फोटो काढण्यासाठी पूर्वी कधी काळी काही ठरावीक प्रकारच्या पोज दिल्या जायच्या. पूर्वी कधी काळी म्हणजे खरं तर अगदी आत्ता आत्तापर्यंत! जेव्हापासून लोकांना कॅण्डिड फोटो आवडायला लागले तेव्हापासून पोज देणं बंद झालं. मात्र सेल्फीसाठी नवनवीन पोज शोधून काढण्यात आल्या. ओठांचा चंबू करून माशासारखं तोंड करून कॅ मेऱ्यात बघणं याला ‘पाउट’ असं म्हणतात. हा ट्रेंड तरुणाईत प्रचंड पॉप्युलर झाला आणि सगळे सेल्फी पाउट करून काढले जाऊ लागले. हळूहळू तरुणांसोबत सगळेच कमी-अधिक प्रमाणात यात सामील होऊ लागले.
तसं बघायला गेलं तर या ‘पाउट’चे दोन वेगवेगळे अर्थ शब्दकोश सांगतो. त्यातला एक काहीसा चांगला आणि एक काहीसा रडका म्हणता येईल. लहान मुलं जेव्हा ओठ बाहेर काढून रडायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या त्या मुद्रेला ‘पाउट’ म्हणतात; आणि आकर्षक दिसण्यासाठी काहीशा खोडकर इराद्याने केलेल्या ओठांच्या चंबूलाही ‘पाउट’ म्हणतात. हे दोन अर्थ काहीसे दोन टोकांचे आहेत. त्यातला एक निरागस दिसण्यासाठी तर दुसरा त्याच्या बरोब्बर उलट, निरागस नसण्यासाठी वापरला जातो. हे दोन पाउटचे केवळ अर्थ नसून पाउट करण्याच्या या दोन पद्धती आहेत. यातल्या रडणाऱ्या पाउटला फारसं कधी लक्षात घेतलं जात नसलं तरी डिक्शनरी सर्वात आधी हाच अर्थ आपल्याला देते. खोटं खोटं रडून दाखवण्यासाठी आणि आपला बालिशपणा दाखवून देण्यासाठी हे निरागस पाउट वापरलं जातं. तर दुसऱ्या प्रकारचं पाउट हे अधिकाधिक आकर्षक किंवा डिक्शनरीच्या भाषेत ‘सेक्सी’ दिसण्यासाठी वापरलं जातं. याच प्रकारच्या पाउटमध्ये सर्वाधिक सेल्फी तरुणाई काढत असते.
मात्र हे सेल्फीवालं पाउट प्रत्येक चेहऱ्याला शोभून दिसतंच असं नाही, उलट काही काही चेहरे पाउट केल्यावर खरोखरच माशाच्या तोंडासारखे दिसतात. एक सेल्फी पोज म्हणून सगळ्यांनाच पाउट माहिती आहे, मात्र आपल्या चेहऱ्याला पाउट करणं चांगलं दिसतं की नाही याच्याबद्दल फार कोणी विचार करताना दिसत नाही. शक्यतो पूर्ण गोल चेहऱ्याला पाउट शोभत नाही, तर उभ्या आणि डायमंड शेपच्या चेहऱ्याला पाउट चांगलं दिसतं. हाय चीक बोन्स असलेल्या चेहऱ्यांना पाउट छान वाटतं, मात्र लो चीक बोन्स असलेल्यांना स्माइलच जास्त शोभून दिसतं. आपल्या चेहऱ्याला नक्की काय जास्त सूट करतं हे न बघता आलेल्या लाटेत सगळेच जण पाउट करायला लागले आणि सगळं सोशल मीडिया माशांनी भरलेल्या समुद्रासारखं दिसायला लागलं.
जाता जाता एक छोटीशी टीप: लिपस्टिक एका स्ट्रोकमध्ये फाइन लागायला हवी असेल तर पाउट करून लिपस्टिक लावण्याची सवय तात्काळ बदलावी.
viva@expressindia.com