अभिषेक तेली

रंगभूमी म्हणजे कलाकारासाठी अविरतपणे सुरू असलेला कलेचा श्वास असतो. उराशी अनेक स्वप्नं बाळगून प्रत्येक कलाकार रंगभूमीची सेवा करतो, तिला स्वत:चे दुसरे घरच मानतो. खरंतर सर्वसामान्य व्यक्तीमधील कलेला रंगभूमीवर आकार मिळतो आणि मग एक ‘कलाकार’ म्हणून तो घडत जातो. याच रंगभूमीच्या गौरवार्थ दरवर्षी २७ मार्च हा दिवस ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. मुळात रंगभूमी म्हणून आज जे नाटय़गृह आणि तिथली व्यवस्था आपण पाहतो, त्याची सुरुवात उघडय़ावर मोकळय़ा जागी जन्माला आलेल्या नाटय़कलेनेच झाली. आज ही खुला रंगमंच संकल्पनाच जणू लोप पावत चालली आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने खुले रंगमंच राज्यभरात कुठे आहेत आणि त्याचा तरुण रंगकर्मीना कसा फायदा होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..  

shashikant shinde, opposition false corruption allegations, mahesh shinde, shashikant shinde criticise mahesh shinde, satara lok sabha seat, ncp sharad pawar, sharad pawar, lok sabha election 2024,
सातारा: भ्रष्टाचार केला असता तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो- शशिकांत शिंदे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

आपल्या देशात विशेषत: महाराष्ट्रात काळानुरूप गावोगावी तसंच शहरांमध्ये बंदिस्त नाटय़गृहांची उभारणी केली गेली. त्यामुळे आता महाराष्ट्रात खुले रंगमंच राहिलेलेच नाहीत. एकीकडे  राज्यातील बंदिस्त सभागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून, कलाकारांना नाटय़प्रयोग करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आहे. कधी नाटय़प्रयोग सुरू असताना नाटय़गृहातील वातानुकूलित सुविधा बंद पडते, तर कधी प्रसाधनगृहांमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आढळते. नाटय़गृहांची वाढलेली भाडी यामुळे नवोदित कलाकार आणि निर्मात्यांनाही नाटकाचा एकूणच आर्थिक डोलारा पेलवत नाही. या पार्श्वभूमीवर खरंतर नाटय़निर्माते व प्रेक्षकांना आर्थिकदृष्टय़ा तर कलाकारांना विविध गोष्टी सांभाळत स्वत:मधील अभिनयकलेला आकार देण्यासाठी खुला रंगमंच हा अत्यंत उपयुक्त ठरतो. नाटय़निर्मितीचा मोठा अनुभव असलेले आणि दिग्गज नाटय़कलाकारांची कारकीर्द जवळून अनुभवलेले ज्येष्ठ नाटय़निर्माते आणि रंगकर्मी सुरेंद्र दातार सांगतात, ‘पूर्वी कोकणामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळय़ांपासून उत्तम नाटय़गृहे तयार केली जायची, वातानुकूलित बंदिस्त सभागृहे यापुढे फिकी पडतील. आता कोकणातही बंदिस्त सभागृहे आहेत. पूर्वी नाशिकच्या पुढे संगमनेरला कवी अनंत फंदी यांच्या नावाने खुला रंगमंच होता, तिथे आम्ही ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग केला होता. पुण्यात जेव्हा बालगंधर्व रंगमंदिर नव्हते, तेव्हा न्यू इंग्लिश स्कूलमधील खुल्या रंगमंचावर नाटय़प्रयोग व्हायचे. एसपी कॉलेजच्या मैदानातील खुल्या रंगमंचावरही नाटय़प्रयोग झाले. राज्य नाटय़ स्पर्धेतून पुढे आलेले डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, श्रीकांत मोघे आदी रंगकर्मीनी अभिनयाचे धडे याच ठिकाणी गिरविले. डॉ. अमृत नारायण भालेराव यांनी सुरू केलेले गिरगावमधील मुंबई मराठी साहित्य संघ, दादरमधील शिवाजी मंदिर नाटय़गृह हे पूर्वी खुले रंगमंचच होते. जसजसे पैसे जमा झाले, त्याप्रमाणे या ठिकाणी बंदिस्त सभागृहे बांधली गेली. १९४७-५० च्या सुमारास डॉ. भालेराव यांनी गिरगाव चौपाटीवर मंडप घालून नाटय़ महोत्सव आयोजित केले होते. नानासाहेब फाटक यांच्यापासून दुर्गाबाई खोटे यांच्यापर्यंत अनेकांनी या नाटय़ महोत्सवात सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर कलेची जाण असलेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कलाकारांना खूप प्रोत्साहन दिले. परिणामी नाटय़संस्था उभ्या राहिल्या आणि बंदिस्त सभागृह बांधली गेली. एकंदरीत सगळेच दिग्गज कलाकार हे खुल्या रंगमंचावरून घडत गेले आणि मग बंदिस्त नाटय़गृहांमधून त्यांची कारकीर्द बहरत राहिली’.

खुल्या रंगमंचावरचा खुलेपणा हा आव्हानात्मक असल्यामुळे कलाकार हा अधिक वेगळेपणाने घडतो. यामुळे त्याला त्याचा आवाज, शरीर, विषयाची मांडणी आदी विविध कौशल्ये ही वेगळय़ा पद्धतीने वापरावी लागतात. या रंगमंचावर वेगळय़ा पद्धतीने सादरीकरण करणे, निरनिराळे विषय हाताळता येणे, विविध प्रायोगिक नाटके करता येणे शक्य असल्यामुळे नवोदित कलाकारांसाठी हा रंगमंच खूप महत्वाचा असतो. आर्थिक गणितेसुद्धा व्यवस्थित जुळवता येतात. खुल्या रंगमंचाच्या माध्यमातून नाटकाद्वारे शिक्षण, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य अशा अतिशय महत्वाच्या विषयांबाबत समाजप्रबोधन करता येते. ज्या ठिकाणी हे खुले रंगमंच आहेत, त्या ठिकाणच्या समूहासाठी हे महत्त्वाचे असते, असे मत रंगकर्मी आनंद चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.

विद्येचे माहेरघर पुणे हे कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध गोष्टींनी समृद्ध आहे. याच पुण्यात अनेक दिग्गज कलाकार घडले आणि मराठी नाटय़परंपरा बहरत गेली.  १९९८-९९ च्या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात खुला रंगमंच विकसित झाला, ज्याला आज ‘अंगणमंच’ म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी आज अनेक नवोदित कलाकार घडत आहेत आणि मनोरंजनसृष्टीत नाव निर्माण करण्यासाठी, अनेक स्वप्ने गाठीशी बांधून ते कसून मेहनत घेत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटय़ विभागाचे प्रमुख प्रवीण भोळे सांगतात, ‘भारतातील नाटय़मंडप ही संकल्पना बंदिस्तच आहे. तर खुला रंगमंच ही संकल्पना ग्रीकमधून आली. सध्या महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी खुले रंगमंच आहेत. महाराष्ट्र शासन व महानगरपालिकांनी तसेच काही हौशी कलाकारांनी बांधलेले खुले रंगमंच आढळतात. अभिनय व नाटक शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या रंगमंचावर बरंच काही शिकता येतं. वेगवेगळय़ा आव्हानांना तोंड देत, त्यांचा अभिनय हा कसदार होतो. मुंबई विद्यापीठाच्या नाटय़ विभागाने सांताक्रूझ येथील कलिना संकुलात खुला रंगमंच उभारला आहे. तर पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्येही अतिशय देखणा व विस्तृत खुला रंगमंच पाहायला मिळतो. या ठिकाणी नियमितपणे नाटय़प्रयोग होत असतात. नेहमीच्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळी नाटकं प्रेक्षकांना अनुभवायला, पाहायला मिळतात. निसर्गाच्या सान्निध्यात ते नाटकाचा आस्वाद घेतात. खुले आकाश, विस्तीर्ण झाडे आणि मोठे क्षितिज त्यांना पाहायला मिळते. बंदिस्त सभागृहात कलाकारांच्या समोर फक्त प्रेक्षक असतात. तर बंदिस्त सभागृहात प्रकाशयोजनेसह विविध गोष्टींचा प्रभावी वापर होतो. परंतु खुल्या रंगमंचावर तिन्ही बाजूंनी प्रेक्षकांना बांधून ठेवावे लागते. प्रकाशयोजनाही नसल्यामुळे, या ठिकाणी कलाकारांना स्वत:चे कसब लागते’.

मित्राच्या नावाने खुला रंगमंच सुरू

आमचा मित्र अभिनेता राहुल शिरसाट याचे चार महिन्यांपूर्वी दुर्दैवाने निधन झाले. मग त्याच्याच नावाने आम्ही कल्याणमधील सोशल वेलफेअर स्कूलच्या संकुलात खुला रंगमंच सुरू केला. हा खुला रंगमंच संपूर्णत: प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून प्रकाशयोजना, िवगा आदी नाटय़गृहांसारख्या गोष्टी इथे नाही आहेत. जेव्हा आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा अभिवाचनाचा प्रयोग केला, तेव्हा १०० ते १२५ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. जेव्हा आम्ही इथे दर महिन्याला अभिवाचनाचा अथवा कोणताही नाटय़प्रयोग करू, तेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सोयीस्कर होईल. भलीमोठी नाटय़गृहे ही आर्थिकदृष्टय़ा निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना परवडत नसल्यामुळे, खुला रंगमंच हा उपयुक्त ठरतो. या रंगमंचावर प्रायोगिक नाटकांचे मोठय़ा संख्येने प्रयोग होतात, यामुळे कलाकारांची तालीम होत राहते आणि एकंदरीत कलाकार घडत जातो. आम्ही स्वेच्छामूल्याने नाटय़प्रयोग आयोजित करीत आहोत. खुल्या रंगमंचाच्या माध्यमातून कलाकार व प्रेक्षकांमधील दरी संपते. नाटक संपल्यानंतर त्यावर चर्चा होते, विचारांचे आदान-प्रदान होते. मोकळय़ा जागेत कलाकारालाही स्वत:च्या आवाजातील गंमत व स्तर कळतो, आजूबाजूचे सर्व अडथळे सांभाळून नाटक कसे खेळवावे हेसुद्धा कळते, असे अभिनेते-दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव यांनी सांगितले.

प्रत्येक प्रेक्षकापर्यंत आवाज पोहोचवण्याची कुवत निर्माण झाली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात आल्यावर मी पहिल्यांदा अ‍ॅम्फी थिएटरवर काम केलं. तेव्हा मला जाणवलेला सर्वात मोठा फरक आणि फायदा असा की, रंगभूमीवर काम करणाऱ्या नटांना त्यांच्या आवाजाचा व शरीराचा सैलसर वापर करण्यासाठी तशा मोकळय़ाढाकळय़ा जागेची गरज असते. केंद्रातली मुलं नाटकाचे सादरीकरण करताना, या जागेत माइकचा आधार घेत नाहीत. एवढय़ा मोठय़ा आणि मोकळय़ा जागेतही प्रत्येक प्रेक्षकापर्यंत स्वत:चा आवाज पोहोचेल, एवढी कुवत मुलांच्या आवाजात या जागेने तयार केली. कमानी रंगमंच म्हणजे बंदिस्त नाटय़गृहात नाटकातल्या चुका झाकल्या जातात. तर खुल्या रंगमंचामध्ये ड्रॅमॅटिक स्पेस तयार करणे हे मोठे आव्हान असते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटय़ विभागातील तृतीय वर्षांची विद्यार्थिनी सिमरन खेडकरने व्यक्त केले.

viva@expressindia.com