भारताने ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गेल्या बुधवारी केली आणि जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. भारताच्या या ‘मिशन शक्ती’ मोहिमेवरील प्रतिक्रियांचे प्रतिबिंब जगभरातील माध्यमांत ठसठशीतपणे उमटले आहे.

वॉशिंग्टन पोस्टने या मोहिमेचे विश्लेषण करताना भारताचे सामर्थ्य मान्य करतानाच भारत-पाकिस्तान तणावाचा संदर्भ दिला आहे. ‘पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात हवाई संघर्ष वाढला होता. त्यातच आधुनिक युद्धासाठीच्या भारताच्या तयारीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असताना भारताने ही मोहीम राबवून देशाची वाढती महत्त्वाकांक्षा आणि अंतराळातील आपल्या स्थानाचे प्रदर्शन केले आहे’, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील ‘इंडिया शूट्स डाऊन सॅटेलाइट इन टेस्ट ऑफ स्पेस डिफेन्स’ या शीर्षकाच्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानने भारताचे वैमानिक अभिनंदन यांना आपल्या ताब्यात घेतले होते, याचाही उल्लेख त्यात आहे.

भारताच्या या मोहिमेमुळे अंतराळ स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता अनेक माध्यमांनी व्यक्त केली. न्यू यॉर्क टाइम्सच्या एका लेखात आशियात अंतराळातील सत्तासंघर्षांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारताचे पाकिस्तानशी संबंध ताणले जाण्याबरोबरच भारत आणि चीन यांच्यातील अंतराळ स्पर्धा तीव्र होण्याची भीती या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि चीन यांच्यातील भौगोलिक वर्चस्वाचे वैर आता अंतराळात आणखी वाढेल, असे निरीक्षण या लेखात नोंदवण्यात आले आहे.

रशियाच्या आरटी वाहिनीने भारताच्या मोहिमेचे कौतुक केले. भारताच्या तांत्रिक प्रगतीला कमी लेखू नये, असे ‘आरटी’च्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटले आहे. देशांचे अंतराळावरील अवलंबित्व वाढले आहे. उत्तरोत्तर ते वाढतच जाणार असून, भारताचे हे मोठे यश आहे, असे एका रशियन लष्करी तज्ज्ञाच्या हवाल्याने त्यात म्हटले आहे.

ब्रिटनच्या द डेली एक्स्प्रेसमध्ये मात्र भारताच्या या मोहिमेवर नापसंती दर्शवण्यात आली आहे. ‘इंडिया शूट्स सॅटेलाइट्स फ्रॉम स्काय अ‍ॅण्ड वुई स्टील पे देम एड’ या शीर्षकाखालील याबाबत सविस्तर वृत्त आहे. ‘भारताला ब्रिटन लक्षावधी पौंडांची मदत करतो. मात्र, भारत अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार करत असल्याचे पाहून ब्रिटनमधील करदात्यांमध्ये संताप निर्माण होईल’, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मदतनिधीबाबतच्या नियमांमध्ये तातडीने बदल करण्याची गरज त्यात व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनच्याच द इंडिपेंडन्टने ‘व्हाय हॅज इंडिया शॉट डाऊन अ सॅटेलाइट इन स्पेस अ‍ॅण्ड व्हॉट इज मिशन शक्ती?’ या शीर्षकाच्या वृत्ताद्वारे संयत विश्लेषण केले आहे.

चिनी माध्यमांनी भारताच्या या माहिमेबद्दल सावध पवित्रा घेतला. चायना डेलीने या मोहिमेचा उल्लेख संक्षिप्तच नव्हे, तर ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे’, अशा- संशय पेरणाऱ्या- शब्दांत केला आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सने मात्र याची सविस्तर दखल घेत टीकेचा सूर आळवला. ‘चीनने २००७ मध्ये अशीच चाचणी केली तेव्हा अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी त्यावर टीका केली होती. आता भारताच्या या मोहिमेकडे पाश्चिमात्य देश भारत-चीन स्पर्धेच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. मात्र, भारताची मर्यादित शक्ती चीनला थोपवू शकत नाही’, असा दावा चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’च्या एका लेखात करण्यात आला आहे. चीनशी बरोबरी करण्याचे भारताचे स्वप्न पुढील काही दशके तरी पूर्ण होणार नाही, हेही वाक्य या लेखात आहेच.

‘मिशन शक्ती’च्या निमित्ताने बीबीसीने एका लेखात अंतराळातील कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. चीनने अशी चाचणी केली तेव्हाही अंतराळातील कचऱ्यावरून टीका झाली होती. मात्र, या चाचणीमुळे निर्माण झालेला कचरा दीड महिन्यांत नष्ट होईल, या ‘डीआरडीओ’च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या स्पष्टीकरणालाही या लेखात स्थान देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन शक्ती’ची माहिती देण्यासाठी चित्रवाणीवरून केलेल्या भाषणादिवशी दोन ट्वीट गाजले. पैकी एक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि दुसरे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे. या मोहिमेमुळे जमिनीवरील प्रश्नांवरून जनतेचे लक्ष अवकाशाकडे वळवता आले, या अखिलेश यांच्या ट्वीटला अनेक अभारतीय माध्यमांतही स्थान मिळाले आहे. द गार्डियन या लंडनच्या वृत्तपत्राने, निवडणूक काळात पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेनंतर सरकार टीकेचे, तर भारतीय अंतराळ-शास्त्रज्ञ प्रशंसेचे धनी झाले, याची दखल घेणारे वृत्तही दिले आहे.

(संकलन: सुनील कांबळी)