तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथील अदानी पॉवर प्लान्ट उभारणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून घाम गाळणाऱ्या १२ हजार कामगारांना बोनस देण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अदानी पॉवर प्लान्ट उभारणीचे काम १६ कंत्राटदारांकडून गेल्या तीन वर्षांपासून केले जात आहे. ज्यामध्ये कंत्राटी कामगार, असंघटित कामगार आदींचा समावेश आहे. कंत्राटदार घेणाऱ्या कंपनी गँगमन, पेट्रॉन, एल अ‍ॅण्ड टी, पॉयल इन्टरप्रायजेस, ब्ल्यू स्टार, आयव्ही, आरसीएलसारख्या ९६ कंत्राट कंपन्या मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. शासनाने कामगार अधिनियमात दुरुस्ती करून २२ सप्टेंबर २०१० रोजी राज्यपालांच्या आदेशाने पारित अध्यादेशानुसार कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना बोनस देण्याची तरतूद केली असली तरी मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कामगारांना मात्र कुठलाच बोनस देण्यात आलेला नाही. राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशाची माहिती असूनही या प्रकरणी कामगार आयुक्त कार्यालय कुठलीही दखल घेत नाही.
गोंदिया येथील कामगार अधिकारी बाभुळकर व अप्पर आयुक्त लाकसवार यांनी आतापर्यंत ९६ भेटी दिल्या आहेत, मात्र संबंधित कंत्राटदाराकडून लिफाफा मिळताच त्यांच्या तोंडाला कुलूप लागते. त्यामुळे राष्ट्रीय मजदूर सेनेच्या वतीने कामगार आयुक्तांना सुरक्षा, तसेच बोनस देण्याची मागणी एका निवेदनामार्फत राजू राहुलकर यांनी केली आहे.
मागील तीन वर्षांपासून अदानी व इतर कंत्राटी कंपन्या कामगारांचे शोषण करीत असल्याचा आरोप राजू राहुलकर यांनी केला आहे. अन्याय दूर करण्यासाठी विविध ९६ कंपन्यांमार्फत काम करणाऱ्या सर्व कामगारांना त्वरित बोनस देण्यासंदर्भात राष्ट्रीय मजदूर सेनेचे संस्थापक प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी तिरोडा येथे कामगारांची बठक घेऊन कामगार आयुक्तांना निवेदनामार्फत बोनस न मिळाल्यास कामगार आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.