26 November 2020

News Flash

भटकंतीचे नवे आयाम

प्रत्येक गोष्टीत नवं काही शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाईने नव्याने भटकं तीची सुरुवात करताना त्याचेही नवे आयाम शोधले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या वर्षीपर्यंत बॅकपॅक आणि ट्रॅव्हल डायरीज रंगवण्यात रमलेली तरुणाई गेल्या सात ते आठ महिन्यांत पुरती घरात बंद झाली होती. लॉकडाऊनचे नियम शिथिल होत गेले तसतशी घरातच कोंडून राहिल्याने कंटाळलेली तरुण मनं पुन्हा भटकं तीसाठी धडपडू लागली. प्रत्येक गोष्टीत नवं काही शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाईने नव्याने भटकं तीची सुरुवात करताना त्याचेही नवे आयाम शोधले आहेत. भटकं ती करताना काय नवीन गोष्टी सांभाळाव्या लागतात हे टूर आयोजक प्रणव चोभेने सांगितले आहे. तर वर्केशन ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या अनुश्री पवारनेही तिचा ‘वर्क फ्रॉम माऊंटन्स’चा अनुभव शेअर केला आहे.

भटकं ती करताना खिसे सांभाळा..

करोनानंतरच्या काळात भटकताना प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आलं आहे. अर्थात हे आधी व्हायला हवं होतं मात्र करोनाच्या निमित्ताने स्वच्छता महत्त्वाची झाली आहे. म्हणजे आज अगदी छोटय़ातली छोटी हॉटेल्स सॅनिटायझेशन वगैरे करताना दिसतायेत. विमानतळे, रेल्वे स्थानकांवर तपासणी होते आहे. शरीराचे तापमान तपासणे, आरोग्य सेतूच्या माध्यमातून खबरदारी घेतली जात आहे. विमान कंपन्यांकडून आता अनेक गोष्टी दिल्या जात आहेत. फेसशिल्ड, पीपीई कीट, मास्क, केवळ प्री बूक मिल्स देणं, १०० टक्के सॅनिटायझेशन या गोष्टी आता विमानप्रवासात सामान्य झाल्यात. तसेच आता लगेज सॅनिटायझेशन हा नवा प्रकारही विमानतळांवर पहायला मिळतोय.

परदेशातील भटकंतीचा खर्च वाढला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर दुबईला गेल्यावर तिथे करोना चाचणी केली जाते. त्या चाचणीचा निकाल एका दिवसात येतो. मात्र तोपर्यंत पर्यटकांना क्वारंटाइन केलं जातं. म्हणजे पूर्वी चार दिवसांत होणारी ट्रीप आता पाच दिवसांची झाली आहे. जगभरातील वाहतूक व्यवस्थाही थोडी महागली आहे. अनेक ठिकाणी ५० टक्के आसनक्षमतेने प्रवासाची मुभा असल्याने फेऱ्या परवडाव्यात म्हणून दर वाढवण्यात आलेत. हॉटेल्सबरोबरच तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे हॉस्टेल्स, झॉस्टेल्ससारख्या ठिकाणी स्वच्छतेला महत्त्व दिलं जात असल्याने सॅनिटायझेशनचा खर्च अप्रत्यक्षपणे पर्यटकांच्या खिशातून वसूल केला जातोय.

आपण जसे पट्टीचे खाणारे म्हणतो तसे हार्ड कोअर भटकंतीला आयुष्य वाहून घेतलेले तरुण करोनानंतरही भटकंतीला घाबरत आहेत असं म्हणता येणार नाही. माझ्यासारख्याचंच घ्याना मला भटकायची भीती अजिबात वाटत नाही. मात्र आता इतर गोष्टींची काळजी घेणं ही काळाची गरज झाली आहे. स्वत: भटकताना आणि इतरांना आपल्या सोबत नेताना आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये या गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो. लोकांना भटकायचं आहे, पण विश्वासार्हता असणाऱ्यांनाच ते प्राधान्य देताना दिसतात. आम्ही ‘बियॉण्ड ब्लू’च्या माध्यमातून मागील काही आठवडय़ांमध्ये तरुण, वयस्कर अशा ८० जणांना केदारनाथला घेऊन गेलो होतो. छान अनुभव होता. भटकायची आवड मारणे, घरात बसून राहणे हे पर्याय नाहीत मात्र त्याच वेळी काळजी घेत भटकणेही गरजेचे आहे हे मी स्वानुभवातून सांगू शकतो.

भटकंतीला गेल्यावर सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहतुकीला प्राधान्य देणं फायद्याचं ठरतं. थोडे पैसे अधिक जातात मात्र त्यामुळे सुरक्षेची हमी असते. आम्ही स्वत: बसऐवजी खासगी गाडय़ांना प्राधान्य देतो. त्यामुळे स्वच्छता, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन या सर्व गोष्टी शक्य होतात. सध्या थोडे जास्त पैसे गेले तर चालतील पण सुरक्षा महत्त्वाची हेच धोरण फायद्याचे आहे. सध्या देशांतर्गत भटकंतीला तरुणाई प्राधान्य देते आहे. प्रामुख्याने हिवाळ्याचा काळ असल्याने उत्तराखंड, हिमालय यांसारख्या जागांबरोबरच आता गोवा, कोकण या ठिकाणांनाही पसंती मिळते आहे. काही तरुण मंडळींना अनएक्सप्लोअर ठिकाणी जाण्यात रस आहे. यामध्ये अगदी छोटी गावं, दऱ्याखोऱ्यांमधील भटकंती किंवा गर्दी नसणारे कोकणातील समुद्रकिनारे सध्या हॉट डेस्टिनेशन्स आहेत. अनेक ठिकाणी परदेशी पर्यटक नसल्याने स्थानिक पर्यटकांनाच प्राधान्य दिलं जात असल्याने त्याचाही तरुण पर्यटक  फायदा घेताना दिसत आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही इयर एण्डला गोवा, हिमाचल आणि इतर ठरलेल्या ठिकाणी तरुणाईची गर्दी पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. सध्या सोलो ट्रॅव्हलिंग किंवा बॅकपॅकचा खर्च वाढू शकतो. हॉटेल्सपेक्षा तरुण वर्गाकडून हॉस्टेल्स, टेण्ट किंवा कॅम्पिंगला जास्त प्राधान्य दिलं जातं. तिथे इतरांशी फारसा संबंध येत नसल्याने ते तरुणाईला अधिक सुरक्षित वाटतं. मात्र खर्च थोडाफार नक्की वाढेल हेही तितकंच खरं आहे. प्रवास हा स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची संधी देतो ही भावना तरुणांना जास्त महत्त्वाची वाटते. त्यामुळेच वेगवेगळी राज्ये, शहरांमधील संस्कृती, खाद्यसंस्कृती, ठिकाणे जाणून घेण्यासाठी तरुण मंडळी भटकंती करतात. काहीही झालं तरी भटकायचं ही तरुणांमधील इच्छाशक्तीच पर्यटन व्यवसायाला पुन्हा नवी उभारी नक्की देईल.

* प्रणव चोभे (सहसंस्थापक, बियॉण्ड ब्लू)

पर्वतराजीतलं वर्के शन

सकाळी उठून लॅपटॉप सुरू करत असताना समोर बर्फाने भरलेल्या उंच उंच डोंगररांगा असतील आणि प्रत्येक वीकएंड जर एखाद्या बाईक ट्रिप किंवा ट्रेकला जाता आलं तर? सध्या असंच काहीसं आयुष्य मी जगते आहे तेही हिमाचलप्रदेशमध्ये.. अनेक आयटी कंपन्यांमधून सध्या ‘वर्क फ्रॉम होम’साठी परवानगी देण्यात आली आहे. पण घरात बसून काम करण्यापेक्षा हिमालयात राहून का करू नये, असा विचार आला आणि सप्टेंबर महिन्यात लगेचच फ्लाइटचं तिकीट बुक करत तडक मनाली गाठलं.

हिमाचलमधून याआधी पर्वतारोहण के लं असल्याने इथली तशी बऱ्यापैकी माहिती मला होती. म्हणून मनालीपासून १० किलोमीटर दूर असलेल्या खकनाल या गावी एक होमस्टे दोन महिन्यांसाठी बुक केला. शक्यतो लॉन्ग स्टेसाठी बुक केलं तर होम स्टेचं भाडं कमी करून मिळतं. सोबत अजून दोन मैत्रिणी असल्याने आमचा राहण्याचा दहा हजार प्रति महिना असणारा खर्चही तसा विभागला गेला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेश पर्यटकांसाठी खुलं नसल्याने ईपास, करोनाच्या टेस्टचा ७२ तासांमधील निगेटिव्ह रिपोर्ट असं सगळं काही आवश्यक होतं. पण आता मात्र या काहीच अटी नसल्याने इथे येणं सोपं झालं आहे. आणि म्हणूनच वर्क फ्रॉम माउंटन्स ही संकल्पना सध्या खूपच पॉप्युलर आहे.

मनालीनंतर थोडं शांत ठिकाणी जायचं म्हणून मी तिथून ३ तासांवर असणाऱ्या जिभीमध्ये काही दिवस राहिले. इथून बर्फाने भरलेले डोंगर दिसत नसले तरी नैसर्गिक पाँड्स आणि धबधब्यांचा आनंद इथे घेता येतो. आणि कॅफेमध्ये बसून थुक्पा आणि मोमोज खात कामाचा आनंद घ्यायचा. इथे आल्यापासून वीकएंडची मजादेखील वाढली आहे. कारण रोहतांग टनल, तीर्थन व्हॅली, सैंज व्हॅली, शानगड, पतालसू असे अनेक स्पॉट्स फिरता आले. यंदाचा हिमाचलमधील पहिला स्नोफॉल देखील अनुभवता आला. दिवाळीत घरची आठवण आली तशी हिमाचलमधीलच एका मैत्रिणीला कॉल केला आणि तडक तिच्या मंडी येथे असलेल्या घरी गेले. आणि हिमाचली कुटुंबासोबत यंदाची दिवाळी साजरी केली. भल्ले, जिलेबी, बेसन बर्फी आणि चिलडू अशा विविध लोकल रेसिपी चाखायची संधी मिळाली. सध्या शिमल्यामध्ये मैत्रिणीकडे राहून इथली खाद्य संस्कृतीही अनुभवते आहे. यापुढे कांगडा आणि मग गुलमर्गला जाण्याचा प्लॅन आहे आणि मार्चपर्यंत तरी हिमालयातूनच हे वर्केशन अनुभवायचं आहे.

तुम्हालाही जर असंच हटके वर्केशन करायचं असेल तर हिमाचल नक्कीच एक उत्तम पर्याय ठरतो, कारण इथे जिओ आणि एअरटेल हे दोन्ही नेटवर्क्‍स उत्तम काम करतात. आणि जर राहण्याची सोय करायची असेल तर होम स्टे बेस्ट. खर्चही कमी आणि सोबत किचन असेल तर खाण्याचाही खर्च तसा कमी होतो. हिमाचलमधील बससेवा सध्या सुरू असल्याने फिरण्याचीही उत्तम सोय होते.

* अनुश्री पवार

संकलन : स्वप्नील घंगाळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:59 am

Web Title: article on new dimensions of wandering abn 97
Next Stories
1 वस्त्रांकित : ओवीतून लागलेला शोध
2 क्षितिजावरचे वारे : सुखलो‘लूप’ प्रवास
3 कलात्मक दिवाळी
Just Now!
X