News Flash

कथा : वारी

दुपारच्या वेळेस सालेगावच्या देवळासमोर पालखी विसावली.

‘पुण्डलिक वरदा हारी विठ्ठल’ बोला तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव माऊली की जय. दुपारच्या वेळेस सालेगावच्या देवळासमोर पालखी विसावली. कोणी पानाची चंची खोलली, कोणी चिलम साफ करू लागले. कोणी आपल्या नातेवाइकांकडे भेटायला आणि जमलंच तर जेवायला रवाना झाले. पण झाडाखाली शरद आपली बॅग उशाला घेऊन निर्विकार आणि आरामात पडला होता. झोपेतच त्याला कोणी उठवत आहे, असा भास झाला. डोळे उघडून पाहतो तर तीन लहान मुलं त्याला प्रेमाने म्हणत आहेत, ‘‘दादा आमच्या घरी जेवायला चला ना?’’

त्यांचा सारखा एकच आग्रह. आता शरद उठून बसला. त्या तिन्ही मुलांना त्याने निरखून पाहिले. दोन मुलं, एक मुलगी. मोठा मुलगा अंदाजे दहा वर्षांचा. त्याहून धाकटा आठचा, त्यानंतर मुलगी सहा अथवा साडेसहाची. पण सर्वच मुलं लाघवी आणि प्रेमळ. शरदनी तिघांना आपल्याजवळ बोलाविले. प्रेमाने जवळ घेतले. मुलीला मांडीवर बसवून तिघांना आपल्या बॅगमधून बिस्किटांचा पुडा काढून दिला. मुलांनी बिस्कीट खाल्ले. असे बिस्कीट त्यांनी कधीच खाल्ले नव्हते.

‘‘आता आपले आपले नाव सांगा.’’ शरद.

‘‘मी गोपाळ, पण समदे मला गोपू म्हनत्यात अन् हा श्याम पण हेला बी शाम्या म्हनत्यात.’’

‘‘अन् ही आमची भयीन सखू, पण हिला समदे सखूच म्हनत्यात.’’

‘‘घर कोठे तुमचे’’ शरद.

‘‘हे काय या वावराच्या मागेच हाये. चला ना भाऊ’’ शरद उभा राहिला आणि सखूला कडेवर घेऊन म्हणाला, ‘‘चला’’.

एवढा मोठा माणूस आपल्या घरी येतोय, यांचे मुलांना फार कौतुक. त्याचे घडय़ाळ, त्याचे जोडे, त्याची कॅप, त्याची हॅवर सॅक, सगळ्या गोष्टींचे त्यांना फार कौतुक. साऱ्या गावाला जणू त्यांना दाखवायचे पहा आमच्या घरी किती मोठ्ठा साहेब जेवायला येतो आहे.

शरदने घर दुरूनच पाहिले. घर झोपडीनुमा होते, पण समोर मोकळी जागा. घराला समोर मोकळी ओसरी. आत दोन खोल्या. घरासमोर मोठे लिंबाचे झाड. मुलं पळतच आत गेली.

‘‘आजी, आजी पा तर आपल्या घरी कोन सायब आल्यात.’’

आतून एक म्हातारी आली वय असेल साठ-पासठ.

‘‘आई ,राम राम मी शरद’’ आणि त्याने म्हातारीला वाकून नमस्कार केला.

म्हातारीने पितळी भरून आणली. शरदने जोडे काढून हात-पाय, तोंड स्वच्छ धुतले. तेवढय़ात गोपूने एक तरट अंथरले. शरद त्यावर आरामात बसला. तेवढय़ात म्हातारीने पितळेच्या ताटात जेवण आणले.

जेवण म्हणजे काय दोन भाकरी एक पालेभाजी, कांदा आणि लसणाची चटणी. शरद जेवायला बसला. मुलं जवळच होती. सारं कौतुकानी पाहत होती.

‘‘चला, तुम्ही पण माझ्याबरोबर जेवा.’’ मुलं संकोच करू लागली तसे शरदने तिघांना ओढून जवळ बसविले आणि पहिला घास मांडीवर बसलेल्या सखूच्या तोंडात घातला. मग तर त्यांना संकोच राहिलाच नाही. सर्वानी छान जेवण केले.

‘‘आई, आता तू पण जेव की’’

‘‘बाबा इट्टला तू गरिबा घरची भाकर खाल्ली माझं पोट बी भरलं. आज इट्टलाचे दर्शन झाले.’’

‘‘हे बघ आई, तू मला देव काही बनवू नको. मी एक साधारण मनुष्य आहे. मी एकटा. माझ्या मागे रडणारे कोणीच नाही. म्हणूनच सैन्यात भरती झालो. बीस वर्ष सैन्यात नोकरी केली. किती दुश्मनांना मारलं काही माहीत नाही. नोकरी पूर्ण झाली. आता करायचे काय. विठोबाची पालखी निघाली, तर चला आपण पण. देवाशी आपली दोस्ती नाही, पण वैरपण नाही. ही मुलं भेटली, असे वाटले कोणी आपल्याशी प्रेम करत आहे. यांच्या ओढीने येथे आलो. आता माझी पंढरी येथेच. पण आई तू तर यांची आजी. त्यांचे आई-बाबा काय शेतावर कामाला गेले का?’’

‘‘आता काय सांगू बाबा चित्तर कथा. दोन वर्सामाग हेचा बा गेला त्येच्या मागं वरीस भराने यांची माय बी गेली. काय कारण काई नाई. बेमार बी काई नाही. चार दिस पडून होता हेंचा बा. हेंची माय बी असीच गेली. ही सखू तर न्हानच हुती. मी हिम्मत केली. लेकरांना मोठं करते. यावर जसा इट्टल पांडुरंग करील ते खरं.’’

शरदने विचार केला ही बाई, त्यात अशिक्षित; पण या मुलांचा सांभाळ करत आहे. आपण पुरुष त्यात फौजी. अंगामध्ये रग आहे. पैशाची कमी नाही. फक्त काय करावे आणि कोणासाठी करावे हे उमजत नाही. आता दिशा नक्की झाली. सैन्यामध्ये असताना त्यांना एकदा लक्ष्य समजावून सांगितले तर बरोबर लक्ष्यावर धावून जातील. त्यात येणारी अडचण कसेही करून दूर करतील. या तर लक्ष्यापर्यंत पोचतील अथवा प्राण देतील हीच वृत्ती प्रत्येक सैनिकांमध्ये ठासून भरलेली असते. त्यात शरद पण अपवाद नव्हता. त्याला लक्ष्यप्राप्ती झाली होती. आता फक्त फायर म्हणायचे होते.

दोन दिवसांत शरदने पूर्ण घराचा, कुटुंबाचा आढावा घेतला. घरात अभाव होता. पण गरिबी नव्हती. शेती बऱ्यापैकी होती, पण करणाऱ्यापेक्षा बळकावणारे जास्त होते. यांच्या लाचारीचा फायदा घेणारे जास्त होते. काही शेती भाऊबंदाने बळकावली होती. काही सालाने करणारे होते. पण उत्पन्नाचा फार कमी वाटा यांच्या वाटणीत येत होता. शरदला सर्व परिस्थितीची कल्पना आली. आता लक्ष्य आणि शत्रू समोर होते. फक्त फायर करण्याचा अवकाश होता.

सर्वात आधी त्यांनी मुलांना सांगितले, ‘‘मी तुमचा मामा आहे. तुम्हाला सांभाळायला आलो आहे. आता येथेच राहणार आहे.’’ घरात ज्या गोष्टी हव्या त्या बाजारातून आणल्या. मुलांना कपडे करून त्यांना शाळेत घेऊन गेला. सखू त्याच्या कडेवरच होती. शाळेत सर्व मुलं, मास्तर त्याला पाहायला लागली. सखूला मुली विचारू लागल्या, हा कोण सायेब हाय.’’

‘‘त्यो माझा मामा हाय, फौजी मधी हुता. बंदूक चालवित हुता. ठय़ां ठय़ां.’’

मास्तर, हेडमास्तर सर्वच या सायबाला पाहात होते. उंचपुरा, भरल्या अंगकाठीचा, रुबाबदार.

‘‘राम राम मंडळी मी शरद. या मुलांचा मामा, सैन्यात होतो. या मुलांना माझी आवश्यकता आहे. आता येथेच राहणार आहे. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या. बराय येतो मी राम राम.’’

दुसऱ्या दिवशी शरद तालुक्यात मामलेदारांना भेटला.

‘‘नमस्कार साहेब, मी शरद एकनाथ जोशी. सैन्यामध्ये सुभेदार होतो. आता आपल्या गावात राहणार आहे. येथे माझे नातेवाईक आहेत. अर्जात सविस्तर माहिती दिली आहे.’’

मामलेदार ‘‘पण तुम्ही हे आम्हाला का सांगता?’’

शरद ‘‘साहेब तसा नियम आहे. आम्हाला काही त्रास सिव्हिलियनकडून झाला तर आमचे साहेब थेट दिल्लीहून येतात. त्याच करता हे करावे लागते. बराय नमस्कार साहेब.’’

याचप्रमाणे स्थानीय पोलीस चौकीतही ओळखपत्र दिले. तिथे पण हेच सांगितले. आमच्या सुरक्षिततेची जिम्मेदारी सैन्याकडेच आहे.

आता ठीक आहे. आता ज्यांनी बळजोरीने जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्यांना सामोपचाराने समजवणे आवश्यक होते, पण हे काम साधे नव्हते. त्यांनी मिश्यांवर ताव मारला. दंडे-कुऱ्हाडी यांच्यासमोर ठोकल्या. शरद न घाबरता पंचायत चावडीवर एकटा गेला. मुख्य हिरोला उद्देशून थोडक्यात आपले म्हणणे मांडले.

‘‘मी सैन्यात वीस वर्षे नोकरी केली. किती लोकांना मारले आठवत नाही. तेथे घाबरलो नाही. अथवा पळून पण आलो नाही. त्यांना मारूनच आलो, तर तुमच्यासारख्या किडय़ा-मुग्यांना काय घाबरीन. हां, मी एकटा बाहेरच्या ओसरीत झोपतो. ज्यांची इच्छा असेल त्यांनी यावे. माझी ओळख चौकीत आणि मामलेदार कचेरीत दिली आहे. आणखी जमिनीचा रिपोर्ट पण सैन्यात दिला आहे. मला काही झाले तर सैन्याचे अधिकारी येतील आणि एकेकाला उंदरासारखे पिंजऱ्यात टाकून घेऊन जातील. कुठे? थेट दिल्लीला तेथेच सैन्याच्या कचेरीत निर्णय होईल. तेथे येथील नेतागिरी अथवा गुंडगिरी चालणार नाही. सगळे नीट समजून घ्या.’’

‘‘काय पाटील डोक्यात आले का? गुण्यागोविंदाने राहा, मला पण राहू द्या. अजून गावात भरपूर कामं करायची आहेत. दवाखाना चालू करायचा आहे. सार्वजनिक विहीर बांधायची आहे. गावातले रस्ते पक्के करायचे आहेत. माझ्याशी वैर धराल तर तुमचेच नुकसान होईल आणि गावाचा उत्कर्ष होणार नाही. तरी विचार करूनच वागा.’’

‘‘बराय राम राम’’

दोनच दिवसांत सर्व तालेवार आणि दबंग गावकरी शरदकडे आली आणि पूर्ण शरणागती पत्करली.

शरद, ‘‘अरे, मला वाटले तुम्ही कुऱ्हाडीला धार लावत बसला की काय.’’

‘‘नाही सुभेदारसाहेब आपण देशासाठी जीवावर उदार होऊन लढला. आम्ही तुमच्याशी कसे भांडू. आम्हाला क्षमा करा. या उपर अशी चुकी होणार नाही. आम्ही अडाणी लोक, आम्हाला मार्गदर्शन द्या, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू. दोन तोंडात मारा, पण आम्हाला वाट दाखवा.’’

घरात म्हैस आली होती. मुलांना दोन्ही वेळेस दूध मिळू लागले.

एकदा शरदने सकाळी पाच वाजता गोपूला उठविले. ‘‘मामा काय म्हणतोस’’

‘‘जा सगळं आवरून ये.’’ तो आल्यावर शरदने त्याला कपडे काढायला सांगितले. आणि आपल्या हाताने त्याला लंगोट बांधला. त्या दिवसापासून गोपूच्या जोरबैठका चालू झाल्या.

आता तो बारा वर्षांचा झाला होता. आणि काखा वर करून पहिलवानासारखा चालायला लागला होता आणि कधी कधी गोपू दंड थोपटून मामाला आव्हान द्यायचा.

‘‘मामा येतो का कुश्ती खेळायला, मी शंभर जोर काढतो.’’

एकदा शरदने गोपूला समजविले. ‘‘गोपू, कमजोर माणसाची कोणीपण छेड काढतो. पण ताकतवर माणसाच्या कोणीपण वाटेला जात नाही. अशीच आपली ताकत वाढवत जा. पण कधी आपल्या ताकतीची घमेंड करू नको. कधी कमजोरावर अत्याचार करू नको.’’

‘‘हो मामा, तुझे शब्द लक्षात ठेवीन.’’

‘‘अरे इट्टला बाळा भाकर तुकडा खाऊन घेरे बाबा कवा पासून मामा-भांज बोलत बसल्यात’’ म्हातारी.

शरद ‘‘अवो, माय मी तुला कितीदा बोललो मला इट्टला/ पांडुरंग म्हणू नको. मी माणूस आहे तेच बरे आहे.’’

म्हातारी ‘‘नाई रे माझ्या राजा तू माझा हरी हाईस. घराला तू कसे राकेला लावलंस. पोराचं शिक्षान, शेती वावराचे सर्व तू पाहतो.’’

शरद ‘‘आई मी माझे कर्तव्य करतो. यांना ताकतवान आणि बुद्धिवान बनवायचा प्रयत्न करतो. उद्या मी नसलो तर हे आपली रक्षा स्वत: करतील यांच्या वाटेला कोणी जायचे नाही.

चला रे भाचरांनो, जेवायला चला, अरे माझी सखू कोठे गेली? सखू चल जेवायला.’’

गावात शांतता होती. शरद आपल्या शेतात आणि भाच्यांमध्ये आनंदी होता.

दिवसामागे महिने, वर्षे जात होते. गावात पुष्कळ सुधारणा झाल्यात. सर्व गाववाले याचे श्रेय शरदला देत होते. तो पूर्ण समाधानी होता. गोपू आता अठरा वर्षांचा होता. शरीराने मजबूत झाला होता. हायस्कूलनंतर शाळा सोडून दिली होती. आता पूर्ण वेळ शेतीच्या कामात आणि घरचा व्याप सांभाळत होता. शरदने त्याला एकेका कामाचे पूर्ण ट्रेनिंग दिले होते. शामूला इंजिनीअर व्हायचे होते. त्याप्रमाणे त्याचा अभ्यास चालला होता. सखूला डॉक्टर व्हायचे होते. तिला पण शरदने त्याप्रमाणे ट्रेनिंग दिले होते. म्हातारी आता थकली होती. शरदने घरच्या कामासाठी बाईची व्यवस्था केली होती.

चावडीत पाटलांना एकांत पाहून शरद बोलला.

‘‘पाटील आता या गावचे माझे काम पूर्ण झाले आहे. आता येथून जायचा विचार करत आहे.’’

‘‘अहो, काय बोलता सुभेदारसाहेब. तुमच्या विना आम्ही कल्पनाच करू शकत नाही. असा विचार पण डोक्यात आणू नका. कोणी काही बोलले का? मला सांगा. मुंडकंच मोडतो, पण आम्हाला सोडून जाऊ नका.’’

‘‘नाही नाही, असे कोणी काही बोलले नाही. आणि सर्व गाववाल्यांनी माझ्यावर जेवढे प्रेम केले तेवढे आतापर्यंत कोणीच केले नाही. पण काय आहे. या गावासारखे या राज्यात आणखी पण गाव आहेत. त्यांना माझी आवश्यकता आहे. आम्ही सैनिक लोक लवकर निवृत्त होतो. आमच्याकडे करायला काहीच काम नसते. शरीरात रग असते. पैशाची कमी नसते. कामाची शिस्त असते. पण कोणतीच दिशा नसते. आता मला दिशा आणि कामाची माहिती झाली आहे. माझ्या आणखी मित्रांना पण मी या कामात लावीन. सर्व आनंदाने करतील.

‘‘पाटील एकेका सैनिकाने एका गावात जरी माझ्यासारखे नि:स्वार्थ काम केले तर पहा आपले राज्य, आपला महाराष्ट्र, देश कोठे जातो.’’ बराय मुलांकडे, म्हातारीकडे लक्ष असू द्या. खास करून माझ्या सखूकडे. फारच लाघवी आणि प्रेमळ आहे. तिची सारखी आठवण येईल.’’

‘‘पाटील रडू नका नाहीतर माझी पावले जड होतील. मला प्रेमाने निरोप द्या. मी येत राहीन. बराय नमस्कार.’’

ठरल्याप्रमाणे शरद पहाटेच घरून निघाला. जाताना एकदा सखूला डोळे भरून पाहून घेतले. आणि एका झटक्यात गावाबाहेर चालू लागला.

एका नवीन गावाच्या शोधात. जिथे त्याची आवश्यकता आहे. कोणी अनोळखी, प्रेमळ, लाघवी मुलं त्याची वाट पाहात आहेत.

‘‘दादा, चला ना माझ्या घरी जेवायला.’’
श्रीकांत घन – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:10 am

Web Title: vari
टॅग : Story
Next Stories
1 कथा : सत्यमेव जयते
2 कथा : सिरिअल अटॅक
3 दखल : कनक बुक्सच्या कुमारांसाठीच्या पुस्तकमालिकेतील अनंत भावे यांची पुस्तकं
Just Now!
X