याविरुद्ध वर्तमानपत्रात बरंच काही लिहून येतंय, खूप आरोप होताहेत. पण मला त्याची फारशी पर्वा नाही. कारण आपण सारे जिंकून येतो ते केवळ अशिक्षित मतदारांमुळे. ते मतदार काही हे लेख, अग्रलेख, बातम्या वगैरे वाचत नाहीत. पण त्या साऱ्यांना ही व्यंगचित्रं दिसतात, समजतात आणि उमजतातसुद्धा! तेव्हा खरा धोका हा आहे. काहीही करा आणि ही भयंकर व्यंगचित्रं थांबवा,’’ असं म्हणून ट्विडनं तो ‘हार्पर विकली’चा अंक जोरदार आपटला!

जनतेचे वीस कोटी डॉलर्स कुणी लाटले, या प्रश्नावर व्यंगचित्रातले ट्विड आणि त्याचे सहकारी एकमेकांकडे बोट दाखवताहेत आणि साहजिकच त्यांचं जबाबदारी टाळणाऱ्या भ्रष्टाचारी, लबाड गृहस्थांचं वर्तुळ तयार झालंय. यातले प्रमुख चेहरे अगदी स्पष्टपणे ओळखू येत होते. सारेच अस्वस्थ झाले.

ट्विडचा निरोप घेऊन ‘सेटिंग’ करण्यात तरबेज असलेले एक बँक अधिकारी त्या व्यंगचित्रकाराकडे पोहोचले. थॉमस नॅस्ट.. मूळचा जर्मनीचा, पण न्यू यॉर्कमध्ये राहणारा व्यंगचित्रकार, वय जेमतेम एकतीस. थॉमसचं त्या वेळी वार्षिक उत्पन्न होतं ५००० डॉलर्स. त्या बँकरनी थॉमसच्या व्यंगचित्रांचं कौतुक केलं आणि सांगितलं की, त्यानं खरं तर न्यू यॉर्कऐवजी युरोपमध्ये जाऊन चित्रं, शिल्प वगैरेचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी ते बँकर त्याला एक लाख डॉलर्स शिष्यवृत्ती द्यायला तयार झाले!

वर्षांला केवळ पाच हजार डॉलर्स मिळवणाऱ्या थॉमसचे डोळे विस्फारले. त्यानं विचारलं, ‘‘माझी किंमत दोन लाख डॉलर्स होऊ शकेल का?’’ ‘‘अर्थातच,’’ बँकर म्हणाले- ‘‘तुमचं टॅलेंट तितकं महत्त्वाचं आहेच!’’

उत्सुकतेपोटी थॉमसनं आपली किंमत अजमावून पाहायला सुरुवात केली आणि ती पाच लाख डॉलर्सपर्यंत पोहोचली. त्यानंतर मात्र थॉमसचा संयम सुटला आणि अत्यंत संतप्त सुरात त्यानं त्या बँकरला सुनावलं की, ‘‘युरोपला वगैरे जाण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये. म्युनिसिपालटीतल्या त्या भयंकर भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवणं हे माझं ध्येय आहे!’’

त्या काळातली थॉमस नॅस्टची व्यंगचित्रं ही अमेरिकी राजकीय व्यंगचित्रांच्या इतिहासातली अतिशय प्रभावी व्यंगचित्रं मानली जातात. थॉमसनं ट्विडला नंतर गिऱ्हाईक बनवलं. त्याचा अतिजाडेपणा दाखवणारं अर्कचित्र आणि त्यानं घातलेली १५ हजार डॉलर्सची टायपिन हे तो मुद्दाम दाखवून त्याची खिल्ली उडवायचा. एका अंकात तर थॉमसनं सहा व्यंगचित्रं छापली. दबावाचा भाग म्हणून ट्विडनं हार्पर प्रकाशनाची क्रमिक पुस्तकं महापालिका शाळांनी विकत घेण्यावर बंदी घालून प्रकाशनाला आर्थिक फटका दिला.

पण अखेरीस चौकशीची चक्रं फिरू लागली, दिवस बदलले. ट्विडच्या साथीदारांची वाताहत झाली. खुद्द ट्विड स्पेनला पळून गेला. तिथल्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि तिथल्याच एका तुरुंगात तो साध्या कैद्याप्रमाणे मेला. असं म्हणतात की, त्याच्या सामानामध्ये थॉमस नॅस्टकृत अनेक व्यंगचित्रांची कात्रणं होती!

थॉमस नॅस्टचं ते ‘लोकांचे पैसे कोणी चोरले?’ या अजरामर व्यंगचित्रावर आधारित अनेकांनी अनेक व्यंगचित्रं पुढे काढली. उदाहरणार्थ, महायुद्ध कोणी सुरू केलं, या प्रश्नावर एकमेकांकडे बोट दाखवणारे राष्ट्रप्रमुख वगैरे.

यंदा मुंबई आणि परिसर पाण्याखाली जाण्याचा जो काही अद्भुत प्रकार चार-पाच वेळेला झाला, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, हा विचार मनात आल्यावर थॉमस नॅस्टचं ते व्यंगचित्र आठवलं. मुंबई शहराची, उपनगरांची आणि परिसराची काळजी घेण्यासाठी पालिका, सरकार यांसह आणखी वीस-पंचवीस सरकारी संस्था सहज असतील. एखादा अपघात झाला किंवा विचित्र गोष्ट घडली, की साधारणपणे अशा प्रकारची ‘सरकारी’ प्रतिक्रिया असते :

‘‘रेल्वे स्थानकातील पादचारी पूल कोसळला? काही बळी गेले? ठीक आहे, करा सगळ्या रेल्वे स्थानकांतील पुलांचं ऑडिट!’’

‘‘पण मग रस्त्यावरच्या पादचारी पुलांचं काय?’’ ‘‘नको! तो कुठं कोसळलाय?’’

नंतर एखादा दोन महिन्यांत कोसळतोच, मग त्या वेळी ‘‘सगळ्या रस्त्यावरच्या पुलांचं ऑडिट करा!’’

‘‘पण मग सर, नदीवरच्या पुलांचं काय?’’

‘‘आता नको. एखादा वाहून गेला की मग बघू!’’

‘‘काय म्हणाला? झाड पडून एक जण दगावला?

‘‘ठीक आहे. कुठलं होतं? गुलमोहर? सगळ्या गुलमोहराच्या झाडांचं सर्वेक्षण करा. सगळी कापण्याची ऑर्डर द्या! पण वड, पिंपळ नको! त्यातलं एखादं पडलं तर बघू!’’

‘‘काय म्हणताय काय? मॅनहोलमध्ये एक जण वाहून गेला? चौकोनी होतं की गोल? गोल ना? ठीक आहे, येत्या चार वर्षांत सगळ्या गोल मॅनहोलना जाळ्या बसवा! चौकोनींचं नंतर पाहू!’’ वगैरे वगैरे..

न्यू यॉर्कचा विल्यम ट्विड गुर्मीत म्हणाला होता, माझे मतदार निरक्षर आहेत म्हणून मी निवडून येतो. इथं मुंबईकर हतबल, निराधार आहेत. (थॉमस नॅस्टच्या व्यंगचित्रांमुळे ट्विड आणि त्याची टोळी तुरुंगात गेली. इथं व्यंगचित्रकारच तुरुंगात जाण्याची शक्यता अधिक. असो.)

पण समजा, इथल्या सर्व जबाबदार संस्थांनी एकत्र येऊन मुंबई परिसराच्या सततच्या वाताहतीला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाच तर काय होईल? हे सारे कदाचित दोघांकडेच बोट दाखवण्याच्या निष्कर्षांपर्यंत येतील. एक म्हणजे वेधशाळेला न जुमानणारा पाऊस आणि दुसरा म्हणजे ज्याला त्रास होतोय तो मुंबईकर!