News Flash

नालेसफाईत कामचुकारपणा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

पावसाळ्यापूर्वी मुंबईत कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या नालेसफाईची नि:पक्ष चौकशी करून दोषी कंत्राटदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.

| June 25, 2015 12:49 pm

पावसाळ्यापूर्वी मुंबईत कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या नालेसफाईची नि:पक्ष चौकशी करून दोषी कंत्राटदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच दोषी कंत्राटदारांची नावे कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकली जातील. त्याचबरोबर कामचुकार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी पालिका सभागृहात दिले.
मुंबईमध्ये गुरुवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली. शुक्रवारी सखल भाग जलमय होऊन रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली. नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्तांनी सभागृहात येऊन निवेदन करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी त्यास पाठिंबा दिल्याने अखेर महापौर स्नेहल आंबेकर यांनी अजय मेहता यांना सभागृहात बोलावले. त्या वेळी नालेसफाईवर निवेदन करताना ते बोलत होते.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झालेले असताना पालिका अधिकारी रस्त्यावर उतरून काम करीत होते. ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र आणीबाणीच्या काळात ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केला त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुंबई शुक्रवारी साचलेल्या पाण्याचा कार्यान्वित उदंचन केंद्रातून झटपट निचरा होऊ शकला नाही. या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले की, पुढील वर्षी पावसाळ्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी नोव्हेंबर महिन्यातच गझदरबंद उदंचन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येईल.
या संदर्भात केवळ कारवाई हा तोडगा होऊ शकत नाही, तर भविष्यात मुंबईकरांना असा त्रास होऊ नये यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार असून त्याची माहिती लवकरच पालिका सभागृहाला निवेदनाद्वारे देण्यात येईल, असे आश्वासन अजय मेहता यांनी नगरसेवकांना दिले.
अशा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ज्येष्ठ  नागरिकांच्या मदतीसाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागात भेडसावणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा समस्या कळविण्याच्या सूचना साहाय्यक आयुक्तांना करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
पावसानंतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. झोपडपट्टय़ांमधील नाले, गटारे, शौचालयांची पाहणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नालेसफाईच्या चौकशीसाठी उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रमुख चौकशी अधिकारी रमेश दणावे यांची सदस्य सचिवपदी, तर चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी प्रकाश शेजवळ, नगर उपअभियंता (इमारत बांधकाम) विवेक मोरे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील उपप्रमुख अभियंता मिनेश पिंपळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला ३० जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2015 12:49 pm

Web Title: action against lazy contractors for not cleaning sewerage
टॅग : Sewerage Cleaning
Next Stories
1 अपोस्टोलिक कारमल शाळेला पर्यावरण जागृतीचा पुरस्कार
2 पालिकेचा छुपा संपर्क
3 अतिधोकादायक इमारतींना पालिकेची आणखी एक नोटीस
Just Now!
X