भूखंडाचे नामांतरण करण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाकडून दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नगर भूमापन कार्यालयातील महिला परिरक्षण भूमापक व एका विमा अभिकर्त्यांला भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
अनिल अवचळ (रा. लकडगंज) यांचा मौजा पारडी येथे भूखंड असून त्याचे नामांतरण करावयाचे होते. गजेंद्र देवीदयाल खुंगर (रा. वर्धमाननगर) हे नामांतरण अर्ज घेऊन सिव्हिल लाईन्समधील भूमी अभिलेख कार्यालयात गेले. तेथील नगर भूमापन अधिकारी क्रमांक दोनच्या विभागात त्यांनी अर्ज सादर केला. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी परिरक्षण भूमापक वर्षां सुभाष भगत यांच्याकडे देण्यात आला होता. भूखंडाचे नामांतरण करण्यासाठी वर्षां भगत यांनी गजेंद्र खुंगर यांना दोन हजार रुपयांची मागणी केली आणि २० मे रोजी दुपारी बोलावले. खुंगर यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे कार्यालय गाठून प्रभारी अधीक्षक वसंत शिरभाते यांची भेट घेऊन तक्रार केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज दुपारी नगर भूमापन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सापळा रचला. गजेंद्र खुंगर यांनी वर्षां भगत यांची भेट घेतली. त्यांनी दोन हजार रुपयांची मागणी करीत ते तेथे असलेले कमल फकीरचंद सुदानी (रा. सूर्यानगर) यांच्याजवळ देण्यास सांगितले. कमल सुदानी याने ते  स्वीकारले. इशारा मिळाल्यानंतर दबा धरून बसलेल्या पथकाने कमल व त्यानंतर वर्षां भगत यांना पकडले. त्यानंतर वर्षां भगत यांच्या मानेवाडा मार्गावरील बालाजी नगरातील घरी झडती सुरू करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे व हरिश्चंद्र रेड्डीवार, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व अशोक साखरकर, हवालदार विलास खनके, महेंद्र सरपटे, प्रमील गायकवाड, संतोष पुंडकर, सुभाष तानोडकर, अजय यादव, शेखर ढोक, मधुकर टेकरे, राजेश तिवारी व जगदीश गणवीर यांनी ही कारवाई केली.