विपाली पदे

स्ट्राप ही एरवी अगदी छोटीशी, सहज दुर्लक्षित होईल अशी नित्य वापरातली गोष्ट. मात्र याच स्ट्रापचा वापर करून आपण पोलीस, डॉक्टर्स यांना होणारा त्रास कमी करू शकतो, याची जाणीव सौरभ महाडिक या तरुणाला झाली. आणि त्याच्या या छोटय़ाशा गोष्टीने आज डोंगराएवढे काम उभे केले.

भारतीय परंपरेत ‘सेवा परमो धर्म:’ असे सांगितले आहे. ही सेवा कुठल्याही स्वरूपाची का असेना पण ती नि:स्वार्थी आणि नि:शुल्क असावी. अशी सेवा करोनाच्या या संकटकाळात लहानथोर अनेकजण करत आहेत  याची प्रचीती आपण मागचे अनेक दिवस वेगवेगळ्या स्तरांवर घेत आहोत. गेले तीन महिने आपल्या देशात या विषाणूने भयंकर थैमान घातले आहे, मात्र तरीही अनेक लोक या रोगाशी लढणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, परिचारिका, अन्य कर्मचारी यांना जमेल तशी मदत करत आहेत.करोना हा भयंकर विषाणू गेले काही महिने जगभरात थैमान घालतो आहे.  अन्नवाटप, औषधे, कपडे आणि अजून बऱ्याच गोष्टी सेवाभावनेने के ल्या. ही सगळी मदत करणारे हे योद्धे बाकीच्यांपेक्षा कमी नाहीत. असेच एक उदाहरण म्हणजे कल्याणचा तरुण करोनायोद्धा सौरभ महाडिक.

करोनाकाळात आपल्याला इतरांसाठी काही करता येईल का?,असा विचार या आपल्या तरुण मित्राच्या मनात सुरू होता. सौरभच्या वडिलांचा ऑडिटिव्ह मॅन्युफॅ क्चरिंगचा व्यवसाय असल्यामुळे त्याचा काही उपयोग करून घेता येईल का?, असा विचार त्याने केला. आणि त्यातून थ्रीडी प्रिंटिंगचा वापर करून नवीन उपयोगी वस्तू बनवायची हे त्याने ठरवलं. आजूबाजूला बातम्यांमध्ये त्याला दिसत होते पोलीस कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी सतत तोंडाला मास्क लावून काम करत आहेत. पीपीई किट जास्त वेळ घालून त्यांचे काम सुरू आहे. सतत मास्क लावल्याने त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. मग या अशा परिस्थितीत त्यांनी इतका वेळ उभं राहून काम कसं करायचं, तर यासाठी आपण काहीतरी उपाय शोधायला हवा म्हणून त्याने ‘स्ट्राप प्रॉडक्ट्स’ ही नवीन संकल्पना काढली.

चीनमधून प्रसारित झालेला एक व्हिडीओ त्याने पाहिला होता. या व्हिडीओवरून त्याला स्ट्रापची संकल्पना सुचली.  त्याच्या लक्षात आलं भारतीय लोक  किती प्रमाणात मास्क घालतील हे माहीत नाही, पण आज २४ तास आपल्यासाठी विविध सेवांत मास्क लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या स्ट्रापची गरज आहे. त्यांचे स्वास्थ्य जास्त महत्त्वाचे आहे हे त्याने वेळेत जाणले. आणि तशा प्रकारे स्ट्राप बनवायला सुरुवात केली. वेगळ्या साइजप्रमाणे आम्ही त्या डिझाइन केल्या. सुरुवातीला मी शंभर स्ट्राप बनवल्या, पण  लॉकडाऊनमध्ये त्या विविध भागांत पोहोचवणे  कठीण काम होते. मग ओळखीच्या मित्रांना सांगून पोलीस, डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांच्यापर्यंत ते पोहोचवले, असं सौरभ सांगतो.

हे प्रॉडक्ट नक्की काय आहे, त्याचा वापर कसा करायचा आणि ते किती उपयोगाचं आहे हे त्याने मग स्वत: घराबाहेर पडून सांगायला सुरुवात केली. जसजसं कर्मचाऱ्यांना याचा फायदा कळू लागला तशी मागणी वाढत गेली. नंतर तर तो एका दिवसाला ४०० च्या वर स्ट्राप बनवायला लागला. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यंमध्ये तर दरदिवशी तो स्वत: जाऊन काही मित्रांना घेऊन वाटप करत होता. अनेक वेळा त्याने महाराष्ट्राच्या बाहेर स्ट्राप पाठवून तिथल्या कर्मचाऱ्यांचीही अडचण दूर केली. कारण स्ट्राप डिझाइनिंग सुरू करणारा सौरभ हा एकमेव होता आणि त्यासाठीची मागणी वाढतच चालली होती.

तो स्वत: कल्याणचा राहणारा असल्यामुळे त्याला कल्याण-डोंबिवली महापालिके कडून जास्त मागणी होत होती. त्याने दिवसरात्र काम करून त्याचे प्रॉडक्ट जिथे गरज होती तिथे तिथे पुरवले. त्यानंतर त्याने ‘फेस शील्ड’देखील तयार केले. डॉक्टरांशी संपर्क साधून गरज आहे तिथे तो बॉक्सेस पोहोचवू लागला. सौरभ आवर्जून सांगतो, ‘मी ठरवलं होतं एकही रुपया न घेता जमेल तेवढी मदत या करोनाच्या काळात करायची. आणि आपल्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांची सोय करायची. ज्याचं नियोजन करणं सुरुवातीला कठीण गेलं पण नंतर ते सहज जमलं’.

आता तीन महिने होत आले पण अजूनही तो स्ट्राप आणि फेस शील्ड लोकांना वाटतोय. त्याचे हे काम बघून अनेक लोकांनी त्याला पैशांची मदत केली. आपल्यामुळे घरच्यांना आणि तो राहतो त्या भागात करोनाचा धोका नको म्हणून गेले काही दिवस तो घरीच गेलेला नाही. त्याच्या या कार्याची नोंद एका यूटय़ूबरने घेतली आणि त्याच्यावर व्हिडीओ तयार के ला.  या व्हिडीओच्या माध्यमातून त्या यूटय़ूबरने सौरभला मदत करण्याचं आवाहन लोकांना के लं. तो स्वत:ही मदत करत होताच, मात्र त्याच्या आवाहनामुळे सौरभला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ज्याचा फायदा त्याला प्रॉडक्ट बनवण्यासाठी आणि ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही झाल्याचे सौरभ सांगतो.

त्याचे काम अजूनही संपलेले नाही. करोनाचे संकट जायला तर वेळ लागेल. पण जसे लॉकडाऊनचे नियम शिथिल होतील तसे लोक घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना कुठल्या अडचणी येऊ शकतात, त्यांचा स्पर्श कुठे  कु ठे होऊ शकतो याचा विचार करून तो अजून नवनवीन प्रॉडक्ट बनवतो आहे. तसं बघायला गेलं तर, स्ट्राप किती छोटी आणि साधी गोष्ट आहे पण आज सौरभने त्या माध्यमातून हजारो पोलिसांचा त्रास वाचवला आहे. अनेक डॉक्टर्सना विनामूल्य फेस शील्ड पुरवले आहेत.

सौरभच्या विनामूल्य सेवेचे मोल या करोना महामारीच्या काळात खूप मोठे आहे. असे अनेक योद्धे आपल्या देशात आहेत जे रोज विविध प्रकारे साहाय्य करत आहेत. त्यांच्यापैकीच एक असलेल्या सौरभच्या कार्याला सलाम आणि पुढील सेवाकार्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.

viva@expressindia.com