कळंबोली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी स्टील मार्केटमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना अटक केली होती. या दरोडय़ाचा मुख्य सूत्रधार यावेळी अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पकडण्यात आलेल्या चार दरोडाखोरांचा हा पहिलाच दरोडा फसल्याने सध्या ते तुरुंगाची हवा खात आहेत. वाहनचालकाचे काम करत असताना वाईट संगत लाभल्याने हे आरोपी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले.
वाहनचालक ते दरोडेखोर असा या आरोपींचा प्रवास. कळंबोली पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हादेखील त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. कळंबोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांना खबऱ्याकडून स्टील मार्केटमध्ये काही जण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने मार्केटमध्ये सापळा लावत १५ एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास दरोडय़ाच्या तयारीने आलेल्या बंटी मल्होत्रा, संजय सिंग, रामरतन सिंग आणि प्रदीप सिंग यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे.
पसार झालेला दरोडेखोर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांनी दिली. अटक केलेले दरोडेखोर हे ट्रकचालक आहेत.
 काही दिवसापूर्वी न्हावाशेवा बंदरातून ए.आर.आर कंटेनर यार्डमध्ये प्रीमियम चिक फिडस् या कंपनीने कोंबडय़ांसाठी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारा एल-लायसेन हायड्रोक्लोराईड हा कच्चा माल इंडोनेशिया येथून मागविला होता. कच्च्या मालाच्या ७२० गोण्या घेऊन येणाऱ्या कंटेनरमधील अडीच लाख रुपये किमतीच्या ११० गोण्या या आरोपींनी चोरल्या होत्या. या चोरीपासून गुन्हेगारी जगतात बंटी, चंद्रशेखर, रामरतन आणि प्रदीप प्रवेश केला. बंटी हा नवी मुंबईतील दिघा गावात राहणारा आहे. इतर तिघे उरण परिसरातील आहेत.
या आरोपींकडून चोरी केलेल्या गोण्या आणि दरोडय़ात वापरण्यात आलेले देशी कट्टा, सुरा, नायलॉन दोरी, मिरची पूड आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्याचे मोहिते यांनी सांगितले. चारही दरोडेखोरांचा दरोडय़ाचा पहिलाच प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.

तोतया पोलिसांना अटक
आरीफ गोसमोईद्दीन शेख (३९, रा. मुंब्रा) आणि समीर शब्बीर शेख (२२,रा.माहीम) या दोन चोरटय़ांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस असल्याची बतावणी करून या दोघांनी ९ एप्रिल रोजी एका महिलेच्या गळ्यातील १४ गॅ्रम सोन्याची बोरमाळ चोरून नेली होती.  ११ एप्रिल रोजी पनवेल-मुंब्रा महामार्गावरील कळंबोली ग्रामपंचायत गेटसमोर एका कारचालकाला थांबवून त्याच्या खिशातील मोबाइल आणि ११ हजार हिसकावून पळ काढत असताना कळंबोली लिंक रोड येथे नाकाबंदी करत त्यांना पकडण्यात आले.