News Flash

व्हर्च्युअली युवर्स

आजकाल थेट व्यक्त होण्याऐवजी, समोरासमोर बोलण्याऐवजी स्क्रीनच्या मागून बोलणं अनेकांना कंफर्टेबल वाटतं. अशाच एका व्हच्र्युअल नात्यातच रमलेल्या मैत्रिणीच्या वॉलवरची एक पोस्ट.

| September 20, 2013 01:10 am


आजकाल थेट व्यक्त होण्याऐवजी, समोरासमोर बोलण्याऐवजी स्क्रीनच्या मागून बोलणं अनेकांना कंफर्टेबल वाटतं. अशाच एका व्हच्र्युअल नात्यातच रमलेल्या मैत्रिणीच्या वॉलवरची एक  पोस्ट.
आज बऱ्याच दिवसांनी मला असा एकटीला प्रवास करायला मिळालाय.. हा असा एकटा प्रवास मला फार आवडतो. तुलाही असा प्रवास आवडतो ना? त्यातही संध्याकाळची वेळ. आयपॉडवरची गाणी ऐकत माझा प्रवास सुरू आहे. तुझ्यासोबतच. कारण तू व्हच्र्युअली सोबतच आहेस माझ्या.. हे क्षण-क्षणाला मला जाणवतंय.
आताच एक गझल ऐकली- ‘अब के हम बिछडे..’ यातला रागही आहे विभास.. शुद्ध धवतात उमटणारा. रागाच्या प्रत्येक स्वराप्रमाणं आपल्या मूडच्याही वेगवेगळ्या शेड्स व्यक्त करणारा.. त्यात ही अशी कातरवेळ.. सोबतीला तू नसूनही तू आहेस हे जाणवून देणारी.. माझ्या प्रत्येक आविर्भावातून तुझं अस्तित्व उमटवणारी..
‘तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा,
दोनो इन्सां है तो फिर इतने हिजाबो में मिले..’
यातल्या प्रत्येक शब्दासरशी मला माझं तुझ्यावरचं प्रेम तीव्रतेनं जाणवतंय.. अद्वैताकडं पोहोचायला भाग पाडतंय. खरंतर वयात आल्यानंतरच्या काळात ययाती-शर्मिष्ठेच्या गोष्टींत रमणारी मी.. त्या शर्मिष्ठेचं तर कधी-कधी अप्रूप वाटायचं.. ययातीवर इतकं प्रेम असूनही ती अव्यक्त कशी राहू शकते? या गोष्टीचंच आश्चर्य वाटायचं.. आणि ययातीच्या चित्रासमोर तासन्तास बसून तिचं त्याच्याशी गप्पा मारणंही थक्क करून सोडायचं.. ययाती मिळण्याआधीच्या काळात शर्मिष्ठेचं त्याच्याशी जुळलेलं हे व्हच्र्युअल नातं खूप प्रश्न उभे करायचं मनात..
पण मला कुठंतरी हे आता आताच जाणवायला व्हायला लागलंय की, पात्रांची नावं बदललीयेत फक्त.. पण पात्र मात्र तीच आहेत.. मॉडिफाइड व्हर्जनमधली.. ती शर्मिष्ठा कुठंतरी प्रत्येक सेन्सिबल मुलीत अजूनही दिसते आहे मला.. तशी ती माझ्यातही जागरूक आहेच.. तिचं ययातीसमोर व्यक्त होणं काहीसं बदललंय एवढंच.. पण तिची ती एक्स्प्रेस होण्याची उत्कटता कायम आहे.. अजूनही!
या साऱ्यात कुठून कुठवर पोचले मी.. एवढी भरकटले की लक्षातही आलं नाही की,एव्हाना दुसरं गाणं सुरू झालंय.. राग तोच.. विभास!!! पण शब्द वेगळे.. मूडही वेगळा.. भावही वेगळे.. ‘मालवून टाक दीप..’
पुन्हा शर्मिष्ठेचं रूप.. पण अभिसारिकेचं.. सगळी बंधनं तोडू पाहणारं.. माझ्यात उमटणारं.. मीही कुठंतरी या साऱ्याच गोष्टींना तुझ्याशी जोडू पाहातेय.. रादर, आजवर जोडत आलेय.. तू समोर असूनही तुझ्याशी प्रत्यक्षात न बोलता येणं.. आणि त्यानंतर मात्र तू निघून गेल्यावर तुला मेसेज करणं किंवा वॉट्सअ‍ॅप करणं हे नेहमीचंच ठरलेलं.. तुझ्याजवळ व्यक्त  होण्याचा हा असाच मार्ग ठरलेला.. जास्त कम्फर्टेबल वाटणारा.. आणि मुळात एक्स्प्रेस व्हायला जास्त वाव देणारा.. काही क्षणांसाठी मोकळं करणारा.. सॅटिसफाय करणारा.. बट् अ‍ॅट द सेम टाइम हे असं ‘वन वे कम्युनिकेशन’ डेपिक्ट करणारा.. कारण हा मार्ग कितीही जरी कम्फर्टेबल असला तरीही मर्यादा असतात.. बंधनं असतात.. आणि ड्रॉबॅक्स असतात.. कारण या  सर्वात मला हवी असणारी तुझी रिअ‍ॅक्शन कुठेही नसते.. तुझ्याकडून मिळणारा संवादाचा प्रतिसाद कुठेही नसतो.. तू स्वत: कुठेही नसतोस.. रिअलिस्टिक स्वरूपात.. पण तरीही मी कुठेतरी इमोशनल अटॅचमेण्टमुळे तुझ्याशी कनेक्ट झालेली असते.. व्हच्र्युअली.. अगदी काही क्षणांच्या समाधानासाठी..
आताच ती ओळ ऐकली ‘तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल? सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग.. माझ्या मनातले हे सारे चढ-उतार खरंतर तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीयेत.. ते पोहोचणारही नाहीयेत.. कारण तू व्हच्र्युअली माझा आहेस.. पण रूढार्थाने.. कुठेच नाहीयेस..
आताशा या साऱ्या गोष्टी मला अलिप्त करून सोडतायत.. तुझ्याजवळ प्रत्यक्षात एक्स्प्रेस व्हायला सांगतायत.. व्हच्र्युअल रिलेशन तोडून रिअलिस्टिक रूपात तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहतायत.. अद्वैत साधण्यासाठी.. तादात्म्य पावण्यासाठी.. पण हे सारं करण्यासाठीही आज शेवटी माझ्याकडूनही तुला वॉट्सअ‍ॅपवर ऑडिओ नोट पाठवण्याचाच मार्ग स्वीकारला गेलाय.. तुझ्याजवळ पूर्णपणे एक्स्प्रेस होण्यासाठी.. माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी.. अ‍ॅण्ड नाऊ आय वूड लाइक टू से, दो आय अ‍ॅम कनेक्टेड विथ यू व्हच्र्युअली, बट् आय अ‍ॅम एक्स्प्रेसिंग मायसेल्फ टू दि फूलेस्ट इन मोअर कम्फर्टेबल मॅनर, ओन्ली टू गेट अटॅच्ड विथ यू मोअर रिअलिस्टिकली..!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:10 am

Web Title: virtually yours
टॅग : Relationship
Next Stories
1 लर्न अ‍ॅण्ड अर्न : ‘प्राची’ज् क्रिएशन…
2 ब्रँडेड जादू
3 लक बाय चान्स
Just Now!
X