28 October 2020

News Flash

वस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं!

आपल्याजवळ चंद्रकळा असावी आणि आपण ती अगदी जपून वापरावी, असं स्त्रियांना वाटे

विनय नारकर

या चंद्रकळेवर मराठी स्त्रियांनी भरभरून प्रेम केले. चंद्रकळा मराठी स्त्रियांची जिवाभावाची सखी बनली. आपल्याजवळ चंद्रकळा असावी आणि आपण ती अगदी जपून वापरावी, असं स्त्रियांना वाटे. आपली चंद्रकळा आयुष्यभर आपल्याजवळ असावी असं त्यांना वाटे.

काळी चंद्रकळा

ठेवून ठेवून नेसावी

माय ग प्रेमळ

माझ्या जन्माला असावी

काळी चंद्रकळा

ठेवून ठेवून नेसावी

कुंकवाची चिरी

माझ्या जन्माला असावी

मराठी स्त्रीच्या आयुष्यात असणारे चंद्रकळेचे भावनिक स्थान समजून घेण्यासाठी या दोन ओव्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. एका ओवीमध्ये चंद्रकळेची तुलना साक्षात आईशी केली आहे आणि दुसऱ्या ओवीमध्ये आपल्या सौभाग्याशी.. या दोन्ही ओव्या मला दोन भिन्न ठिकाणी मिळाल्या आहेत. त्यामुळे ही शक्यता आहे की या ओव्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लिहिल्या गेल्या आहेत.

विविध प्रकारच्या वस्त्रप्रकारांबद्दल, पोशाखांबद्दल, दागदागिन्यांबद्दल रचल्या गेलेल्या कित्येक ओव्या आहेत. पण या दोन ओव्यांमधून चंद्रकळेबद्दल व्यक्त झालेली जिव्हाळ्याची भावना, या भावनांमधून जाणवणारी उत्कटता इतर कोणत्याही वस्त्रप्रकार, पोशाख किंवा दागिने याबाबत दिसून येत नाही.

काळा रंग हे चंद्रकळेचं वैशिष्टय़ असल्यामुळे याबाबत थोडा कल्पनाविस्तार होऊन काही ओव्या रचल्या गेल्या. काजळ ही प्रतिमा ओघानेच आली. आपल्याकडे नव्या साडीची, म्हणजे पल्लवबंद साडीची घडी मोडणे हा एक विशेष प्रसंग असायचा.

काळी चंद्रकळा

जशी काजळाची वडी

त्याची आज घडी मोडी

उषाताई

काळ्या रंगाचा संबंध आल्यामुळे ‘दृष्ट लागणे’ हा प्रकारही ओवीमध्ये गोवला गेला आहे.

काळी चंद्रकळा

जसे काजळाचे बोट

घेणाराचे मन मोठे

दादारायांचे

दृष्ट लागू नये म्हणून एखादीने काळी चंद्रकळा नेसावी, असे वर्णन या ओवीमध्ये आले आहे.  म्हणजेच चंद्रकळेची तुलना दृष्ट लागू न देणाऱ्या काजळाच्या बोटाशी केली आहे.

संत एकनाथांनी त्यांच्या एका गौळणीमध्ये विविध रंगांचा शृंगार केलेल्या पाच गवळणींचे वर्णन केले आहे. त्यात शृंगारामध्ये काळ्या रंगाचा साज केला, असे आले आहे. काळी चंद्रकळा लोकप्रिय असल्याशिवाय ‘काळ्या रंगाचा साज’ ही कल्पना शक्य झाली नसती असेच वाटते.

तिसरी गौळण रंग काळा

नेसून चंद्रकळा

काळें काजळ लेवुन डोळां

रंग तिचा सांवळा

काळ्या रंगाचं आणि चंद्रकळेचं नातं उलगडतानाच आणखी एका रंगाच्या चंद्रकळेबद्दलच्या ओव्या सापडतात.

तांबडी चंद्रकळा

मी बघते दिव्याज्योती

बंधूला पुसते

मोल दिले किती

चंद्रकळेत काळा व लाल या दोन रंगांशिवाय अन्य रंगांचा उल्लेख असलेल्या ओव्या, लावण्या, गौळणी किंवा कोणतेही  लोकसाहित्य सापडत नाही.

चंद्रकळेची कल्पना, तिची प्रासंगिकता, तिच्या निर्मितीचे कारण, त्याचबरोबर चंद्रकळेचे रंग या बाबींवर ओव्यांच्या माध्यमातून कसा प्रकाश पडतो हे दिसते. इतकेच नाही तर काही ओव्या आपल्याला चंद्रकळेच्या रचनेच्या स्वरूपाबद्दलही बरंच काही सांगतात.

काळी चंद्रकळा, गंगा जमना काठाची ।

राधा पुनेरी थाटाची ॥

या ओवीतून काळ्या चंद्रकळेला ‘गंगा जमना’ काठ असतात, ही महत्त्वाची माहिती मिळते. त्याबरोबरच ही चंद्रकळा पुण्यात विणली जायची अशी ओझरती कल्पना येते. ‘गंगा जमना’ काठ म्हणजे दोन वेगळ्या रंगाचे काठ, ही सर्वसामान्यपणे ज्ञात असणारी गोष्ट आहे. गंगा आणि यमुना या नद्या एकमेकींना समांतर वाहतात, आणि साडीचे दोन्ही काठही एकमेकांना समांतर असतात.  गंगा जमना काठ असा शब्द प्रयोग रूढ होण्यामागे आणखीही  एक कारण आहे, ते फारसे कुणाला माहिती नसते. प्रा. गो. स. घुर्ये आपल्या ‘इंडियन कॉस्च्यूम’ या पुस्तकात म्हणतात, गंगेचा प्रवाह शुभ्र असतो तर यमुनेचा काळसर असतो, त्यामुळे एकाच साडीला जेव्हा दोन वेगळ्या रंगांचे काठ असतात, तेव्हा त्या साडीस ‘गंगा जमनी’ असे म्हटले जाते.

या काळ्या गंगा जमनी चंद्रकळेला हिरवे आणि लाल, असे काठ असायचे.

काळी चंद्रकळा कटय़ारी काठ वजा

दुकानी दीर माझा

या ओवीमध्ये काळ्या चंद्रकळेला कोणत्या विणीचे काठ असायचे हे सांगितले आहे. या ओवीमध्ये उल्लेख केलेले ‘कटय़ारी काठ’ किंवा  कटारीदार काठ म्हणजे कटय़ारीसारखी वेलबुट्टी किंवा वीण असणारे काठ. या नक्षीचे बाणाच्या टोकाशीही साधम्र्य असते. मराठी साडय़ांमधे हा काठाचा प्रकार लोकप्रिय होता.

चंद्रकळा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होती. महाराष्ट्रातील विविध भागातल्या बोलीभाषांमध्ये चंद्रकळेवर रचलेल्या ओव्या पाहायला मिळतात. या वऱ्हाडी म्हणजेच विदर्भी भाषेतल्या ओवीमध्येसुद्धा चंद्रकळेबद्दलची आस व्यक्त झाली आहे.

काळी चंद्रकळा लेवु वाटते जिवाला

अंजना मह्य बंधुजीला देते निरोप गावाला

या वऱ्हाडी वाणाला ‘झ’ या व्यंजनाचे वावडे आहे, त्यामुळे ‘माझ्या’ या शब्दाच्या जागी ‘मह्य’ हा शब्द योजिला गेला आहे. त्याप्रमाणे अहिराणी बोलीमध्ये ‘ळ’ या कठोर व्यंजनाऐवजी ‘य’ वापरले जाते.

कायी चंद्रसाडी इना राईफुल्या काठ

आईबाना राजे माले नेसाना परिपाठ

इथे ‘काळी’ च्या जागी ‘कायी’ हा जरा जास्त गोड वाटणारा शब्द योजिला गेला आहे, आणि चंद्रकळा या शब्दाऐवजी ‘चंद्रसाडी’ हा शब्द येतो. या ओवीमध्ये चंद्रकळेला ‘रुईफुल’ काठ असल्याचे सांगितले आहे. रुईफुल काठ हेसुद्धा मराठी साडय़ांचं एक खास वैशिष्टय़ होतं. या रुईफुल काठाचेही दोन—तीन वाण असायचे. एकेरी, दुहेरी आणि खास पैठणीत दिसून येणारे रुंद रुईफुल काठ.

काळी चंद्रकळा

कणेरी काठाची

बुधवार पेठेची

आणियेली

या ओवीमध्ये ‘कणेरी काठाचा’ उल्लेख आला आहे. कणेरी म्हणजे, काळा किंवा लाल पोत आणि त्यावर पांढरे पट्टे, असे काठ. याशिवाय या ओवीमध्ये ‘बुधवार पेठेची’ असं म्हटलं आहे, पण कोणत्या गावातील बुधवार पेठ हे समजत नाही, कदाचित पुण्यातली असू शकते. याशिवाय, आणखीही काही ओव्यांमध्ये चंद्रकळेच्या काठांचे वर्णन सापडते.

बाळे जाते मी बाजारी ऐक माझी गोष्ट

नेसले काळी चंद्रकळा तिला रेशमी काठ

काळी ही ग चंद्रकळा कांठाला ग तीन बोटं

भाईरायाचं ग माझ्या घेनाऱ्याचं मन मोठं

काळी चंद्रकळा जरीची किनार

मैनाबाई ग लेनार

ओव्यांशिवाय, काही पारंपरिक उखाण्यांमध्येही चंद्रकळेचा उल्लेख होतो.

काळी चंद्रकळा खसखशी कांठ

—रावांच्या नावांसाठी के ला समारंभाचा थाट

या उखाण्यामध्ये सांगितलेल्या ‘खसखशी’ या वाणात अत्यंत बारीक, खसखशी सारखा वाटणारा चौकडा असतो. चंद्रकळेच्या आसक्तीपोटी, आपल्याजवळ चंद्रकळा असावी या वाटणाऱ्या ओढीमुळे, आपल्या जवळ असणाऱ्या चंद्रकळेच्या कौतुकापोटी लिहिल्या गेलेल्या या ओव्या आहेत. या ओव्या लिहिणाऱ्या स्त्रियांना आपण किती महत्त्वाचं संचित जमा करून ठेवतोय, पुढे जाऊन याचा दस्तऐवजीकरणासाठी किती उपयोग होईल याची कल्पनाही नसेल.      क्रमश:

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:03 am

Web Title: designer vinay narkar artcile about chandrakala saree zws 70
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे :  स्टिअर क्लिअर..
2 ऑनलाइन बिनलाइन..
3 सदा सर्वदा स्टार्टअप : आयडियाची कल्पना!
Just Now!
X