राज्याच्या ग्रामीण भागास पथदर्शक ठरणारा अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचा शैक्षणिक पॅटर्न धोक्यात आला आहे. राजकारणविरहित काम करणाऱ्या विचार विकास मंडळातील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. काही असंतुष्ट सदस्यांनी मंडळाची रविवारी सर्वसाधारण सभा घेऊन अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांची निवड केल्यामुळे खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून गांधी महाविद्यालयाच्या विचार विकास मंडळात राजकारण सुरू असून यातूनच अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. नवीन सदस्यांची नियुक्ती, काही सदस्यत्व रद्द करणे, अपिलात जाणे अशा प्रकारांमुळे सध्या हे मंडळ चच्रेचा विषय ठरले आहे. रविवारी येथील संस्कृती लॉन्सच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष, सचिवांना वगळून सर्वसाधारण सभा घेऊन अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करून घेण्यात आली. यात ६४ पकी ४७ सदस्य उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. बाबुराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी अॅड. भारतभूषण क्षीरसागर यांनी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष सुधाकर नागरगोजे, उपाध्यक्ष अॅड. भगवानराव िशदे, अॅड. कृष्णराव देशमुख, सरचिटणीस बाबुराव कदम, चिटणीस बाबासाहेब देशमुख, शंकरराव जाधव, कोषाध्यक्ष रामचंद्र शेळके. शिवराज गोरटे, प्रकाश देशमुख, अॅड. विजय देशमुख, शेषेराव लोहारे, रामचंद्र गुट्टे, रावसाहेब पवार, गणेश मुंडे, जनार्दन पौळ, रामकृष्ण लोकरे यांची सदस्य म्हणून निवड झाली.
निवडीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत नूतन अध्यक्ष नागरगोजे म्हणाले, की आम्ही संचालक मंडळाने रीतसर प्राचार्याना सर्वसाधारण सभा घेण्यासाठी महाविद्यालयात हॉल मागितला. परंतु त्यांनी हॉल न देता विद्यमान अध्यक्षांच्या सांगण्यावरून महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. आम्ही पोलिसांकडे रीतसर ४ पोलिसांचे शुल्क भरूनही पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिले नाही. पोलीस राजकीय दबावाला बळी पडल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यमान अध्यक्ष किशनराव देशमुख म्हणाले, की मंडळाची स्थापना १९५९ मध्ये झाली. याच संस्थेचा नोंदणी क्रमांक वापरून केलेला पत्रव्यवहार बेकायदा आहे. त्यामुळे ही निवड नियमबाहय़ आहे.