scorecardresearch

Premium

‘मेट्रो’चे संरक्षक

निवृत्तीनंतर दिल्ली मेट्रोच्या संरक्षणासाठी पोलीस पथक उभारण्याची जबाबदारी मुकुंद उपाध्ये यांनी स्वीकारली ही मोठी जबाबदारी ते आजही पार पाडताहेत. त्यापूर्वी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून दिल्लीतील त्यांची कारकीर्द नाटय़मय घटनांची होती आणि त्याहीपूर्वी प्राध्यापक म्हणून मिळालेली मित्रमंडळी आणि त्या पेशाचेच संस्कार पोलिसी वर्दीतही जपण्याची वृत्तीही अनुकरणीय ..

‘मेट्रो’चे संरक्षक

निवृत्तीनंतर दिल्ली मेट्रोच्या संरक्षणासाठी पोलीस पथक उभारण्याची जबाबदारी मुकुंद उपाध्ये यांनी स्वीकारली ही मोठी जबाबदारी ते आजही पार पाडताहेत. त्यापूर्वी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून दिल्लीतील त्यांची कारकीर्द नाटय़मय घटनांची होती आणि त्याहीपूर्वी प्राध्यापक म्हणून मिळालेली मित्रमंडळी आणि त्या पेशाचेच संस्कार पोलिसी वर्दीतही जपण्याची वृत्तीही अनुकरणीय ..
दिल्लीत मेट्रो रेल्वे ११ वर्षांपूर्वी सुरू झाली तेव्हा मेट्रोच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे स्वतंत्र पथक उभारण्याची जबाबदारी मुकुंद उपाध्ये यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दिल्ली पोलीसचे संयुक्त महासंचालक (होमगार्डस्) म्हणून निवृत्त झाल्यानंतर, दिल्ली मेट्रोचे प्रणेते पद्मविभूषण ई. श्रीधरन यांच्यामुळे सव्वादोन वर्षांपूर्वी त्यांनी दिल्ली मेट्रो रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्तपद स्वीकारले. दररोज २५ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल्वे उपाध्ये यांच्या हाती सुरक्षित आहे. दिल्ली आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चमकदार कामगिरी बजावणारे भारतीय पोलीस सेवेतील मराठी अधिकारी म्हणून छाप पाडणारे उपाध्ये यांचा वाहतूक व्यवस्थापनातील अनुभव दांडगा आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांचे त्यांनी दोन वेळा नेतृत्व केले. दिल्ली पोलिसात गुन्हे, वाहतूक आणि स्वतंत्र जिल्ह्य़ाचा प्रभार हाताळण्याची संधी मिळालेल्या के. के. पॉल, नीरजकुमार आणि मॅक्सवेल परेरा या बडय़ा व मोजक्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान उपाध्ये यांनी मिळविला आहे.
कधीही मोठा दहशतवादी हल्ला होण्याची सदैव शक्यता असलेल्या मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी गृहखात्याच्या सौजन्याने आणि खर्चाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांकडे देण्यात आली आहे, तर मेट्रो रेल्वेशी संबंधित कायदा आणि सुव्यवस्था दिल्ली पोलीस हाताळतात. सीआयएसएफ आणि दिल्ली पोलीस यांच्याशी समन्वय साधणे, मेट्रोच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश आणि हरयाणा पोलिसांशी सतत संपर्क ठेवणे, मेट्रोच्या सुरक्षेसाठी नव्या प्रणाली आणणे, सुरक्षा जवानांना अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्रे उपलब्ध करून देणे आदींविषयीचे धोरणात्मक निर्णय उपाध्ये यांना घ्यावे लागतात. बाहेरच्या देशात कुठल्याही मेट्रोमध्ये सुरक्षा नाही. पण येथे मेट्रोची सुरक्षा विमानतळाच्या सुरक्षेसारखी असते. सामानाची तपासणी आणि अंगझडती झाल्याशिवाय कुणीही आत जाऊ शकत नाही. सीआयएसएफचे ४८६९ जवान आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिवसरात्र निगराणी ठेवली जाते. आपत्कालीन व्यवस्थापन, न्यायालयाचे काम, तांत्रिक चर्चा तसेच सरकारच्या विविध विभागांशी मेट्रोच्या वतीने समन्वय साधण्याचे काम उपाध्ये यांचे असते.  
२८ जुलै १९५० रोजी अमरावतीत जन्मलेले मुकुंद उपाध्ये यांची वनखात्यात कर्मचारी असलेले वडील श्रीराम उपाध्ये यांच्या नोकरीमुळे बालपणाची दहा वर्षे चिखलदऱ्यात गेली. अकोला, मोर्शी, अमरावतीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करीत त्यांनी नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रात एम.एस्सी. केले आणि घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे लगेचच अमरावतीच्या व्ही.एम.व्ही. महाविद्यालयात लेक्चररची नोकरी पत्करली. त्या वेळी वयाच्या २१ व्या वर्षी मतदानाचा हक्क मिळायचा. पण मतदानाचा अधिकार मिळण्यापूर्वीच उपाध्ये यांची १९७१च्या लोकसभा निवडणुकीत निर्वाचन अधिकारी आणि मतमोजणीवर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात टेबल टेनिस, टेनिस, क्रिकेट, हॉकी आणि अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामध्ये सहभागी होण्याची आणि महाविद्यालयात निवडणुका लढण्याची उपाध्ये यांना भारी हौस. १९६७ साली नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकीत विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून मतदान करण्यासाठी जाताना त्यांचे बडनेरा रेल्वे स्थानकावरून अपहरण करून दोन दिवस डांबून ठेवण्यात आले होते. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर कालांतराने उपाध्येंना खंडणीसाठी झालेल्या अपहरणाच्या प्रकरणांचा गुंता सोडवावा लागला आणि जोखीम पत्करून शस्त्रधारी अपहरणकर्त्यांला जेरबंद करण्यासाठी पुढाकारही घ्यावा लागला. तरुणपणी, रात्री घरी जाताना रस्त्यात लागणाऱ्या स्मशानाची त्यांना फार भीती वाटायची. पण पुढे हत्येच्या अनेक प्रकरणांमध्ये पोस्टमॉर्टमच्या वेळी त्यांना जातीने हजर राहावे लागले, स्मशानातील चितेवरची प्रेते खाली उतरवावी लागली आणि गाडलेली प्रेतेही उकरून काढावी लागली.
प्राध्यापकीच्या पेशात सात वर्षे स्थिरस्थावर होऊन एलएल.बी. पूर्ण करून पीएच.डी. करण्यात व्यग्र झालेल्या, राहते घर आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या उपाध्येंना आपण पोलीस अधिकारी होऊ असे वाटले नव्हते. पण त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी ज्युनियर असलेल्या लेक्चरर पत्नी चंद्रप्रभा यांची प्रेरणा मिळाली. गणितात एम.एस्सी., एम.फिल. आणि पीएच.डी. असलेल्या चंद्रप्रभा अमरावतीच्या जोग कुटुंबातल्या. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग त्यांचे काका. आपल्या पतीनेही काकांप्रमाणे पोलीस सेवेत रुजू व्हावे असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यानुसार आयएला पात्र होण्यासाठी शेवटचे वर्ष उरले असताना विशेष पूर्वतयारी न करता उपाध्येंनी परीक्षा दिली. जून १९७७ मध्ये त्यांची दिल्ली आणि अंदमान निकोबार कॅडरचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. दिल्लीत १९८२ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पोलीस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण करून स्पर्धेला संरक्षण कवच प्रदान करण्याचे काम त्यांनी चोख बजावले.  
दिल्ली पोलीसच्या वाहतूक शाखेचे दोन वेळा नेतृत्व करताना उपाध्ये यांना देशात सर्वाधिक वाहने असलेल्या या शहरात ओसंडून वाहणाऱ्या बेशिस्त वाहतुकीचा जवळून अभ्यास करण्याची तसेच संगणकाच्या साह्य़ाने त्याचे तत्परतेने व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली. दिल्लीच्या वाहतूक विभागात संगणकीकरणाची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना जाते. याच काळात दिल्लीचे निवृत्त पोलीस आयुक्त के. के. पॉल यांच्यासोबत वाहतूक विभागात काम करण्याची संधी मिळाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि व्ही. पी. सिंह यांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन त्यांनी समर्थपणे हाताळले. राजीव गांधींना काही झाले तर आपला जीव तरी जाईल किंवा नोकरी तरी जाईल, अशी टांगती तलवार होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची सुरक्षा व्यवस्था उपाध्ये यांनी सांभाळली. वाहतूक व्यवस्थापन, पोलीस संपर्कयंत्रणा, माहिती आणि तंत्रज्ञान, नागरी संरक्षण आणि आपत्कालीन व्यवस्थापन, क्रीडा व्यवस्थापन, मोटरगाडय़ांच्या ताफ्याचे व्यवस्थापन, व्हीआयपी सुरक्षा या क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला.  दिल्ली विद्यापीठातून फोरेन्सिक सायन्समध्ये डिप्लोमा आणि एमबीए करण्याचा वाहतूक व्यवस्थापनात भरपूर फायदा झाल्याचे ते सांगतात.
जामा मशीद, फतेहपुरी मशीद, तीस हजारी कोर्ट, दिल्ली विद्यापीठ अशी संवेदनशील स्थळे असलेल्या उत्तर दिल्लीत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवली. या कामगिरीची बक्षिसी म्हणून त्यांना अत्यंत महत्त्वाच्या दिल्ली गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून बढती देण्यात आली.   या पदावर उपाध्ये अडीच वर्षे होते. याच काळात लोकसभेच्या खासदार असलेल्या फूलनदेवी यांची भर दिवसा हत्या झाली. या प्रकरणाचा कसोशीने छडा लावला आणि आरोपी शेरसिंह राणाला अटक करण्यात यश मिळविले. फूलनदेवी हत्याकांड प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर गुरू के. के. पॉल यांना समर्पित करण्यासाठी त्यांनी पुस्तक लिहण्याचे ठरविले आहे. गुन्हे शाखेत उपायुक्त असताना उपाध्ये यांच्यावर देशभर गाजलेले आणि स्व. प्रमोद महाजन यांचे नाव आल्यामुळे राजकीयदृष्टय़ा संवेदनशील ठरलेले पत्रकार शिवानी भटनागर प्रकरण हाताळण्याची वेळ आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आर. के. शर्मा हा त्यांचाच धूर्त आयपीएस सहकारी होता. फूलनदेवीची हत्या झाली त्या दिवशी उपाध्ये आणि आर. के. शर्मा मुंबईत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एकाच बाकावर बसून प्रशिक्षण घेतहोते. देवनारच्या अतिथीगृहातही उपाध्ये आणि शर्मा एकत्रच थांबले होते. ‘हत्येनंतर चलाख शर्मा अडीच महिने फरार राहिला. त्याची सर्व बेनामी संपत्ती कोर्टाकडून सील करविली आणि उरलीसुरली संपत्ती जप्त होण्याच्या भीतीने पत्नीच्या दबावाखाली तो शरण आला,’ असे उपाध्ये सांगतात. लालकृष्ण अडवाणींच्या मेहुणीच्या जावयाच्या खंडणीसाठी झालेल्या अपहरणाचा गुंताही उपाध्ये यांनी समर्थपणे सोडविला. अपहरण करणारा ब्रह्मप्रकाश नावाचा सीआयएसएफचा उंचापुरा शिपाई होता. त्याला उपाध्येंनी एकटय़ानेच पकडले. नंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात चकमकीत ठार झाला. या धाडसी कारवाईसाठी उपाध्ये शौर्य पदकाने गौरविण्यात आले. ३३ वर्षांच्या पोलीस सेवेत राष्ट्रपती पदक, पोलीस शौर्य पदकासह चार पदकांनी उपाध्येंचा गौरव झाला. मात्र, दिल्लीच्या वादग्रस्त पोलीस अधिकारी किरण बेदी यांच्या सान्निध्याचा फटकाही त्यांना बसला. किरण बेदींचे सहकारी म्हणून त्यांना जमेल तिथे डावलण्यात आले.  
अशा कारकिर्दीचा आढावा घेताना उपाध्ये समाधान व्यक्त करतात. पत्नीने कामात व्यत्यय नव्हे, प्रोत्साहनच दिले. कुठलीही मागणी केली नाही. त्यामुळे इमानदारीत जगणे शक्य झाले, असे ते सांगतात. दिल्लीत काटकसरीने राहताना त्यांनी मुलांना (मंजिरी आणि निखिल) सरकारी शाळेतच शिकविले. बी.एस्सी., एमबीए करून दोघांनीही खासगी क्षेत्रात नोकरी पत्करली आणि आंतरप्रांतीय विवाह केले. थोरल्या मंजिरी कॅडबरीमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. त्यांचे पती उत्तर प्रदेशचे सौरव सिंह विप्रोमध्ये काम करतात. निखिल टाटा इंटरनॅशनलमध्ये उपाध्यक्ष आणि संचालक आहेत. त्यांच्या पत्नी कृतिका नारायणन ओरॅकलमध्ये काम करतात. महाराष्ट्र पोलिसात उपअधीक्षक म्हणून निवृत्त झालेले त्यांचे भाऊ रघुनाथ आणि भगिनी प्रमिला देशमुख आज हयात नाहीत. पण विदर्भातील वडोदकर, कस्तुरे आणि जोग या नातलगांशी त्यांचा संपर्क आहे. फावल्या वेळात क्रिकेटचे सामने पाहायला आणि क्रिकेट नसेल तर मराठी वृत्तवाहिन्यांवरील असलेली राजकीय चर्चा बघायला त्यांना आवडते. लेखक वसंत आबाजी डहाके, अरुण शेळके, सुरेंद्र भुयार, सुधाकर गणगणे हे त्यांचे परममित्र.
उपाध्ये यांनी दिल्लीव्यतिरिक्त अरुणाचल प्रदेशातही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या. अरुणाचल प्रदेशात त्यांची विदर्भातील संघाच्या प्रचारकांशी मैत्री झाली. त्यातून त्यांनी भाजपचे सतीश वेर्णेकर यांच्या सहकार्याने विवेकानंद केंद्रीय विद्यालय सुरू केले आहे. दिल्लीतील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ते संचालक मंडळांवर आहेत. त्यांच्या आई आणि सासऱ्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठात रसायनशास्त्र आणि गणितात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. रसायनशास्त्रात नवे काय चालले हे जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा अजूनही कायम आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protector of metro

First published on: 15-06-2013 at 12:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×