माहिती व तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने महसूल खात्यात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाकडील सर्वप्रकारच्या दस्तऐवजांच्या नोंदी यापुढे संगणकावरच दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.
नगर येथे बांधण्यात येणाऱ्या नव्या अद्ययावत जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन रविवारी थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, खसदार दिलीप गांधी, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अनिल राठोड, आमदार राम शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हरीश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सुवर्णजयंती राजस्व अभियानामुळे राज्यातील महसूल विभागाचा कारभार अधिक पारदर्शी व गतिमान झाला आहे. आता दस्तऐवजाच्या नोंदी लोकांना घरबसल्या मिळणार आहेत. नगरला २८ लाख रुपये खर्चून नवे जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी तीन वर्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी दोनच वर्षांत ही इमारत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली. जिल्हय़ातील सर्व तलाठी कार्यालयांसाठी इमारती बांधण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला. पाचपुते, गडाख, गांधी, वाकचौरे व शिंदे यांची या वेळी भाषणे झाली.
(चौकट)
अनुपस्थिती आणि शेरेबाजी
– जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, वनमंत्री पतंगराव कदम, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूल राज्यमंत्री सुरेश धस या प्रमुखांसह महापौर संग्राम जगताप, अरुण जगताप, शिवाजी कर्डिले, विजय औटी, अशोक काळे, भाऊसाहेब कांबळे, चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख हे आमदार, महसूल विभागाचे अप्पर आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, विभागीय महसूल आयुक्त संजय खंदारे हे प्रमुख अधिकारीही कार्यक्रमास गैरहजर होते. या सर्वाची पत्रिकेत नावे होती.
– याही कार्यक्रमात वक्त्यांमध्ये चांगलीच शेरेबाजी रंगली. अगदी सुरुवातीला राठोड यांनी या भव्य आणि अद्ययावत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आराखडय़ात आंदोलकांची निदर्शने, मोर्चे, धरणे आंदोलन याला जागा नसल्याचे निदर्शनास आणून देत त्याची मागणी केली. तसेच उद्घाटनालाही थोरात यांनीच यावे असे ते म्हणाले. हा संदर्भ देऊन गडाख यांनी याचा अर्थ राज्यात पुन्हा काँग्रेस आघाडीची सत्ता येणार हे राठोड यांना मान्य असावे असे म्हणताच एकच हशा उडाला. थोरात यांनीही त्यांच्या भाषणात आंदोलकांची सोय करताना राठोड यांना ‘तुमच्यासाठी ही सोय नक्की करू’ असे सांगून त्यावर कडी केली.