|| प्राची पिंगळे

‘फ्रायडेज फॉर फ्यूचर’ या जगभर पसरू पाहणाऱ्या पर्यावरणप्रेमी तरुणांच्या संघटनेचं काम बेंगळूरुहून पाहणारी दिशा रवी, दिल्ली पोलिसांनी तिच्या शहरात जाऊन तिला दिल्लीच्या कोठडीत डांबल्यामुळे चर्चेत आली होती. ‘टूलकिट प्रकरण’ म्हणजे जणू काही देशविरोधी कट आहे, असा गाजावाजा काही प्रसारमाध्यमांनीही त्या वेळी केला. यथावकाश दिशा रवी यांना जामीन मिळाला आणि नित्यक्रम सुरू झाले. तिच्या गिरफ्तारीची कारवाई झाली तेव्हादेखील, ‘तुमच्याआमच्यासारख्या साध्या मुलीवर अशी कारवाई कशी काय होऊ शकते?’ हा प्रश्नच तिचे सहानुभूतीदार विचारत होते. हा तिचा साधेपणा नेमका काय आहे, याचा वेध घेणारी ही मुलाखत…

प्राची : बालपणापासूनच्या आठवणींविषयी काही सांगाल का? विशेषत: तुमचे शिक्षण कसे झाले वगैरे…

दिशा : मी (बेंगळूरुच्या) माऊंट कॅरमेल महाविद्यालयात शिकले. माझ्या व्यावसायिक पदवीचा वापर हवामान अर्थसाहाय्य मोहिमांसाठी किंवा सर्वसाधारण अर्थव्यवस्थेसाठीच व्हावा, असे मी शिकत असतानापासूनच ठरवले होते. शालेय शिक्षणाचा अनुभव हा भयानक होता. तिथे मी सहवेदना मात्र शिकले… कारण त्या शाळेत विद्यार्थ्यांविषयी कधीच सहवेदना दाखवली गेली नाही किंवा त्याचा अभावच होता.

माझे सगळे शिक्षण खरे तर आई व आजीआजोबांपासून झाले. हवामानाच्या पेचप्रसंगाविषयी मी पहिल्यांदा काही वाचनातून समजून घेतले नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकले. त्याचा मला खूप फायदा झाला. मला इतिहासाचे वाचन आवडत होते. जमीन हक्क, पर्यावरणाचे प्रश्न यात मला जास्त रस होता. मी कथा-कादंबऱ्याही वाचल्या, कारण मी लहान असतानाच माझ्या आजोबांनी एक काळजी घेतली ती म्हणजे आपल्या नातीने जास्तीत जास्त वाचन करावे! त्यामुळे माझ्या मनात प्रत्येक प्रश्नाविषयी उत्सुकता निर्माण झाली. अगदी चौकसपणे, कुतूहलाने मी पुस्तके वाचू लागले. पुस्तकात जे वाचले त्यातून उत्सुकता वाढीस लागली. प्रत्येक गोष्टीवर मी प्रश्न विचारू लागले.

प्राची : पर्यावरणविषयक प्रश्न आणि हवामान बदलविषयक मुद्द्यांवर तुम्हाला आवड कशी निर्माण झाली?

दिशा : एक मुलगी म्हणून मी माझ्या आजीआजोबांची पाण्यासाठीची तगमग पाहात होते. आता परिस्थिती खूप चांगली आहे, घरात नळ आहेत वगैरे; पण घरातील सर्व बादल्या पाण्याने भरून ठेवण्याची माझ्या आजीआजोबांची सवय आजसुद्धा कायम आहे. काही तरी विपरीत घडून पाणी मिळणार नाही, अशी भीती त्यांना सतत वाटत असायची. मी शाळेत जाण्यापूर्वी माझी आई पाणी कसे उपसून काढत असे याच्या कहाण्या आजही माझे मन विदीर्ण करतात. मधली दोन वर्षे मी मंगलोरला राहिले. तिथे मोसमी पावसाच्या लहरीपणाचा परिणाम हा त्या भागात होत असे. आमच्या घरात पुराचे पाणी येत असे. ते नेहमीचेच झाले होते. नंतर मी बेंगळूरुला परत गेले कारण मला पदवी घ्यायची होती. माझे आईवडील काही काळ तेथे राहात होते. हवामानाची व पाणीप्रश्नाची कशी अवस्था आहे व तो किती गंभीर प्रश्न आहे हे तेव्हापासून मला जाणवत होते. असे असले तरी हवामानाच्या प्रश्नाविषयी मला नंतर जास्त जाणीव निर्माण झाली. त्या काळात पर्यावरण, हवामान बदल या ‘पूर्णपणे परदेशी संकल्पना’ मानल्या जात, अशा लोकांचे मला नवल वाटू लागले. शाळा व महाविद्यालयात आम्हाला त्याविषयी काही शिकवण्यात आले नव्हते. मी अठरा वर्षांची किंवा थोडी मोठी झाले तेव्हा इंटरनेटवर या विषयावरची माहिती कळली तसे उत्सुकतेतून मी वाचत गेले. त्यानंतर पर्यावरण व हवामान बदल याच्याशी माझे नाते जुळले. मी त्यावर काम करू लागले.

बेंगळूरुत असताना मी शहरापासून खूप लांब राहात होते. शहराच्या वेशीवरले खेडेगावच होते ते, आता शहरीकरण तिथवर आले होते तरीही त्या भागात सांडपाण्याची व्यवस्था चांगली नव्हती. कुणी श्रीमंत लोक तेथे राहत नव्हते त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारण्याची काळजी कुणी घेतली नाही. खूप पाऊस झाल्यानंतर आमच्या घरात पाणी येत असे. हे सगळे हवामान बदलांमुळे घडत होते असे मी म्हणणार नाही. कारण तेथील सांडपाण्याची व गटारींची व्यवस्था वाईट होती. ती टाळता आली असती. यातून हवामान बदलांचा विविध समुदायांवर कसा परिणाम होतो याची जाणीव मला झाली.

प्राची : आजघडीला जगात व भारतात अनेक तरुण विद्यार्थी आणि कार्यकर्ते व्यवस्थेत बदलांची मागणी करीत आहेत. मानवी हक्कांसाठी लढा सुरू आहे. शांतता आणि न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ही प्रेरणादायी परिस्थिती आहे. हवामान बदलांसाठी लढणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. याबाबतचे तुमचे विचार काय आहेत? तुमचे काही अनुभव सांगा.

दिशा : आमच्या आधीही नर्मदा बचाव आंदोलनातून अनेक कार्यकर्ते घडले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. चेन्नईतील बंदरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा दिला आहे. माझ्या मते जुन्या पिढीने बरेच काम केले आहे. ते काम पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने डोळसपणे प्रयत्न केले पाहिजेत. जुन्या पिढीपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. जुन्या काळात पर्यावरणाचे प्रश्न फार गांभीर्याने घेतले जात नसत. निदान आताच्या काळाइतके भान त्याबाबत आले नव्हते. आताच्या काळात पर्यावरणाचे प्रश्न गंभीरपणे घेतले जात आहेत, त्यामुळे तरुण पिढी रचनात्मक बदलांची मागणी करीत आहे. हवामान बदलांचे प्रश्न ज्यामुळे निर्माण झाले त्या कृती टाळण्यासाठी व त्या प्रश्नांकडे अग्रक्रमाने लक्ष देण्यासाठी तरुण पिढी आग्रह धरते आहे. व्यवस्था ही कठोर, निश्चल असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आजचे तरुण हे सर्जनशील आहेत. त्यांना व्यवस्थेत बदल हवे आहेत. याशिवाय ते या प्रश्नांवर मोठ्या कंपन्यांशी व सरकारांशी लढण्यास घाबरत नाहीत अशी आजची परिस्थिती आहे.

प्राची : आजचा काळ व पूर्वीचा काळही कठीण होता. यात तुम्हाला कशातून प्रेरणा मिळाली? तुम्ही सातत्याने हे प्रश्न मांडून दबाव कायम ठेवण्यासाठी नेमके काय केले? तुम्ही काय वाचन केले आहे?

दिशा : मला वाचन आवडते. इतिहास, राज्यशास्त्र, जमीन हक्कांचे कायदे आणि संघर्ष, पर्यावरणाचे प्रश्न यांवर वाचण्यात माझा वेळ जातो. सध्या मी ‘स्वेप्ट ऑफ द मॅप – सव्र्हायव्हिंग एव्हिक्शन अँड रिसेटलमेंट इन दिल्ली’ हे कल्याणी मेनन सेन व गौतम भान यांचे पुस्तक वाचते आहे.

मला घराच्या बाहेर शांत बसून जगाचे निरीक्षण करायला आवडते. माझ्या शेजारच्यांनी माझ्या घराच्या समोरच हे सार्वजनिक उद्यान तयार केले होते. अर्थात त्यासाठी मालकाची परवानगी घेतली होती. ते लोक एकत्र येऊन दर सायंकाळी भाज्यांची लागवड करीत असत. ते करताना त्यांनी कोविड नियमांचेही पालन केले. त्यातून मलाही समाधान मिळत असे. त्यांचे ते प्रयत्न बघून आनंद वाटत होता. मला सायकल चालवण्याची आवड आहे, पण कोविड निर्बंधांमुळे ती सवयही तुटली.

प्राची : तुमचे महाविद्यालय व तेथील परिसर, मित्रमंडळी कशी होती? नेहमीसारख्या दिवसांमध्ये तुम्ही तिथे काय करीत होतात, याबद्दल काही सांगाल?

दिशा : माझे महाविद्यालयाशी असले नाते हे संमिश्र स्वरूपाचे होते. त्यातून सक्षम महिला पुढे आल्या. पण जातीयवाद, पुरुषसत्ताकता, वर्गवाद याचा त्यांना सामना करावा लागला. काही विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिकार केला. त्यांच्याशी माझ्या गाठीभेटी होत असत. तेच माझे मित्र होते. माझा दिनक्रम त्या काळात सर्वसाधारण होता. सकाळी उठून सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घेणे आवडत होते. इतरांप्रमाणेच मीही कामाला सुरुवात करत असे. आताही तसेच आहे.

जगण्यातला उत्साह टिकवण्यासाठी मी नेहमी मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींचा समावेश नित्यक्रमात केला. आजही करते आहे. त्यातून पुढचा प्रवास अजूनही उत्साहाने सुरू आहे.

लेखिका ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘बीबीसी’मधील कामाचा अनुभव असलेल्या  मुक्त पत्रकार आहेत.

prachi.pinglay@gmail.com