अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील इतिहास व सामाजिक शास्त्रांच्या पाठय़पुस्तकात ‘भारत’ या शब्दाऐवजी ‘दक्षिण आशिया’ हा शब्द वापरण्यात येणार नाही, असे तेथील आयोगाने जाहीर केले ते योग्यच झाले. ही सूचना मान्य झाली असती तर भारतावर अन्याय झालाच असता, पण तेथील भारतीय वंशाच्या मुलांना चुकीचा इतिहासही शिकवला गेला असता ..
‘भारत’ या शब्दाऐवजी ‘दक्षिण आशिया’ हा शब्द वापरण्याची सूचना कॅलिफोर्निया पाठय़पुस्तक आयोगाने फेटाळली ही बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने शुक्रवारी दिली. या बातमीचा संदर्भ कॅलिफोर्नियातील शाळांत शिकवल्या जाणाऱ्या इतिहास आणि सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमात सुचविलेल्या काही दुरुस्त्यांशी आहे. अमेरिकेतील शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या या प्रस्तावित दुरुस्त्यांना मोठा राजकीय संदर्भ असल्याने कॅलिफोíनयातील भारतीय समाजाच्या आणि पर्यायाने भारताच्या दृष्टीने ही बातमी फार महत्त्वाची आहे. या संपूर्ण प्रकरणाची चर्चा समाजमाध्यमांमध्ये मध्यंतरी बरीच गाजली. ‘भारत’ या शब्दाने जे अभिप्रेत आहे किंवा भारत या शब्दाने ज्याचा निर्देश होतो त्यासाठी ‘दक्षिण आशिया’ हा शब्द वापरू नये यासाठी ऑनलाइन सह्य़ांची मोठी मोहीम जागतिक पातळीवर हाती घेण्यात आली. त्यात आपल्याकडील संजय बारू, मधु किश्वर यांच्यासह अनेक विचारवंतांचा सहभाग होता. चीनचा निर्देश कोणी ‘पश्चिम-पूर्व आशिया’ किंवा ग्रीसचा निर्देश कोणी ‘दक्षिण-पूर्व युरोप’ असा करीत नाही. मग फक्त भारताचाच निर्देश ‘दक्षिण आशिया’ असा करण्याचा उद्देश काय? किंवा पर्यायाने ‘भारत’ ऊर्फ ‘इंडिया’ हा शब्दच राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक व्यवहारातून बाद करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न विचारला गेला.
हे संपूर्ण प्रकरण फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू झाले. कॅलिफोर्नियातील शाळांत शिकविल्या जाणाऱ्या साऊथ एशिया स्टडीज या विषयाच्या काही शिक्षकांनी अभ्यासक्रम गुणवत्ता निश्चित करणाऱ्या कॅलिफोíनया बोर्ड ऑफ एज्युकेशन या मंडळाकडे काही सूचना केल्या. त्यात सहाव्या इयत्तेच्या इतिहास आणि सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमात  किंवा ‘भारतातील धर्म’ या शब्दांऐवजी ‘प्राचीन भारतातील धर्म’ असा शब्दप्रयोग करण्यात यावा ही सूचना स्पष्टीकरणासहित केली. त्यानुसार ‘प्राचीन भारत’ (एन्शंट इंडिया) ही संज्ञा इंडॉलॉजीच्या म्हणजेच भारत-विद्याविषयक अभ्यासाच्या संदर्भात प्रचलित असलेली संज्ञा आहे. पण भारतासंबंधी वेगवेगळ्या अभ्यासविषयांच्या बाबतीत विविध संज्ञा प्रचलित आहेत. त्यामुळे अशा अभ्यासविषयांसाठी एकच एक सर्वसाधारण संज्ञा सुचविणे शक्य नाही. त्यामुळे संदर्भानुसार ‘प्राचीन भारत’, ‘भारत’, ‘भारतीय उपखंड’ आणि ‘दक्षिण आशिया’ या संज्ञा वापरता येतील. परंतु काही संदर्भात उदाहरणार्थ, इ.स. पूर्व ३३००-१७०० काळातील सिंधू संस्कृतीच्या संदर्भात ‘प्राचीन भारत’ आणि ‘भारत’ या संज्ञा दिशाभूल करणाऱ्या ठरतील. याचे कारण प्राचीन सिंधू संस्कृती जिथे उदयाला आली तिचा बराचसा भूभाग आज पाकिस्तान नावाच्या आधुनिक राष्ट्रात आहे. त्यामुळे या संस्कृतीचा अभ्यास ‘प्राचीन भारताची’ म्हणजेच आजच्या भारत (इंडिया) नावाच्या आधुनिक राष्ट्राची (प्राचीन) संस्कृती असे गृहीत धरून केला तर आज भारत आणि पाकिस्तान या राष्ट्रांच्या त्या काळात असणाऱ्या सामायिक संस्कृतीचा अभ्यास करण्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले असे होईल. हाच युक्तिवाद अभिजात किंवा श्रेष्ठकालीन, मध्ययुगीन, आधुनिक पूर्वकालीन आणि अगदी वसाहतकालीन भारतातील विविध अभ्यासविषयांबद्दल करता येईल. उदा. विविध तत्त्वज्ञाने, संगीत, शिल्प अशा कित्येक बाबी या ‘आजच्या’ भारताच्या प्राचीन वारशाच्या नसून दक्षिण आशियाई देशांच्या सामायिक वारशाच्या आहेत. थोडक्यात, ‘प्राचीन भारत’ आणि आजचे ‘भारत ऊर्फ इंडिया’ नावाचे राष्ट्र (नेशन स्टेट) या दोन भिन्न गोष्टी आहेत व त्यांचा संबंध एकमेकांशी जोडून ‘आजच्या’ भारताने किंवा आजच्या ‘इंडिया’ने दक्षिण आशियाई देशांच्या सामायिक वारशाच्या गोष्टींवर हक्क सांगणे योग्य नाही.
वरील सूचनांमुळे कॅलिफोíनयातील भारतीय समाजमन ढवळून निघाले नसते तरच नवल. आपल्या मुलांना ‘भारताचा’ नव्हे तर ‘दक्षिण आशियाचा’ इतिहास शिकावा लागणार यातील उपहास करताना ‘कोलंबस भारताच्या शोधात निघाला होता की दक्षिण आशियाच्या?’ किंवा ‘ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी होती की ईस्ट साऊथ एशिया कंपनी होती?’ असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यातला भावनिक उद्रेकाचा भाग सोडला तर ‘भारत’ या शब्दाऐवजी ‘दक्षिण आशिया’ ही संज्ञा वापरा या सूचनेतील गíभत राजकीय अर्थानुसार ‘आजचा’ भारत म्हणजे १९४७ साली भारतीय उपखंडाच्या फाळणीतून अस्तित्वात आलेले भारत ऊर्फ इंडिया नावाचे आधुनिक नेशन स्टेट. याचा अर्थ १९४७ पूर्वी जे होते किंवा जो होता तो एक विशाल भौगोलिक प्रदेश. या प्रदेशाला एकच एक अशी अस्मिता, एकच एक स्व-प्रतिमा किंवा एकच एक अशी ओळख-आयडेंटिटी- नव्हती. भारतीय उपखंडातील ज्ञान, धर्म आणि लोकव्यवहारातील विविधता ध्यानात घेतली तर भारत नावाच्या भूप्रदेशाला एकच एक ओळख- आयडेंटिटी- नव्हती हे अंशत: खरे आहे. पण याचा अर्थ या विविधतेत काहीच समान नव्हते असे नाही. परंतु भारत हा कधीच एकसंध नव्हता हा भ्रम ब्रिटिशांनी जोपासला होता. अर्थात गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराजमध्ये या युक्तिवादाचा प्रतिवाद केला आहे. ‘भारत’ की ‘दक्षिण आशिया’ या प्रश्नात भावनिक, राजकीय, ऐतिहासिक आणि काही संकल्पनात्मक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यातला एक संकल्पनात्मक मुद्दा ‘वर्णन’ आणि ‘नाम’ यातील फरकाशी संबंधित आहे. ‘दक्षिण आशिया’ हे केवळ एक तटस्थ भौगोलिक वर्णन आहे. त्यातून त्या भौगोलिक प्रदेशाच्या संस्कृतीचे किंवा सभ्यतेचे स्वरूप आणि वैशिष्टय़ स्पष्टहोत नाही. ‘भारत’ आणि ‘हिंदुस्तान’ यासारखी नामे ही संस्कृती आणि सभ्यतानिदर्शक आणि पर्यायाने त्या त्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या मानवसमूहांना एक ओळख, एक आयडेंटिटी देणारी नामे असतात. ‘ईस्ट पाकिस्तान’ असे म्हणण्याने भौगोलिक स्थाननिश्चिती होत होती, पण ‘बांगलादेश’ या नामामुळे भाषा आणि संस्कृती आधारित एक ओळख, एक आयडेंटिटी त्या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांना मिळाली. यासारख्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, ‘भारत’ या शब्दाऐवजी ‘दक्षिण आशिया’ हा शब्द वापरण्याच्या सूचनेतून भारतीयांची भारतीय म्हणून असलेली ओळख पुसण्याचा जो प्रयत्न होऊ घातला होता तो उधळला गेला हे योग्यच झाले असे म्हणायला हवे.

 

प्रा. शरद देशपांडे
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील निवृत्त प्राध्यापक आहेत.
sharad.unipune@gmail.com