मागील १५ महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या डोंबिवलीतील सिमेंट, कॉँक्रीटच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत असून येत्या एक जूनपासून प्रमुख रस्त्यांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासंबंधी हालचालींना वेग आला आहे. कल्याण रस्ता म्हणून ओळखला जाणारा पारसमणी चौक ते घरडा सर्कलचा रस्ता तसेच मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता ते गावदेवी मंदिरापर्यंतच्या प्रमुख रस्त्यांची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी उरकावीत, अशा स्वरूपाच्या सूचना महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते सुरू झाले नाहीत, तर रहिवाशांचे मोठे हाल होतील. त्यामुळे काहीही झाले तरी ही वाहतूक सुरू करावी, यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढू लागला असून यामुळे प्रशासनानेही या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
गेल्या १५ महिन्यांपासून डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांच्या कॉँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. अगदी सुरुवातीपासून ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डोंबिवलीकरांनी शिवसेनेच्या पारडय़ात भरभरून मते टाकली असली तरी अशा संथगतीच्या कामांविषयी येथील मतदार फारसे खूश नाहीत. मेसर्स एम. ई. इन्फ्रास्ट्रक्चर, मे. बी. के. मदानी या ठेकेदारांकडून सुरू असलेली ही कामे वेगाने व्हावीत यासाठी अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकारीही फारसे आक्रमक नसल्याचे चित्र आहे. महापालिकेत आयुक्त म्हणून येणाऱ्या अधिकारीही ही कामे लवकर उरकावीत यासाठी आग्रही नसल्याचे चित्र आहे. अभियंता विभागातील एकंदर गोंधळ पाहता रहिवाशांच्या हालात भरच पडत आहे. या पाश्र्वभूमीवर उपमहापौर राहुल दामले यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत या दोन प्रमुख रस्त्यांची कामे येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण करावीत,
अशा सूचना दिल्याने अभियंता विभाग खडबडून जागा झाला आहे.
पारसमणी चौक ते घरडा सर्कल रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचे काम जेवढे पूर्ण झाले आहे तेवढा भाग वाहतुकीसाठी खुला करावा. या रस्त्यावरील चौकांभोवतीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत तसेच काही भागाचे काँक्रीटीकरणाचे काम तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत ती कामे डांबरीकरणाने पूर्ण करावीत, असे या बैठकीत ठरले. कल्याण रस्ता येत्या दहा दिवसात वाहतुकीसाठी खुला करावा तसेच उर्वरित कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात यावीत, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता ते गावदेवी मंदिरापर्यंतचा जेवढा रस्ता काँक्रीटीकरणाने पूर्ण झाला आहे, तो रस्ता बुधवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.