बुगडी माझी सांडली गं.., हात नका लावू माझ्या साडीला.. अशा अजरामर लावण्यांचे मुखडे गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या ८१व्या वर्षी तितक्याच झोकात सादर केले. उपस्थित रसिक जनसागराने टाळय़ांच्या गजरात आशाताईंच्या जादुई आवाजाला दाद देत ठेका धरला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात काल रात्री आशा भोसले यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान सादर केलेल्या काही गाण्यांचे मुखडे रसिकांना विशेष भावले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कांचनताई थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, नगराध्यक्ष दिलीप पुंड, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे आदी या वेळी उपस्थित होते.
मुलाखतीच्या दरम्यान विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना आशा भोसले म्हणाल्या, की वयाच्या नवव्या वर्षांपासूनच आपण गायनाला सुरुवात केली. वडील दीनानाथांनी मला व लतादीदींना गायनाचे धडे दिले. कधीकधी पहाटेपर्यंत आमच्या गायनाचा रियाज चालत असे. गेल्या सत्तर वर्षांत मराठी, िहदी, बंगाली आदी भाषांतील साडेतेरा हजार गीतांचे गायन केले. गाण्यासाठी अनेक अन्नपदार्थ कायमचे सोडून द्यावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी भरपूर मेहनत करतानाच गायनाचा जास्तीत जास्त रियाज करण्याचा सल्ला त्यांनी दिला. थोरात हे चांगले राज्यकर्ते असल्याची आमच्या कुटुंबाची भावना आहे. सांस्कृतिक जाण असलेल्या थोरातांनी या तालुक्याची राज्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यामुळेच आपण संगमनेरला येण्याचे निमंत्रण स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, याच महोत्सवात सोमवारी दुपारी चित्रपट गीतकार जावेद अख्तर, त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी व चिरंजीव अभिनेता फरहान अख्तर (भाग मिल्खा भाग फेम) यांनीही आज उपस्थिती लावली. आकाशवाणीचे निवेदक गौरव सिंह यांनी अख्तर परिवाराची मुलाखत घेतली. सामान्य माणसात सहकार्याची भावना असेल तर त्याचे रूपांतर सहकारात होते. येथे आपल्याला तसेच चित्र दिसले. देशात अशाप्रकारच्या सहकार्याची भावना वाढीस लागली तर देशाचेही चित्र बदलेल असा आशावाद जावेद अख्तर यांनी व्यक्त केला. मित्रांची पत्रे लिहितानाच व्यावसायिक कधी झालो ते लक्षातच आले नाही. हल्लीच्या चित्रपटातून खेडे व त्यातील नायक हरवत चालले आहे. आजच्या चित्रपटात खेडय़ातील नाहीच तर शहरातीलही गरिबाचे प्रतििबब दिसत नाही असे अख्तर म्हणाले.
शबाना आझमी म्हणाल्या, चित्रपटातील भूमिकांतून गरिबीचे चित्र समजल्याने आपण सामाजिक कार्याकडे ओढलो गेलो. गरिबांसाठी मुंबईत पन्नास हजार मोफत घरे उपलब्ध करून दिली. स्वप्ने पाहा, मात्र स्वप्नपूर्ती करताना अतिशय उंचीवर जाण्याचे ध्येय बाळगा. असे आवाहन त्यांनी केले. ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचा नायक अभिनेता फरहान म्हणाला, या चित्रपटाने आपल्याला वेगळी ओळख दिली. प्रथमपासूनच आपण भूमिकेशी समरस होऊन काम केले. प्रामाणिकपणे काम केल्यास फळ निश्चित मिळते असा आपला अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.