जय पाटील

कोणाच्या डोक्यावर हक्काचं छत नाही, कोणाच्या हाताला काम नाही… कोणाकडे घर आहे पण घरात अन्नाचा दाणा नाही… कोणाकडे घर आहे पैसे आहेत, पण वृद्धत्वामुळे धान्य आणण्याची ते शिजवून खाण्याची क्षमता नाही… गेल्या दोन महिन्यांत अशा कितीतरी संकटग्रस्तांना विशेषतः एकट्या-दुकट्या वृद्धांना विविध स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. मीरा भाईंदर येथील वुई ग्रुप आणि सिल्व्हर इनिंग्ज या संस्थाही त्यापैकीच! या दोन संस्थांनी अन्य लहानमोठ्या संस्थांच्या बरोबरीने अशा अनेक संकटग्रस्तांना हुडकून काढून त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय केली.

आजवर त्यांनी १० हजार ७०० हून अधिक गरजू व्यक्तींना १५ दिवसांचं धान्य पुरवलं आहे. टाळेबंदी संपेपर्यंत अशा प्रकारे धान्य मिळत राहील, याची काळजीही घेण्यात येत आहे. या संस्थांनी धान्यपुरवठा केलेल्यांमध्ये तीन हजार १०० स्थलांतरित मजूर, बेरोजगारीचा सामना करणारी एक हजार ४०० कुटुंबं आणि सुमारे ६०० तृतीयपंथींचा समावेश आहे. बांधकाम मजूर, रिक्षाचालाक, घरकाम करणाऱ्या महिला आणि एकट्या-दुकट्या वयोवृद्धांना त्यांनी मदत मिळवून दिली आहे.

पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, एक किलो तूरडाळ, १ लिटर तेल, १ किलो मीठ, एक किलो साखर आणि बिस्किटं असं सुमारे ७०० रुपयांचं धान्य एका कुटुंबाला देण्यात येतं.

व्यक्तींप्रमाणेच काही अनाथाश्रम, वृद्धाश्रम, प्राणी-पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संस्था, पोलीस, आरोग्य सेवेतील व्यक्ती यांनाही त्यांच्या गरजेनुसार वस्तूंचा पुरवठा संस्थांच्यावतीने करण्यात आला आहे. शिजवलेलं अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणांना साहाय्य करणं, करोनाकाळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरं आयोजित करणं इत्यादी उपक्रमही या संस्थांनी राबवले आहेत.

करोनामुळे उभं ठाकलेलं आव्हान परतवून लावण्यासाठी अशा कितीतरी स्वयंसेवी संस्था सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. काही व्यक्ती वैयक्तिक स्तरावर जेवढी शक्य तेवढी मदत करत आहेत. अनेकांना तगून राहण्याचं बळ देत आहेत.