आज श्यामची आई दुर्मिळ झाली आहे. प्रत्येक घरात आई हरवली असून, त्याजागी मम्मी आली आहे. मम्मीला नोकरी अन् टी.व्ही. सीरियलमधून मुलांसाठी वेळ नसल्याची खंत व्यक्त करताना, शिक्षकातील आई, आईमधला शिक्षक जागृत असेल तरच सुसंस्कृत पिढी तयार होऊ शकते, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केला.
(कै.) ग. स. तथा दादासाहेब आळतेकर स्मृती व्याख्यानमालेत ‘मातृदेवो भव कुटुंब व्यवस्था : सद्य:स्थिती’ या विषयावर दोन दिवस आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. दादासाहेब आळतेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व्याख्यानास प्रारंभ झाला. शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. एस. जी. सबनीस, यांच्या हस्ते रामतीर्थकर यांचा सत्कार करण्यात आला. मुकुंदराव कुलकर्णी, मकरंद महाजन, सुवर्णा देशपांडे, बापू चिवटे, डॉ. विश्वास धायगुडे  यांची या वेळी उपस्थिती होती.
अॅड. अपर्णा रामतीर्थकर म्हणाल्या, की मार्कवंत मुले घडविण्यापेक्षा गुणवंत मूल तयार करण्याचे काम आईने केले पाहिजे. शिक्षणामुळे आपण काय साधले ही विचार करायची वेळी आली आहे. मुले शिकतात, अमेरिकेला जातात व आई वृद्धाश्रमात खितपत पडते. शिक्षण व सुसंस्कृतपणा एकत्र आला पाहिजे हे सारे विसरून गेले असल्याची शोकांतिका आहे. मुलांना आज आईचा धाक राहिला नाही. आई ही आदर्श माता, उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, संयमी असायला हवी.
दुसऱ्या व्याख्यानात रामतीर्थकर म्हणाल्या, की आज कुटुंबसंस्था मोडीत निघाली आहे. मामाचा गाव, मामाचा वाडा, सुगरण मामी हे राहिलेले नाही. मामा शहरात १३व्या मजल्यावर राहतोय. मामी नोकरी करत असल्याने तीच वडापाव, ब्रेड आणून खात आहे. फ्लॅटमध्ये देवाला आणि आईलाही जागा नाही, मग भाच्यांना व इतर नातेवाइकांना कुठून जागा मिळणार, तसेच मामीच्या हातची पुरणपोळी भाच्यांना कशी मिळणार. टीव्ही सीरियल बघून मुलीच्या आया नको त्या गोष्टींचे अनुकरण करत आहेत. मुलीच्या संसारात त्या नको तेवढी ढवळाढवळ करीत आहेत. मुलीच्या लग्नात फ्रीजपासून फर्निचपर्यंत सर्व वस्तू तिला देऊन नवऱ्याच्या आई- वडिलांपासून वेगळे राहण्याचा परवाना देत आहेत.
लीव्ह इन रिलेशनशिपमुळे एकमेकांमतील भावनिक नातेसंबंध, मावशी, आत्या, मामा, आजी, आजोबा, भाऊ, बहीण ही नातीच उरणार नाहीत. हिंदू धर्मात, धर्मग्रंथात घटस्फोट नाही, मुस्लिमांत तलाक आहे. ख्रिश्चनात डायव्होर्स आहे. दूसऱ्या धर्मावर टीका न करता आपला धर्म कट्टरपणे पाळणे म्हणजे सर्वधर्मसमभाव.
एक काळ असा होता, की आई-वडील घरात सात-आठ मुले असली तरी व्यवस्थित संभाळायचे, पण आता मुले आईवडिलांना सांभाळत नाहीत. स्त्रीने चेहरा फेअर अॅड लव्हलीने सुरेख करण्यापेक्षा मन फेअर अॅड लव्हली कसे होईल हे पाहिले पाहिजे. शहरीकरणामुळे कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाली आहे. खेडय़ातही हेच होणार आहे. कुटुंबव्यवस्था कशी टिकेल, घराला घरपण कसे राहील, सासू-सुनेचा सुसंवाद कसा राहील, नवरा-बायकोचे प्रेम कसे अबाधित राहील ही स्त्रीची जबाबदारी आहे. स्त्रीमुक्तीपेक्षा स्त्रीशक्ती हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक सासूला जसा तिचा मुलगा आवडतो तशीच सून आवडली पाहिजे. सुखी संसाराबाबत  रामतीर्थकर यांनी घरातील प्रत्येक नात्यासाठी टीप्स व सूचना दिल्या.