केवळ शेती करून यापुढे भागणार नाही हे ज्यांच्या लक्षात आले, त्या शेतकऱ्यांनी या क्षेत्रात सुरू असलेले नवनवे बदल स्वीकारले. ऊतीसंवर्धन (टिश्यू कल्चर) तंत्रज्ञान आणि त्यातून पुढे आलेला रोपवाटिका व्यवसाय हेही या शेतीतील बदलाचे एक अंग. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शेट्टी कुटुंबीयांनी हीच नवी वाट चोखाळत ऊस शेतीला नवा आयाम दिला आहे, याचविषयी…
दंतवैद्य होऊन वैद्यकीय क्षेत्रात स्थिरस्थावर होण्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात आलेले. त्याच वेळी म्हणजे २००५-०६ च्या आसपास आर्थिक समस्या उद्भवल्या. स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची गरज होती. कुटुंबीयांची परिस्थिती जेमतेम. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडे जाणारी वाट थांबली आणि नवी वहिवाट सुरू झाली ती कृषी क्षेत्राची. ऊतीसंवर्धन (टिश्यू कल्चर) रोपवाटिका व्यवसाय चांगलाच बहरला आहे. हिरव्यागार शेत शिवाराची गोडी इतकी वाढली, की आता हेच क्षेत्र जीवनाचा मार्ग बनले आहे.
उसाची ऊतीसंवर्धन रोपवाटिका काही राज्यांमध्ये विस्तारली आहे. अडीच ते तीन कोटी रोपांची दर वर्षी निर्मिती केली जाते. अनेक कारखान्यांकडून या रोपांना मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढत आहे. हे घडवले डॉ. सुदर्शन शेट्टी यांनी. त्यांच्या आधी सुमतिनाथ शेट्टी यांनी रोपवाटिकेची पायवाट रुजवली. पुढे ती डॉ. सुदर्शन शेट्टी आणि उत्तम शेट्टी या भावंडांनी ती चांगलीच विस्तारली. २२ एकरवर बेणे मळा तयार करून अनेक शेतकऱ्यांना स्वावलंबी केले आहे.
कृष्णा – पंचगंगा नदीकाठच्या तालुक्यांत रोपवाटिका तशा पुष्कळ आहेत; पण गुणवत्तापूर्ण, खात्रीशीर रोपवाटिकेमध्ये शेट्टी यांच्या स्वाभिमानी फाउंडेशन ऊस रोपवाटिकेचे नाव आवर्जून येते. अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे बी. एस्सी. (ॲग्री) झालेल्या सुमतिनाथ शेट्टी यांना वडिलोपार्जित शेतीतील मिळालेला वाटा तसा मर्यादित होता. पुरामुळे क्षारपीडितेचा धोका निर्माण झालेली जमीन. त्यामुळे उत्पन्न मर्यादित. अशा वेळी त्यांनी रोपवाटिकेचा (नर्सरी) पर्याय शोधला. हाडाचे शेतकरी असलेल्या सुमतिनाथ यांनी रोपांचे चांगले हार्डनिंग, उत्तम वाणाची रोपे तयार केली. छोट्या जागेत व्यवसाय सुरू केला. रोपे खात्रीशीर असल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. अल्पावधीतच व्यवसायात जम बसला. साखर कारखान्याला रोपे पुरविली जाऊ लागली. त्यातून हळूहळू परीघ रुंदावत गेला.
त्याच वेळी थोरले सुपुत्र सुदर्शन शेट्टी हे कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दंतवैद्यक अभ्यास करीत होते. डेंटिस्ट (दंतवैद्यक) म्हणून रुग्णसेवा करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु घरची परिस्थिती तेव्हा यथातथा होती. पैशाची चणचण जाणवू लागल्याने त्यांनीही नंतरच्या काळात वैद्यकीय क्षेत्रापेक्षा शेती क्षेत्र जवळ केले. वडिलांच्या बरोबरीने रोपवाटिकेच्या क्षेत्रात पदार्पण केले. प्लास्टिक ट्रे, कोकोपीट पुरवठ्याची एजन्सी डॉक्टर सुदर्शन यांनी मिळवली. त्यातूनच त्यांनी या व्यवसायाला जवळ केले. दुसरे सुपुत्र उत्तम शेट्टी यांनीही वडील आणि भाऊ यांच्याप्रमाणे शेती व्यवसायात लक्ष घातले. तिघेही याच व्यवसायात कार्यरत झाले. त्यांनी आणखी अडीच एकर क्षेत्रात रोपवाटिकेचा विस्तार केला. मेहनतीचे, परिश्रमाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ दिसू लागले.
ऊतीसंवर्धन (टिश्यू कल्चर) रोपांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचे काम या कुटुंबीयांनी स्वीकारले. ऊती म्हणजे एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणाऱ्या पेशींचा समूह. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत, नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या तंत्राला ऊतीसंवर्धन म्हणतात. या तंत्रात वनस्पतीच्या जिवंत पेशी ठरावीक तापमान असलेल्या वृद्धीमाध्यमात वाढविल्या जातात. त्यापासून बनलेली रोपे गुणवत्तापूर्ण असतात.
अलीकडच्या सात-आठ वर्षांमध्ये शेट्टी कुटुंबीयांच्या व्यवसायाचे स्वरूप चांगलेच बदलले आहे. ते आपल्या रोपवाटिकेत पाडेगाव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, कोईमतूर येथून ऊतीसंवर्धित रोपे आणतात. त्याचे बेणे मळे तयार करतात. हे बेणे खात्रीलायक असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अशा प्रकारचे बेणे मळे प्रारंभी दोन एकरवर सुरू केले. शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धनाचे पहिल्या-दुसऱ्या टप्प्याचे बेणे दिले जातात. त्यांच्याकडून तयार करून घेतलेली रोपे पुढच्या टप्प्यातील ग्राहक शेतकऱ्यांना दिली जातात.
सध्या त्यांच्या रोपवाटिकेतील रोपांना चांगलीच मागणी वाढलेली आहे. बऱ्याच राज्यांमध्ये त्याचा विस्तार होऊ लागला आहे. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी, कर्नाटकात दीड कोटी, मध्य प्रदेश – दहा लाख, आंध्र प्रदेश – दहा लाख, गुजरात – सहा लाख यांप्रमाणे दर वर्षी रोपे विक्रीला जात असतात. रोपांची मागणी वाढू लागल्याने व्यवसायासाठी त्यांनी आठ वाहने खरेदी केली आहेत. शेतामध्ये सुमारे ४० लोकांना रोजगार मिळाला आहे. इतकेच नव्हे, तर ते आपले बियाणे वाढवण्यासाठी इतर शेतकऱ्यांकडून बेणे तयार करून घेतात. अशा सुमारे ५० एकर जागेत ते तयार करून घेतले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पाडेगाव येथून सुरुवातीला त्यांनी पाच लाख रोपे आणली. ती बेणे मळा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत दिली. कारण या शेतकऱ्यांकडे रोपांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसा नव्हता. आता हा शेतकरी स्थिरस्थावर झाला आहे. त्यांच्याकडून दुसऱ्या टप्प्यातील बियाणे घेतले जाते.
या शेतकऱ्यांना प्रतिएकर २६५ जातींच्या उसासाठी ४१०० रुपये, तर ८६०३२ जातीसाठी ३८०० रुपये दर दिला जातो. सुमारे दहा महिन्यांत हे बेणे पीक तयार होते. शिरढोण, कारदगा अशा महाराष्ट्र – कर्नाटक येथील गावांमध्ये अशा पद्धतीचे बेणे केले जाते. मुख्य म्हणजे या रोपवाटिकेमध्ये लावण स्वरूपातच बेणे केले जाते. ते काढून झाले, की रोटर फिरवून सरी काढून त्यात पुन्हा लावण केली जाते. खोडवा पीक घेतले जात नाही. अशा पद्धतीने चांगले बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाचे पीक चांगले येते. ७० ते १०० टन ऊस घेणारे शेतकरी आहेत.
सुरुवातीला ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, कोईमतूर, पाडेगाव या ठिकाणाहून उसाची रोपे आणतात. त्यास २५ ते ३० फुटवे असतात. त्यापासून पुन्हा रोपे करून घेतले जातात. ती वाढवून शेतकऱ्यांना विकली जातात. चांगल्या बियाण्यांचा पुरवठा करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेऊन कर्नाटकातील विश्वराज शुगर इंडस्ट्रीज (बेल्लाद बागेवाडी, तालुका अथणी) या कारखान्याच्या वतीने डॉ. सुदर्शन शेट्टी यांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापूर – सांगली नर्सरी संघटनेचे ते सदस्य आहेत. एकूण मिळणारा प्रतिसाद पाहता हे क्षेत्र आणखी वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर लवकरच प्लास्टिकचा ट्रे निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या कामाला हात घातला आहे. त्याला लागणाऱ्या रोलची निर्मितीही केली जाणार आहे. रोपवाटिका व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा एका छतामध्ये उपलब्ध करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
ऊस रोपे ते कोकोपीट
सुमतिनाथ शेट्टी हे शेतकरी असले, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येण्याची त्यांची तयारी असते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. ऊस, दुधासह सर्व प्रकारच्या शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. गावातील सेवा संस्थेचे ते संचालक आहेत. याचबरोबर त्यांची मुले डॉ. सुदर्शन व उत्तम शेट्टी यांनीही उत्तम शेती हाच ध्यास घेऊन या क्षेत्रात काम करायचे ठरवलेले आहे. परिसरातील रोपवाटिकांना त्यांच्याकडून कोकोपीटचा पुरवठा केला जातो. त्यांच्याकडे को-८६०३२, २६५, ९२९३, मंड्या ५१७, ३१०२, तसेच टिश्यू कल्चर रोपे पुरवली जातात. वेळेवर दिली जाणारी गुणवत्तापूर्ण रोपे ही त्यांची खासियत आहे.