मितेश रतिश जोशी

करोनाच्या संकटामुळे झालेली टाळेबंदी आणि त्याअनुषंगाने बाजारात निर्माण झालेली मंदी, नोकऱ्यांमधील कपात अशा विविध कारणांमुळे एकीकडे चिंतेचे वातावरण पसरले असले तरी याही परिस्थितीत हातावर हात ठेवून बसून न राहता त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न तरुणाई करते आहे.

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेली टाळेबंदी आणि परिणामी अचानक ओढवलेली पगार कपात, घरभाडे – गाडीचा हप्ता अशा नाना आव्हानांना संपूर्ण जग तोंड देतं आहे. अशा या कठीण काळातसुद्धा तरुणाई शांत बसलेली नाही. घरातूनच छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून समाजात आपली एक सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न तरुणाईकडून होतो आहे.

पाणीपुरी कोणाला नाही आवडत? टाळेबंदीमुळे घोळका करून एक्स्ट्रा कांदा, शेव मागवून तिखट गोड पाणीपुरी खाण्यावर बंदी आहे. याच बंदीत संधी निर्माण केली ती दादरच्या प्रथमेश पाटोळे या तरुणाने. एप्रिल महिन्यात परप्रांतीय आपापल्या गावाकडे गेल्यावर महाराष्ट्रातील तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन उद्योगधंद्यांत उडी घ्यावी, असे मेसेज समाजमाध्यमांवर खूप व्हायरल झाले. मग हा फायदा सर्वप्रथम आपणच घेऊन घरून पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करावा, अशी कल्पना प्रथमेशच्या मनात आली. आणि त्याने मार्च अखेरीस ‘पाटोळे उद्योजक’ या नावाने पाणीपुरी व्यवसाय दादर भागात सुरू केला. प्रथमेश सांगतो, सुरुवातीला टाळेबंदीचे नियम खूप कडक होते त्यामुळे आसपासच्या लोकांनाच आम्ही डिलिव्हरी देत होतो, पण नंतर जशी टाळेबंदी शिथिल झाली तेव्हा मात्र भरमसाठ ऑर्डर्स येऊ लागल्या. हे काम एकटय़ा-दुकटय़ाचं नाही यासाठी भरपूर मेहनत लागते. माझ्या खांद्याला खांदा लावून माझे कुटुंबीय मला कामात मदत करतात. आतापर्यंत मी अडीच महिन्यांत २००० हून अधिक प्लेट पाणीपुरी विकल्या आहेत. प्रथमेश एका कंपनीत कामाला आहे. सकाळी १० ते ६ या वेळेत तो त्याचं वर्क फ्रॉम होम करतो आणि संध्याकाळी पाणीपुरीचा व्यवसाय चालवतो. मराठी मुलाने केलेली ही धडपड मराठी माणसांपर्यंत  पोहोचण्यासाठी त्याने त्याच्या लोगोतील घोषवाक्यही हटके ठेवले आहे, ‘पाणीपुरी आंबट, तिखट, गोड ..  लावेल मराठीची ओढ’.

मास्क वापरणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यातही सुरक्षा पाळून थोडेसे हटके मास्क वापरण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे.  महाराष्ट्रात खूप पूर्वीपासून खणाच्या कापडाला विशेष प्राधान्य दिलं गेलंय. त्यावरूनच ‘खण मास्क’ ही कल्पना सुचली पुण्याच्या मधुरा देशपांडे भुरके या तरुणीला. पेशाने आर्टिस्ट असलेली मधुरा हँडपेंट व हँडक्राफ्ट साडी आणि ज्वेलरीचा ‘मधुस्तु’ या नावाने व्यवसाय करते. करोनाच्या मंदीच्या काळात तिने खण मास्कची कल्पना प्रत्यक्षात आणली. सुरुवातीला तिला या संकल्पनेवर बरंच काम करावं लागलं, मात्र आत्तापर्यंत तिने तीनशेहून अधिक खणाचे मास्क विकले आहेत. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असा सगळीकडून खूप छान प्रतिसाद तिला मिळाला आहे. टाळेबंदीमध्ये सुद्धा मोजक्याच नातेवाईकांमध्ये लग्न समारंभ होत आहेत. मग अशा मराठमोळ्या कार्यक्रमांमध्ये नथीचा मान मिरवायचा असेल तर मधुराकडे हाताने रंगवलेली नथ ही या मास्कवर उपलब्ध आहे. कुठलीही नवीन गोष्ट अमलात आणायची म्हणजे आधी काही लोकांच्या नकारात्मक टीकाटिप्पणीला तोंड द्यावेच लागते. मधुराही याला अपवाद ठरली नाही. काही लोकांना मधुराची ही कल्पना रुचली नाही; त्यांचं म्हणणं मास्क हे फक्त गरजेपुरते वापरावे, त्यात फॅशन आणि ट्रेण्ड हा हवाच कशाला? मधुरा सांगते, मी जरी फॅशनेबल मास्क विकत असले तरी माझ्या मास्कमुळे नाक, तोंड पूर्णपणे झाकले जातील याची मी काळजी घेतली आहे, शिवाय मास्कवर हाताने रंगवलेली नथ ही बरोबर नाकावर येत असल्यामुळे ती कल्पनाही खूप जणांना आवडली.

करोनाच्या काळात सॅनिटाइझर, मास्क, फेसशिल्ड, हँडवॉश या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या कठीण परिस्थितीत कुठे अनोळख्या ठिकाणी हात लावायलासुद्धा भीती वाटते आहे, कारण हा विषाणू कु ठल्याही पृष्ठभागावर काही तास जिवंत राहण्याची शक्यता असते.  लोकांच्या मनातली हीच स्पर्शाची भीती घालवून ‘सेफ टच’ देण्याचं काम केलं आहे औरंगाबादच्या हेमंत चौधरी या तरुणाने. हेमंतची ही संकल्पना डिझाइन केली त्याच्याच अक्षांश आणि प्रसाद या मित्रांनी. या त्रिमूर्तींनी मिळून एक सुरक्षित चावी तयार केली आहे. ज्याच्या साहाय्याने आपण एटीएममधील आकडे दाबू शकतो. गाडीचा दरवाजा उघड – बंद करू शकतो. दाराची कडी उघडू शकतो. लिफ्टमधील बटणं दाबू शकतो. जेणेकरून आपला थेट संबंध येणार नाही व आपला स्पर्श हा सुरक्षित असेल. गेल्या साडेतीन महिन्यांत ८ ते ९ हजार ‘सेफ टच’ हेमंत व त्याच्या मित्रांनी विकले आहेत. या ‘सेफ टच’ला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर दिल्ली आणि गोव्यातूनसुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

पैठणी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. साडी म्हटलं की पैठणीचा विषय महिलांच्या तोंडी आलाच पाहिजे. करोना संकटातसुद्धा महिलांची ही नाजूक आवड लक्षात घेऊन महिलांना पैठणीचा आनंद घेता यावा यासाठी पुण्यातल्या एका तरुणीने शक्कल लढवली. नारायण पेठेतल्या धनश्री पाठक हिने मास्कवरच जरतारी मोर आणला आहे. ‘धनाज पैठणी’ या नावाने धनश्री पुण्यात पैठणीपासून बनवलेल्या अनेक फॅशनेबल वस्तू विकते.  टाळेबंदीच्या काळात या सर्व वस्तूंची काही विक्री होणार नाही हे तिला कळून चुकले. करोना आणि मास्क या समीकरणात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहे. बच्चेकंपनीसाठी कार्टून मास्कसुद्धा आले आहेत. मग आपण महिलावर्गासाठी पैठणी मास्क बनवले तर?  हा विचार तिच्या मनात आला व तिने त्यावर ठोस पाऊल उचलून पैठणी मास्क मे महिन्यात विक्रीसाठी आणले. सुरुवातीला तिच्या मनात शंका होती की हे मास्क खरंच ग्राहक विकत घेतील का ?  पण काही दिवसांतच धनश्रीला भरघोस प्रतिसाद मिळाला. धनश्री सांगते, आतापर्यंत मुंबई, पुणे, सातारा, जळगाव, दिल्ली, तेलंगणा, कोइंबतूर, गुडगावपर्यंत मी मास्क विकले आहेत. अनेक लोकांनी मला समाजमाध्यमांवर या मास्कवरून ट्रोल केलं. वाईट कमेंटही केल्या, पण त्यांच्या बोलण्याला बळी न पडता माझं काम मी सुरूच ठेवलं. या सगळ्या नकारात्मक ट्रोलमुळे माझी खूप चिडचिड झाली. ती चिडचिड एक पोस्ट लिहून मी व्यक्तसुद्धा केली. ती पोस्ट  खूप व्हायरल झाली आणि अनेक अनोळखी लोकांनीही माझ्या प्रयत्नांना दाद देऊन माझी हिंमत वाढवली, असं ती सांगते.

टाळेबंदीच्या काळात वर्क फ्रॉम होमच्याही वेगवेगळ्या तऱ्हा पहायला मिळतात. काहींचं काम लवकर पूर्ण होतं तर काहींना वेळच पुरत नाही आहे. कल्याणचा स्वप्निल जाधव हा तरुण पहिल्या गटात बसतो. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या स्वप्निलला चित्रकलेची आवड आहे. त्याचे बरेच मित्र त्याच्याकडून पेंटिंग बनवून घेत. मग हेच पेंटिंग विकून छोटासा स्टार्टअप केला तर?, हा विचार आधीपासूनच त्याच्या मनात पिंगा घालत होता. पण जॉब आणि ही नवीन जबाबदार पेलणं काही शक्य नव्हतं. टाळेबंदीमध्ये मात्र काम कमी असल्याने त्याने हे पाऊल उचललं. इन्स्टाग्रामवर ऑनलाइन ‘कॅनव्हास पेंटिंग’ या नावाने पेज ओपन करून त्याने त्याचे पेंटिंग्ज ऑनलाइन विक्रीसाठी गेल्या महिन्यातच खुले केले. अतिशय कमी किमतीत उत्तम पेंटिंग्ज उपलब्ध असल्याने त्याला कमी दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला. करोनासारख्या आपत्तीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भीती वाटणं, कंटाळा येणं या गोष्टी साहजिक आहेत. आर्थिक, व्यावसायिक अडचणींचा डोंगर उभा राहणं आणि त्यामुळे येणारे ताणतणाव या सगळ्यांचा सामना करत असताना निराशेची गडद छाया पसरण्याची शक्यताच जास्त.. मात्र उपलब्ध सोयीसुविधांचा वापर करत हे निराशेचे ढग बाजूला सारून स्वत:च स्वत:साठी संधी निर्माण करणाऱ्या या तरुणाईचे प्रयत्न या काळात अधिक प्रेरणादायी ठरत आहेत.

viva@expressindia.com