उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला सुरू होण्यासाठी वकिलांची एकजूट कायम ठेवण्याबरोबर जालीम उपाय शोधण्याची गरज आहे. या लढय़ासाठी सगळी आयुधे एकदम काढायची नाहीत अन् ती शमीच्या झाडावर पुजूनही ठेवायची नाहीत. कृती समितीच्यावतीने सौम्य व उग्र अशी लढय़ाची दिशा जाहीर केली जाईल. त्याला सहाही जिल्ह्य़ातील वकिलांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. धैर्यशील पाटील यांनी सोमवारी येथे बोलतांना केले.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू होण्यासाठी सहा जिल्ह्य़ातील वकिलांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथील मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहामध्ये दुसरी वकील परिषद आयोजित केली होती. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड.पाटील बोलत होते. परिषदेवेळी डझनभर ज्येष्ठ वकिलांनी खंडपीठ व सर्किट बेंच मागणीच्या लढय़ाचा आढावा घेवून आंदोलन ताकदीने पुढे रेटण्याचा निर्धार बोलून दाखविला.
वकिलांचे आंदोलन हे मध्यमवर्गाच्या लढय़ाचे स्वरूप आहे. मध्यमवर्गाच्या लढय़ाचा इतिहास पाहता ते अवसानघातकी ठरले आहे, असा उल्लेख करून अॅड.पाटील म्हणाले, महात्मा गांधीच्या आत्मक्लेश आंदोलनाप्रमाणे या लढय़ाला सामोरे जावे लागेल. मराठवाडा, गुलबर्गा येथे खंडपीठाच्या मागणीसाठी प्रदीर्घकाळ प्रखर लढा द्यावा लागला आहे याची जाणीव सर्वानी ठेवावी. तरूण वकील संघर्षांसाठी सदैव तयार असतात. ज्येष्ठ वकिलांनीच लढय़ाचे भान ठेवावे असा चिमटा त्यांनी काढला.
लढल्याशिवाय कोल्हापूरला काही मिळत नाही हा इतिहास आहे, असा उल्लेख करून अॅड.गोविंद पानसरे म्हणाले, अधिकारी, सत्ताधारी खटय़ाळ असल्याचे अनुभवले होते. पण मुख्य न्यायाधीशही तसेच वागायला लागले तर ते अयोग्य ठरेल. न्याय संस्था ही प्रस्थापितांच्या हितरक्षणाची काम करते. तिला सामान्यांची कदर नाही. खंडपीठ होण्यासाठी उत्तम हॉटेल, अन्य सोई हव्या असल्याचे सांगितले जाते. पण न्यायव्यवस्था ही मोजक्या वरिष्ठांसाठी चालली आहे की सामान्यांच्या हितासाठी हे तपासून घ्यावे लागेल. लोकांच्यापर्यंत पोहोचणे हे न्यायव्यवस्थेचे तत्त्व असेल तर त्याचा आदर ठेवून कोल्हापुरात खंडपीठ, सर्किटबेंच सत्वर सुरू झाले पाहिजे.परिषदेत अॅड.शिवाजीराव चव्हाण, अॅड.महादेवराव आडगुळे, अॅड.नीता सावंत-राणे (सिंधुदुर्ग), अॅड.श्रीकांत जाधव (सांगली), अॅड. संभाजी मोहिते (कराड), माधुरी काजवे (इचलकरंजी), अॅड.प्रकाश हारूगडे (सांगली), अॅड.अशोक जाधव, अॅड.अशोक कदम (रत्नागिरी), अॅड.दिलीप नार्वेकर (सिंधुदुर्ग)अॅड.वसंतराव भादुले (पंढरपूर) यांची भाषणे झाली. कृती समितीचे निमंत्रक अॅड.शिवाजीराव राणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2013 रोजी प्रकाशित
खंडपीठासाठीचे आंदोलन उग्र करण्याचा निर्णय
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला सुरू होण्यासाठी वकिलांची एकजूट कायम ठेवण्याबरोबर जालीम उपाय शोधण्याची गरज आहे. या लढय़ासाठी सगळी आयुधे एकदम काढायची नाहीत अन् ती शमीच्या झाडावर पुजूनही ठेवायची नाहीत. कृती समितीच्यावतीने सौम्य व उग्र अशी लढय़ाची दिशा जाहीर केली जाईल.

First published on: 01-10-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation to be aggressive for circuit bench