‘मेट गाला’ हा अनेक वर्षांपासून न्यू यॉर्कमध्ये आयोजित केला जाणारा इव्हेंट आहे. केवळ पाश्चात्त्य देशांचा सहभाग असलेला हा इव्हेंट हळूहळू भारतीय सेलेब्रिटींच्या प्रसिद्धीच्या मोहात पडला आणि तिथून सुरू झाला भारतीय सेलेब्रिटींचा मेट गालाच्या डिझायनर कार्पेटवरचा प्रवास!

२०१७ मध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यापासून बॉलीवूड सेलेब्रिटींची मेट गालामध्ये हजेरी लागायला सुरुवात झाली. प्रत्येक वर्षीच्या थीमला धरून ड्रेस डिझाइन केले गेले आणि बॉलीवूड सेलेब्रिटींनी आपली डिझाइन्स मेट गालाच्या कार्पेटपर्यंत पोहोचवली. कधी चाहत्यांची पसंती मिळवत तर कधी सगळ्या ट्रोल्सना सामोरे जातदेखील बॉलीवूड सेलेब्रिटी त्यांचा जलवा मेट गालाच्या कार्पेटवर दाखवत राहिले. आतापर्यंत केवळ वुमन सेलेब्रिटींना मेट गालासाठी बोलावलं जात होतं.

मात्र या वर्षी पहिल्यांदाच बॉलीवूड मेन्स कॅटेगरीचंसुद्धा मेट गालामध्ये प्रतिनिधित्व करत अभिनेता शाहरुख खानने हजेरी लावली. शाहरुखबरोबर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्यसाची मुखर्जी आणि लोकप्रिय गायक दिलजित दोसांज यांनासुद्धा या वर्षी मेट गालाच्या कॅमेऱ्यांनी टिपलं. अभिनेत्री कियारा अडवाणी, ईशा अंबानी, नताशा पूनावाला, प्रियंका चोप्रा जोनास यांच्या मेट गालामधल्या उपस्थितीची जगभर चर्चा झाली. आतापर्यंत आलिया भट, दीपिका पदुकोण यांनीही अनेक वेळा मेट गाला अटेंड केला आहे.

या मेट गालाची या वर्षीची थीम ‘सुपरफाइन : टेलरिंग ब्लॅक स्टाइल’ अशी होती. त्यामुळे अनेक सेलेब्रिटी ब्लॅक किंवा व्हाइट या दोन रंगांच्या शेड्समधील कपड्यात पाहायला मिळाले. या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय डिझायनर्सना पहिल्यांदाच रेड कार्पेटवर बोलावलं गेलं. आतापर्यंत त्यांची केवळ डिझाइन्स सेलेब्रिटींकडून मेट गालामध्ये दिसत होती. मात्र या वेळी प्रत्यक्ष डिझायनर्स स्वत:च्या कलेक्शन्ससहित मेट गालामध्ये उपस्थित होते.

नेमके मेट गालामध्ये इतके सेलेब्रिटीज का येतात? तर मॅनहॅटन संग्रहालयाच्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट’साठी निधी उभारणारा हा गाला असतो. जितके सेलेब्रिटी अधिक तितके फंड मिळण्याची शक्यता जास्त. त्यामुळे जास्तीत जास्त सेलेब्रिटींनी मेट गालामध्ये सहभागी व्हावं यासाठी खास प्रयत्न केले जातात. पूर्वी केवळ पाश्चात्त्य देशांमधल्या सेलेब्रिटींचा समावेश असलेला मेट गाला आता मात्र बॉलीवूड सेलेब्रिटींची प्रसिद्धी आणि मार्केट व्हॅल्यू ओळखून त्यांना आवर्जून आमंत्रण द्यायला लागला आहे. मेट गालाची गेस्ट लिस्ट ही ‘वोग’ मॅगझिनची एडिटर अॅना विंटूर यांच्या देखरेखीखाली बनते आणि साधारण साडेचारशे ते पाचशे गेस्ट्सचा त्या यादीत समावेश असतो. स्पोर्ट्स, म्युझिक, एन्टरटेनमेंट आणि फॅशन इंडस्ट्रीमधले सेलेब्रिटीज हे मेट गालाच्या गेस्ट लिस्टमध्ये बघायला मिळतात.

भारतीय डिझायनर्सची डिझाइन्स जशी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली, इंटरनॅशनल फॅशन शोजमध्ये भारतीय डिझायनर्स आणि मॉडेल्सची संख्या वाढली, तशी इंटरनॅशनल मार्केटला भारतीयांच्या प्रसिद्धीची जाणीव होत गेली. त्यातून मिळणारा फायदा, वाढणारे फंड्स, वेधून घेतलं जाणारं लक्ष या सगळ्यातच वाढ होऊ शकते हे इंटरनॅशनल स्तरावर लक्षात येत गेलं. बॉलीवूडच्या व्यवसायाच्या सीमा या वेस्टर्न एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीच्या कल्पनेच्या पलीकडे विस्तारत गेल्या. या वाढलेल्या व्याप्तीमुळे त्याच प्रमाणात आर्थिक गणितं बदलली आणि त्यांचे आकडे मोठे होत गेले. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बॉलीवूड सेलेब्रिटींना इव्हेंट्सना बोलावलं जाऊ लागलं.

हळूहळू त्यांची प्रसिद्धी आणि त्यातून मिळणारा सर्वच बाबतीतला फायदा इतका वाढला की बॉलीवूड कलाकारांचं आपल्या शोमध्ये किंवा इव्हेंटमध्ये किंवा रेड कार्पेटवर असणं ही त्यांच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट बनली. त्यामुळेच मेट गालासारख्या इव्हेंटमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटीच नव्हे तर आता डिझायनर्सचीही वर्णी लागली आहे. मेट गाला, कान, ल बॉल अशा अनेक ठिकाणी भारतीय आणि बॉलीवूड सेलेब्रिटींनी आपल्या उपस्थितीने ग्लॅमर आणलं आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणारी पहिली भारतीय सेलेब्रिटी अभिनेत्री ऐश्वर्या राय होती तर ल बॉल या फ्रान्समध्ये होणाऱ्या बॉलसाठी आता गेल्या काही वर्षांत शनाया कपूर, रायसा पांडे, श्लोका बिर्ला, अनन्या पांडे यांसारख्या सेलेब्रिटींनी डेब्यू केला आहे. या इंटरनॅशनल स्तरावर मिळणाऱ्या महत्त्वामध्ये बॉलीवूड आणि बिझनेस यांचा मोठा हात आहे.

भारतीय सेलेब्रिटीजना कधी प्रत्यक्ष न बघितलेल्या वेस्टर्न मीडियाला काही प्रमाणात त्यांचं अप्रूपही आहे आणि आश्चर्यही! फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये केवळ मार्केट व्हॅल्यूला महत्त्व देण्याची पद्धत असताना बॉलीवूड सेलेब्रिटी, डिझायनर्स आणि बिझनेस पर्सनना मिळणारं महत्त्व यात आर्थिक पार्श्वभूमी मजबूत असल्याचा आणि आपल्या केवळ नावावर प्रसिद्धी आणि पैसा खेचून आणण्याच्या बॉलीवूड सेलेब्रिटींच्या क्षमतेचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय डिझाइन्स आणि सेलेब्रिटीज इंटरनॅशनल कार्पेटवर नेणाऱ्या आणि मेट गालासारख्या ग्लॅमरस इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीयांची संख्या हळूहळू वाढती राहील यात शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com