25 September 2020

News Flash

वेट लॉस : समजुती आणि गैरसमजुती

अमुक साइझ म्हणजे सुंदर ही मानसिकता बदलायला हवी.

प्रत्येक मुलीला वाटत असतं की, आपण आणखी पाच किलो वजन कमी केलं किंवा आपल्या कमरेवरून अजून दोन किलोचं मांस घटलं तर आपण खूप चांगल्या दिसू. हे बारीक दिसण्याचं फॅड चुकीचं आहे. आपल्या सौंदर्याच्या व्याख्याच तपासून बघायला हव्यात. अमुक साइझ म्हणजे सुंदर ही मानसिकता बदलायला हवी. स्त्री सबलीकरणासाठी ती शिकली पाहिजे, कमावती झाली पाहिजे, अर्थसाक्षर झाली पाहिजे या गोष्टी जशा आवश्यक आहेत, तशी आपण आहोत तशाच चांगल्या दिसतो हा आत्मविश्वास निर्माण होणं ही गोष्टही आवश्यक आहे. वेटलॉस फूड आणि औषधनिर्माण कंपन्यांनी हे सौंदर्याचे काहीतरी चुकीचे ठोकताळे आणि निकष आपल्यावर लादले आहेत. यामागे कुठलंही शास्त्रीय कारण नाही. आजकाल कुठल्याही वयाची मुलगी कितीही व्यवस्थित वाटत असली तरीही ‘मी जाड झाले आहे’, असं म्हणू शकते आणि बारीक व्हायचा प्रयत्न म्हणून डाएटिंग करू लागते. आजकाल आपल्याला खायचीच भीती वाटते. एखादा पदार्थ आपल्याला आवडला आणि जास्त खावासा वाटला तर आपण गुन्हेगारच आहोत, असं वाटायला लागतं. एवढा डाएट आणि हेल्थबाबतचा अपप्रचार प्रभावी आहे. काही वर्षांपूर्वी आपण ‘सेक्स’ या विषयाचंही हेच केलं होतं. तुम्ही सेक्स एन्जॉय करता म्हणजे काहीतरी गुन्हा करता, अशी भावना असायची. आता तेच आपण अन्नपदार्थाबाबत करतोय. आजकाल तर आपण पदार्थाचं नावही घ्यायचं टाळतोय. वरण-भात खाल्ला की, वरण-भात न म्हणता.. अरे बाप रे! आज किती कार्ब्स, प्रोटिन्स, फॅट्स खाल्ले असं म्हणतो. आपल्या आवडीचा पदार्थ खाताना एन्जॉय केलं, तरी वाटतं की-आपण चुकीचं करतोय काहीतरी. जेवताना डोक्यात सतत कॅलरी काउंट असणं अजिबात आवश्यक नाही. कॅलरी काउंटची आकडेवारी खरी काढताच येणार नाही. आपल्या शरीराला ते बरोबर माहीत असतं. दिवसभर शरीरात उत्साह आणि ऊर्जा टिकवून ठेवेल ते आणि तेवढंच अन्न खाल्लं पाहिजे.
हल्ली मुलींना झटक्यात रिझल्ट हवे असतात. व्यायाम आणि डाएट केलं की, तीन आठवडय़ांत पोट कमी होईल, असं सांगितलं जातं. असं व्यायामानं स्पॉट रिडक्शन पॉसिबल असतं, तर आपण सर्वाधिक वापर करत असलेला हाताचा अंगठा बारीक होऊन होऊन अदृश्य झाला असता. फॅट्स ही नॉन मूव्हिंग एंटिटी आहे. तुम्ही पोटाचा व्यायाम केलात, तर तिथले फॅट्स हलणार नाहीत. व्यायामाच्या वेळी असे कुठलेच फॅट्स हलत नाहीत. फक्त स्नायूंची-मसल्सची हालचाल होते. म्हणूनच व्यायामानं असे इन्स्टंट रिझल्ट मिळणार नाहीत. मग बारीक कसं व्हायचं? पोट कसं कमी करायचं? याचं उत्तर आहे-फॅट मेटॅबॉलिझम वाढवणारे पदार्थ जेवणात घ्यायचे. या पदार्थामध्ये नारळ महत्त्वाचा. शहाळं, ओलं खोबरं, सुकं खोबरं.. या सगळ्या स्वरूपातील नारळात फॅट बर्निग क्वालिटी असते. अशा पूरक आहाराबरोबर जंक फूड पूर्ण टाळलं आणि रेग्युलर अ‍ॅक्टिव्हिटी आणि व्यायाम केला तर, पोटाचा वाढलेला घेर, वाढलेलं वजन कमी होऊ शकतं. व्यायामात नियमितपणा आणि सातत्य मात्र हवं.

फिटनेसची चतु:सूत्री
व्यायामात सातत्य हवं. रुटीनचा भाग म्हणून व्यायाम व्हायला हवा. अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइझ यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. आठवडय़ातून किमान १५० मिनिटं व्यायाम झाला पाहिजे. बैठं काम करत असलात, तर दर अध्र्या तासाने किमान ३ मिनिटांसाठी उभं राहिलं पाहिजे. अ‍ॅक्टिव्हिटी, एक्सरसाइझ, आहारातले गुड फॅट्स आणि आपल्या प्रांतात पिकणाऱ्या पदार्थाचा आहारात समावेश ही फिटनेसची चतु:सूत्री आहे.

हे लक्षात ठेवा..
* प्रोटिन शेक घेण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. पण प्रोटिन शेक म्हणजे कॅल्शिअम सप्लीमेंट घेण्यासारखं आहे. ते घ्यायचं असेल, त्याबरोबरीने फिटनेसचे इतर नियम पाळले पाहिजेत. पुरेसं न जेवता केवळ प्रोटिन शेक प्यायल्याने वजन कमी होणार नाही उलट अशक्तपणा जाणवेल. पुरेसं जेवण, वेळेवर झोप नसेल तर कॅल्शियम शोषलं जात नाही. तसंच प्रोटिन शेक्सचं आहे. पुरेसा आहार, झोप, एक्सरसाइज याच्या जोडीला ते घेतलं तर उपयोग होईल.
जंक फूड वाईटच. पाश्चिमात्य देशांमधले गरीब तरुण जे खातात, ते आपल्याकडचे श्रीमंत खातात. आपल्या खाण्यामधल्या पारंपरिक स्पेशालिटीज पोषणमूल्य असलेल्या आहेत. पण आपली साजरं करण्याची संकल्पनाच बदलल्याने जंक फूड हा लाइफस्टाइलचा भाग होतोय.
झीरो फिगर ही कपडय़ांची साइज आहे. ती बायकांची साइझ असू शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:03 am

Web Title: misunderstanding and superstition about weight loss
Next Stories
1 जीवनशैलीतच फिटनेस हवा..
2 प्रिय मला, ..माझ्याकडून
3 ‘शुगरबॉक्स’चं गोड गुपित
Just Now!
X