scorecardresearch

केशर लागवडीचा सामूहिक प्रयोग!

कृषी विज्ञान केंद्रातून केशर आंब्याची झाडे घेण्याआधी माती परीक्षण करण्यात आले.

चारूशीला कुलकर्णी

गावातील पाण्याचा प्रश्न, भौगोलिक परिस्थितीचा विचार करता शेतीतून फारसं काही हातात येईल, ही शक्यता बहुतेकांना कमीच वाटायची. अडचणी अनेक होत्या. या स्थितीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेहडपाडय़ाचे काही आदिवासी शेतकरी एकत्र आले. त्यांनी आपली बलस्थाने काय असतील, याचा अभ्यास सुरू केला. सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन हजार केशर आंबा रोपे लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. आता ते हरसूलच्या केशर आंब्याचा व्यापार विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागातील बेहडपाडा आदिवासीबहुल वस्तीचे. पाडय़ाची लोकसंख्या जेमतेम तीनशेच्या आसपास. गावात रोजगाराचे साधन शेती. पण तीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून. पावसाच्या हंगामात शेतीची कामे संपली की, रोजगारासाठी स्थलांतर हा एकमेव पर्याय उरतो. शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी काहींनी धडपड केली होती. मात्र विपणन वा अन्य बाबीत ते कमी पडतात. यामुळे नाशिक तसेच अन्य जिल्ह्यात, कधी कधी परराज्यात मजुरी, नोकरीच्या निमित्ताने त्यांना स्थलांतरीत व्हावे लागते. वर्षांनुवर्षांचा हा शिरस्ता. तो बदलण्यासाठी पांडुरंग गावित या शेतकऱ्याने विचार सुरू केला. शेती हा त्याच्या जिव्हाळय़ाचा विषय. या प्रयत्नाला अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट संस्थेची मदत मिळाली. शेती करायची हे पक्के असले तरी नेमकं काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आसपासच्या भागात काय पिकते, कुठे विकले जाते, याचा अभ्यास सुरू झाला. फळबाग लागवडीवर विचार होऊ लागला. हळूहळू शेतकरी एकत्र आले. आंब्याचे दिवस असल्याने आंब्यावर चर्चा झाली. आम्ही आंबा पिकवतो, पण तो विकताच येत नाही. घरीच खातो आणि टोपली भरून पाहुण्यांना वानोळा देतो, असे स्थानिक सांगत होते. व्यवहारीपणा जमत नाही. यामुळे आमचा आंबा शेतातच राहतो, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

याच सुमारास करोनाने दार ठोठावल्याने कामाला खिळ बसते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. करोना काळात फळं खाल्ली पाहिजेत, असे सर्व डॉक्टर सांगायचे. पण या भागात फळंच नाहीत, मग खायला कशी मिळणार, हा चर्चेचा विषय ठरला. शेतकऱ्यांनी हा मुद्दा लावून धरला. गाव परिसरात शास्त्रोक्त पध्दतीने फळबाग शेती करण्याचा निर्णय झाला. या प्रयोगात शेतकऱ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी पांडुरंग यांच्यावर देण्यात आली. त्यांनी २५ शेतकऱ्यांचा गट स्थापन केला. सर्वाना केशर आंबा लागवड प्रकल्पाची माहिती दिली. त्याचा भविष्यात काय फायदा होईल, हे पटवून दिले. स्थानिक शेतकऱ्यांसाठी काय चांगले करता येईल, यादृष्टीने नियोजनाला सुरुवात झाली. आंबा लागवडीला सर्व तयार झाले. यातील काहींकडे पाण्याची व्यवस्था होती. काहींकडे ती व्यवस्था नव्हती. आधुनिक आणि कमी पाण्यात पिकणारी शेती केल्यास लोकांचे स्थलांतर थांबेल, हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला. शेतीचे शास्त्रीय ज्ञान व्हावे, यासाठी गावातील शेतकऱ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. पारंपरिक, आधुनिक पध्दतीच्या शेतीविषयी माहिती जाणून घेतली. माती परीक्षण समजून घेऊन फळबाग लागवडीचे प्रशिक्षण आत्मसात करून घेतले.

प्रशिक्षणानंतर आठ-आठ शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले. प्रकल्पातील सहभागी शेतकऱ्यांच्या शेतात चार सेंद्रिय खतासाठी वाफे बसवले. शेतकऱ्यांना सामूहिक श्रमदानाचे महत्त्व सांगितले गेले. सर्वानी वाफ्यांसाठी जागा निवडली. स्वच्छ केली आणि खत निर्मितीला सुरुवात केली. या सेंद्रिय वाफ्यांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कमीत कमी रासायनिक खताचा वापर करावा आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीचा पोत सुधारावा. जेणेकरून चांगल्या प्रतीचे व भरघोस उत्पन्न देणारी फळबाग शेती विकसित करता येईल. कालांतराने खत तयार व्हायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना शेतीचे विविध आयाम समजावे, नवे प्रयोग करता यावे म्हणून नंतरही कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यात आली. तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला पुढे काय करायचे, याची शेतकऱ्यांची दिशा निश्चित झाली.

कृषी विज्ञान केंद्रातून केशर आंब्याची झाडे घेण्याआधी माती परीक्षण करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीतील माती आणि पाण्याचेही नमुने संकलित करण्यात आले. आम्ही १८ मातीचे आणि आठ पाण्याचे नमुने तपासून घेतल्याचे शेतकरी सांगतात. तेव्हा जमिनीतील माती या शेतीला पूरक नसल्याचे निदर्शनास आले. सारे प्रयत्न पुन्हा थांबले असतांना पुन्हा कृषी विज्ञान केंद्र मदतीस आले. तज्ज्ञांशी चर्चा करत जमिनीचा पोत वाढविण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घेतले. त्या अनुषंगाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. या सर्व धडपडीतून तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी लावलेली सर्वच्या सर्व केशर आंब्याची रोपे १०० टक्के जगली आहेत. त्यामुळे या भागात शाश्वत स्वरुपाचा रोजगार निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.

हरसूल परिसरातील जमीन केशर आंब्यासाठी अतिशय पूरक आहे. केशर आंबा अतिशय गोड व रसाळ असल्याने त्याला मागणी सुध्दा चांगली आहे. बेहडपाडा व आसपासच्या शेतकऱ्यांनी केसरची लागवड केल्यास केशर आंबा हरसूलची ओळख बनेल, असा विश्वास कृषी विभागालाही आहे. चिंचपाडा, सारस्ते येथील शेतकरी आंबे विकून सधन झाले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी केशर आंब्यावर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात हा परिसर केशर आंब्याचे आगार म्हणून ओळखला जाईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नियोजन कसे ?

बेहडपाडय़ासह आसपासच्या गावातील मातीचे परीक्षण करत जमीन केशरसाठी उपयुक्त आहे की नाही याची पडताळणी करण्यात आली. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देतांना शेतात सेंद्रिय वाफे तयार करुन खत निर्मितीला सुरुवात करण्यात आली. उन्हाळय़ात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन बंधारा, हौद, विहिरीच्या माध्यमातून पाणी साठवणुकीवर लक्ष देण्यात आले. वेळोवेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील शेतकऱ्यांचा दोन हजार केशर आंबा लागवडीचा सामूहिक प्रयोग दृष्टिपथास आला आहे.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Collective experiment of kesar mango farming zws

ताज्या बातम्या