काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेला राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपराधानीत शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे आणि त्या दरम्यान हिवाळी अधिवेशन असल्याने पक्षाचे सर्व नेते नागपुरात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे काँग्रेसवर वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने हा कार्यक्रम प्रतिष्ठेचा केला असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने नाराज झालेले व पक्षापासून दूर गेलेले पदाधिकारी पुन्हा संघटित झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांंचा मेळावा कोराडी मार्गावरील मानकापूरजवळील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा असून तो यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना विदर्भातील विविध जिल्ह्य़ात दौरे करून बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार कार्यक्रमाला आलेच नाही. आघाडीचा कार्यक्रम असल्यामुळे नाईलाजास्तव केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, हा कार्यक्रम काँग्रेसने प्रतिष्ठेचा केल्यामुळे त्यांचेच सगळीकडे वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी काँग्रेसने विश्वासात घेतले नव्हते. आता काँग्रेसला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी खेचण्याच्या दृष्टीने नेत्यांनी विविध जिल्ह्य़ात दौरे सुरू केले आहेत.
या मेळाव्याला १ लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहावे, यासाठी पक्षाच्या कार्यकत्यार्ंनी जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठक आणि मेळावे घेणे सुरू केले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आणि निरीक्षक दीनकरराव तावडे यांनी नुकतीच गणेशपेठेत पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांंची बैठक घेतली. सहा जिल्ह्य़ातील कार्यकत्यार्ंचा हा मेळावा असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी विदर्भातून या मेळाव्याला पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड ८ आणि ९ डिसेंबरला नागपुरात येणार असून ते जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गर्दी जमविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक वस्तीमधून किमान दोनशेपेक्षा अधिक लोक आले पाहिजे. यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांंना गाडय़ांची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी निरीक्षक दीनकर तावडे नागपुरात दहा दिवस आधी तळ ठोकून आहेत. बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष अजय पाटील, गजानन देसाई, किशोर कन्हेरे, प्रा. नारायण निकम, प्रकाश गजभिये, कामिल अंसारी, दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार आदी उपस्थित होते.