एजाजहुसेन मुजावर

नोकरी—व्यवसाय, उच्च शिक्षण घेत असतानादेखील फायद्याची शेती करता येते. केवळ आठवडय़ातून एका दिवशी रविवारच्या सुटीत नियोजनपूर्वक कामे केल्यास भरघोस शेती उत्पादन घेता येते. बीड जिल्ह्यच्या चंदन सावरगाव (ता. केज) येथील राजकुमार शिनगारे या तरुणाने अशाच पद्धतीने तुरीचे घेतलेल्या यशस्वी उत्पादनाची ही गाथा..

कृषिप्रधान म्हणून पारंपरिक ओळख असलेल्या आपल्या भारत देशात ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ ही म्हण कृतीतून नावारूपात होती. परंतु अलीकडे शेतीचा खर्च भांडवली पद्धतीने वाढला आहे. त्यातच पावसाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकांची किमत मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही भागवणे कठीण होते. शेतीवरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याचे आणि कर्जाची परतफेड करणे आवाक्याबाहेर झाल्याने आत्महत्या करून शेतकरी आपल्या जीवनाचा शेवट करण्याचे प्रकार वाढत आहेत.

यंदा करोना तथा टाळेबंदीचे संकट असतानाच त्यात पुन्हा गेल्या महिन्यात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पुराच्या संकटाने भर पडली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. म्हणूनच ‘उत्तम शेती’चा दावा यापूर्वीच मोडीत निघाला आहे. शेतीविषयी अशी सार्वत्रिक नकारात्मकता असताना करोनाकाळात टाळेबंदीमध्ये पुन्हा ‘उत्तम शेती’चा नारा ग्रामीण भागातील युवकांनी बुलंद केला आहे. टाळेबंदीमध्ये नोकरी, उद्य्ोग—व्यवसाय धोक्यात आल्यामुळे शहरातून गावी येऊ न आपल्या पडीक शेतीकडे लक्ष देणे पसंत केले जात आहे. पारंपरिक पध्दतीने शेती करण्याचे दिवस कधीच संपले आहेत. त्याचे भान या नवशिक्षित तरुण पिढीला आले आहे. पारंपरिक पध्दतीचा अवलंब न करता नवनवीन तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे. त्यातून शेतीला ऊर्जितावस्था येऊ  शकते, असा विश्वास तरुण पिढीने जोपासत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग हाती घेत यशस्वीपणे वाटचाल करीत असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येते.

योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास ती नक्कीच परवडते. अगदी नोकरी—व्यवसाय सांभाळूनसुध्दा शेती करता येते. एवढेच नव्हे तर उच्च शिक्षण घेत असतानादेखील शेती करता येते आणि तीसुध्दा फायद्याची शेती. केवळ आठवडय़ातून एका दिवशी रविवारच्या सुटीत नियोजनपूर्वक कामे केल्यास भरघोस शेती उत्पादन घेता येते. बीड जिल्ह्यच्या चंदन सावरगाव (ता. केज) येथील राजकुमार शिनगारे या तरुणाने त्यादिशेने केलेली वाटचाल आश्वासक मानली जाते. राजकुमार यांनी उच्च शिक्षण घेऊ न स्पर्धा परीक्षेची तयारी हाती घेतली आहे. जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वास या जोरावर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्यांनी जणू ध्यास घेतला आहे. परंतु त्यासाठी रात्रंदिवस केवळ अभ्यास एके  अभ्यास असे न करता आठवडय़ात दर रविवारी साप्ताहिक सुटीतच शेती करून त्यातही नवनिर्मितीचा आनंद घेण्याचा राजकुमार यांचा प्रयत्न कृतीत आला आहे. शिनगारे कुटुंबीयांची वडिलोपार्जित शेती आहे. तीदेखील पावसावर अवलंबून असलेली.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचाही हेतू मनात ठेवून राजकु मार शिनगारे हे ‘रविवारची शेती’ करीत आहेत. यंदा मार्च—एप्रिलमध्ये करोना तथा टाळेबंदी लागू झाल्यानंतर राजकु मार यांनी शेतीकडे वळण्याचा मानस बोलून दाखविला होता. त्यावेळी घरच्या मंडळींनी, नातलग व मित्रांनी, हे तुझे काम नाही’ असा नकारात्मक सूर आळवला. अंगभूत असलेल्या बुध्दिकौशल्याचा उपयोग पूर्णपणे शिक्षणासाठीच करावा, असा सल्ला दिला जात होता. राजकु मार यांनीही स्पर्धा परीक्षा देऊ न शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होतेच. त्यादृष्टीने स्पर्धा परीक्षा देण्याची त्यांची तयारी होतीच. परंतु त्याचबरोबर आठवडय़ातून एकदा तरी शेतात यावे आणि काम करावे, असे त्यांना वाटायचे. जणू शेतीच त्यांना खुणावत होती. आठवडय़ातून एकदा दर रविवारी शेताकडे लक्ष द्यायचे हे मनाशी पक्के केल्यानंतर त्यादिशेने राजकु मार यांनी पाऊ ल उचलले. त्यासाठी भौगोलिक परिसराचा अभ्यास, निरीक्षण करून त्यांनी शेतीचे नियोजन केले. शेतात पारंपरिक पध्दतीने तुरीचे पीक घेतले जाते. त्यानुसार पाच एकर क्षेत्रात तूर लागवड केली. जळगावच्या ‘निर्मल सीड’ बियाणांचा पेरा केला. फक्त दर रविवारी एकाच दिवशी राजक ुमार हे शेतात जाऊ न मजुरांकडून आवश्यक कामे करून घेतात. इतरवेळी सहसा शेतात जात नाहीत. तरीही त्यांनी लावलेल्या तुरीचे पीक जोमात वाढले आहे. परिसरात त्यांच्या तुरीची चर्चा आहे.

राजकु मार यांनी शेतात ५ बाय २ फूट अंतरावर लावलेल्या तुरीची उंची सध्या जवळपास ९ ते १० फूट वाढली आहे. दर ३५ ते ४० दिवसांनी एकदा असे दोनवेळा तूर झाडांची छाटणी केली आहे. छाटणी करण्याचा हा प्रकार चंदन सावरगावच्या पंचक्रोशीत तसा नवाच. राजकुमार यांच्या घरच्या मंडळींसह शेजारपाजारच्या शेतकऱ्यांनी राजकु मार यांना नावे ठेवली. एवढी चांगली वाढलेली तूर तुम्ही का छाटत आहात म्हणून नाराजीवजा टोमणेबाजी केली. परंतु त्यानंतर १०—१२ दिवसांनी त्या छाटणी केलेल्या झाडाला एकेका जागी १०—२० फुटवे आले. तेव्हा सर्वानीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली. दुसरम्य़ांदा छाटणी केल्यानंतर पुन्हा एकेका झाडाला तब्बल २०—३० फु टवे आले. दोनवेळा छाटणी करूनही तुरीची उंची ९ ते १० फूट आहे. एका तुरीच्या झाडाला एकाचवेळी २०० ते ३०० शेंडय़ांचे फुटवे आले असून कळी, फुले आणि शेंगा मोठय़ा प्रमाणात आल्या आहेत. तसे पाहता आतापर्यंत शिनगारे कु टुंबीयांच्या शेतात पारंपरिक पध्दतीने तुरीचे पीक घेतले जाते. परंतु एकदा तूर लागवड केली की मग त्याकडे सहसा पाहायचे नाही. तुरीवर रोग पडला, कीड लागली तर रासायनिक औषधांची फवारणी करणे हेच तेवढे काम असायचे. त्यापलीकडे काही संबंध नसायचा. परंतु सध्या राजकु मार यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून केलेल्या तुरीचे पीक जोमदार वाढल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी राजकु मारची शेती पाहण्यासाठी येत आहेत.

दुर्दैवाने गेल्या ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने राज्यात अनेक भागात कहर केला. अतिवृष्टी व पुराचे संकट ओढवले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाच धोक्यात आली. मात्र चंदन सावरगाव परिसरात अतिवृष्टीने जास्त नुकसान झाले नाही. यात राजकु मारची बहरलेली तुरीची शेती अधिक नुकसान न होता अबाधित राहिली. पावसामुळे तुरीवर रोग पडला असता दोनवेळा रासायनिक औषधांची फवारणी करणे भाग पडले. त्यामुळे तुरीचे पीक तावून सुलाखून सुखरूप निघत आहे. येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात तुरीचे उत्पादन हाती लागेल. किमान ५० क्विं टल तूर उत्पादन होईल आणि चार पैसे मिळतील, असा राजकु मार यांना विश्वास वाटतो. घरच्या मंडळींचे प्रोत्साहन आणि स्पर्धा परीक्षेसह शेतीसाठीही मार्गदर्शन करणारे रामदास तपसे यांनी वेळोवेळी लावलेला हातभार राजकुमार यांच्या ‘रविवारच्या शेती’साठी तेवढाच मोलाचा ठरला आहे.