नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यांची तुलना केली असता राहुल आले आणि परतले,
पण या भेटीचा राजकीय लाभ उठविण्यात काँग्रेसला काहीच यश आले नाही. मोदी हे पाच तासांसाठी मुंबई भेटीवर आले, पण त्यांनी जे काही केले त्यातून वातावरणनिर्मिती करण्यात भाजप यशस्वी झाला..
निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ सर्वात जास्त म्हणजेच ४८ खासदार राज्यातून निवडून येत असल्याने देशाच्या राजकीय नकाशावर महाराष्ट्राला महत्त्व प्राप्त होते. यातूनच सर्वच राजकीय पक्ष महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊ लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गेल्या वेळेएवढे खासदारांचे संख्याबळ कायम राखण्यावर भर असताना, भाजपचे निवडणूक व्यवस्थापन करणाऱ्यांनी राज्यातून युतीचे ३० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. काँग्रेस किंवा भाजप दोन्ही आघाडय़ांनी महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे ते ४८ ही संख्या लक्षात घेऊनच. यातूनच आठवडाभराच्या अंतराने राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोन दिग्गज नेते राज्यात येऊन गेले. आता उभयतांमध्ये पाठशिवणीचा खेळ सुरू होणार आहे. कारण एक येऊन गेला तर लागोपाठ दुसरा फिरकणार हे ओघानेच आले. राज्यातून जास्त जागा निवडून आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या दोन्ही नेत्यांपुढे एक समान धागा आहे व तो म्हणजे मित्र पक्षांना चुचकारण्याचे आव्हान. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यावर मोदी यांनी केलेला मुंबईचा दौरा किंवा राहुल गांधी यांच्या नागपूर आणि पुणे दौऱ्यातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला.
या दोन नेत्यांपैकी राहुल गांधी हे प्रथम राज्याच्या दौऱ्यावर आले होते. नागपूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये त्यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला. राहुल गांधी यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांच्यावर दडपण येऊ नये म्हणून मुख्यमंत्री वा प्रदेशाध्यक्षांना बरोबर घेण्याचे ते टाळतात. बंद खोलीतील आढावा सत्रातून ते राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतात. प्रत्येक नेत्याची कार्यपद्धती वेगळी असली तरी अन्य नेत्यांप्रमाणे राहुल कार्यकर्त्यांमध्ये सरमिसळ होताना दिसत नाहीत. मोदी यांच्याप्रमाणे राहुल पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आलेले नाहीत. राहुल यांनी भेट दिली त्या नागपूर आणि पुण्यात काँग्रेसचे खासदार आहेत. नागपूर आणि रामटेक हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. राहुल यांच्या दौऱ्याचा राजकीय लाभ उठविण्याचा स्थानिक काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न होता. नरेंद्र मोदी आक्रमकपणे समोर येत असल्याने राहुल यांच्या दौऱ्यातून राजकीय फायदा उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, पण काँग्रेसला त्याचा काहीच राजकीय लाभ झाला नाही, अशी पदाधिकाऱ्यांचीच तक्रार आहे. राहुल हे दोन्ही शहरांमध्ये आले ते केवळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीकरिता. नागपूरमधील एक अपवाद वगळता सर्वसामान्यांमध्ये ते गेले नाहीत वा कोणाला भेटलेही नाहीत. मोदी वेगळीच वातावरणनिर्मिती करीत असताना राहुल आपल्या शहरांमध्ये येतात, पण त्याचा राजकीय लाभ उठविता आला नाही याची रुखरुख स्थानिक काँग्रेस नेत्यांना आहे.
राहुल गांधी यांचे एक, तर नरेंद्र मोदी यांचे अगदी वेगळे.. हिरे व्यावसायिकांच्या कार्यक्रमासाठी मोदी हे काही तासांसाठी मुंबईत आले होते. विमानतळापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत मोदी यांची काय हवा तयार करण्यात आली होती. विमानतळावर तर भव्य शक्तिप्रदर्शन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले. पश्चिम द्रुतगती मार्गावर मोदी यांच्या भेटीने वाहतूक ठप्प झाली होती. हिरे व्यावसायिकांच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मोदी यांचा झंझावातच वेगळा होता. या तुलनेत राहुल यांच्या दौऱ्याचा कोठेही डामडौल नव्हता.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्यांची तुलना केली असता राहुल आले आणि परतले, पण या भेटीचा राजकीय लाभ उठविण्यात काँग्रेसला काहीच यश आले नाही. मोदी हे पाच तासांसाठी मुंबई भेटीवर आले, पण त्यांनी जे काही केले त्यातून वातावरणनिर्मिती करण्यात भाजप यशस्वी झाला. मोदी किंवा भाजपच्या दृष्टीने मुंबई हे महत्त्वाचे असल्याने मोदी यांच्या मुंबईतील भेटी वाढल्या आहेत. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुंबईने काँग्रेसला साथ दिली. मध्यमवर्गीय मतदार मतदानाला बाहेरच पडत नाही, याउलट झोपडपट्टय़ांमध्ये मतदानाला रांगा लागतात. मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यावरच भाजपने भर दिला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या मदतीशिवाय यश मिळविणे कठीण जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे राष्ट्रवादीने यापूर्वीच जाहीर केले आहे. भाजपला मात्र वेगळी चिंता आहे. शिवसेनेबरोबर गेली दोन दशकांची युती असली तरी मनसेचे काय करायचे, हा भाजपपुढे प्रश्न आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत भाजपच्या धुरिणांना साशंकता आहे. मोदी यांच्यासाठी २७२ हा जादुई आकडा गाठणे हे मोठे आव्हान आहे. कर्नाटकात भाजपमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे भाजपबरोबर राहतील याची खबरदारी घेतली गेली. झारखंडमध्ये बाबुलाल मरांडी यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातून ३० ते ३२ जागांचे लक्ष्य गाठायचे असल्यास मोदी यांना उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणावे लागेल. मनसेने वेगळी चूल मांडल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो.  मुंबईतील कार्यक्रमात मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आपले छोटे भाऊ असा केला होता. छोटय़ा आणि धाकटय़ा भावांना एकाच जहाजावर स्वार करण्याचे आव्हान मोदी यांना पार पाडावे लागणार आहे. राज ठाकरे यांच्याबरोबर मोदी यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांच्याच निमंत्रणावरून गुजरातच्या विकासाची पाहणी करण्याकरिता राज ठाकरे यांनी गुजरातच्या कानाकोपऱ्याचा दौरा केला होता. मतांचे विभाजन टाळण्याकरिता भाजप- शिवसेना- मनसे- रिपाइं आठवले या सर्वाची मोट बांधण्याचा प्रयत्न असतानाच दुसरीकडे निधर्मवादी मतांचे विभाजन कसे टाळता येईल, हे काँग्रेसला बघावे लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करायचे असल्यास राष्ट्रवादीला नामोहरम करणे हे राहुल गांधी यांचे उद्दिष्ट आहे.
राहुल गांधी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संबंध जगजाहीर आहेत. अध्यादेशावरून राहुल गांधी यांनी भूमिका घेताच राष्ट्रवादीने विरोधाचा सूर लावण्याची संधी सोडली नाही. राहुल गांधी यांच्या कलाने सरकार चालणार असल्यास कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला घ्या, असा खोचक सल्लाही शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे. राज्यात काँग्रेस २६, तर राष्ट्रवादीने २२ जागा लढवाव्या असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे. मात्र राज्यातील काँग्रेस नेत्यांना हे सूत्र मान्य नाही. काँग्रेसचे नेते जागावाटपावरून आक्रमक होण्यामागे राहुल गांधी यांची असलेली साथ कारणीभूत असल्याचा राष्ट्रवादीमध्ये संशय आहे. ही तर सुरुवात आहे. मोदी विरुद्ध गांधी हा सामना आणखी रंगणार आहे.
महाराष्ट्रात मोदी घटक (फॅक्टर) कितपत चालेल याचा सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते अंदाज घेत आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे या सर्वच महानगरांमध्ये गेल्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लोकसभेत यश मिळाले होते. शहरी भागातील आघाडीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठीच मोदी यांचा वापर करून घेण्यावर भाजपचा भर आहे. मोदी यांच्याप्रमाणेच राहुल यांनी आता आक्रमक व्हावे, हीच राज्यातील काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे.